Monday, 11 April 2016

माझ्या वडिलांनी मला लिहिलेली काही साहित्यिक पत्रें

       ll श्री ll          
                           नागपूर
                दि.२६// २०००.        
      चि. सौ. गीता हिला अनेक सप्रेम शुभाशिर्वाद.
      रचना - बुधवार दि. १९//२०००.

   शबरीची उष्टी बोरे

      शबरीची उष्टी बोरे खाता प्रभु रमला
 भिल्लीणीच्या भावभक्तीने भावुक तो   बनला
बदरीतरुची आंबट बोरे मिटक्या मारित तो खाई अधून मधून जिभल्या चाटीत तृप्तीचे ढेकर देई  ll ll भाबडा भक्त गुहक नावाडी चरण प्रक्षालुन धुळ काढी तुमच्या चरणधुळीने प्रभु ही शिळा अहिल्या उध्दरली रुक्मिणीने एका तुलसी दलाने गिरिधर प्रभु तुळिला प्रल्हादाच्या भावभक्तीने नृसिंह स्तंभी अवतरला ll ll अर्जुनाच्या सख्यभक्तीने वैकुंठराणा घोडे ओढी राजसूय यज्ञामाजी द्रौपदी पंगती वाढी अन् कृष्ण उष्टी काढी संत जनाबाई संगे दयाघन दळणकांडण करी गोकुळीच्या गौळणीसंगे यमुनातीरी रास रची श्रीहरी  ll ll  'पत्रं पुष्पं फलं तोयं' जे भक्त अर्पिल त्यास प्रसन्न सुदाम्याने मुठभर पोहे देता द्वारकाधीशे हरले दैन्य उपमन्यला क्षीरसागर दिधला धृवा दिले अढळपद बिभीषणा लंकाराज्य देऊनि दिधले चिरंजीवपद  ll ll  भावभक्तीचा ऐसा अगाध महिमा दाखले किती देऊ?
माझी गिरा असमर्थ आहे, गरिमा त्याची किती गाऊ?
अनंतकोटी ब्रह्मांडनायक तो, तू एकला त्यासी मानिसी काय उणे होईल त्याचे, तू मात्र व्यर्थ दर्प - टेंभा मिरविसी  ll ll

     रचना - शुक्रवार दि.       २१//२०००
      
    निसर्ग हे परमेश्वराचे उद्यान

       निसर्ग हे उद्यान परमेशाचे जो डोळे उघडून बघेल त्याला, इतर सर्वांना हा सारा भासेल केवळ फापटपसारा  अरुण चितारी नभःपटाला देतो हा रंग सूर्योदयीचा अन् सूर्यास्ताचा, बघण्यात व्हावे दंग  ll ll
   हनुमंताने पेटविलेली ही सुवर्णपुरी लंका  की श्रीकृष्णाने वसविलेली सोन्याची द्वारका
  वीजेचा चमचमाट आधी अन् मग मेघांचा गडगडाट 'आधी केले अन् मग सांगितले'
हा शिकवी जगाला पाठ ll ll
सायंकाळी क्षितिजावरती इंद्रधनूचा सप्तरंगी थाट मोर उभारुन पिसारा करी नृत्य नटसम्राट प्रातःकाळी एके मेळी द्विजगणांचा किलबिलाट पौर्णिमेच्या रात्रीचा तो ज्योत्स्नेचा चकचकाट  ll ll वसंताचे नवचैतन्य अन् ग्रीष्माचे दाहक वारे वर्षाच्या श्रावणसरी अन् शरदाचे चंद्र तारे हेमंताची बोचरी थंडी अन् शिशिराची पानगळ ऋतुचक्राची ही गंमत बघुनी मनी उठे कौतुक प्रबळ  ll ll फुलाफळांनी बहरलेले सौरभयुक्त लतावृक्ष हिरव्या निळ्या शालूने शृंगारलेले धरा - वक्ष सागराची गहिराई अन् नगांची उत्तुंगता वेधते लक्ष हे देती जगन्नायकाच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष  ll ll

   दि. २३, २५, २६ जानेवारीला गीते रचली. यथावकाश पाठवीन. चि. राजू, सौ. कविता, चि. अंजली दि. १७ जानेवारीला पहाटे साडेपाचला अमेरिकेला रवाना झाले. त्यांचा तेथे सुखरुप पोचल्याचा दि. १८ ला रात्री १० ला फोन आला. श्री. नानासाहेब सौ. विजयाताई उद्या रात्री १२ ll ला अमेरिकेला निघतील.
चि. अरुणचा दि. फेब्रुवारीला नागपूरला येतो, असा फोन आला. चि. प्रमोद सहकुटुंब जुलै १४ च्या आईच्या अमृतमहोत्सवासाठी येत आहेत. अजून पत्र आले नाही. चि. विश्राम - फेब्रुवारीला गोव्याहून येथे येत आहे. त्याचा दि. फेब्रुवारीला ५१ वा वाढदिवस आहे. चि. अभिजितचा interview होऊन त्याची Project साठी निवड झाली. तो सध्या बंगलोरला गेला आहे. तेथे ट्रेनिंग होऊन Project कोठे मिळतो ते कळेल. चि. अभिजितच्या लग्नाची तिथी डिसेंबर ठरली. पत्रोत्तर द्यावे. समाचार कळवावा. सर्व ठीक.
श्री. मुकुंदराव, चि. मृदुला, अमोल, विशाल यांना शुभाशिर्वाद. कळावे. लोभ असावा
       तुमचे - बाबा.

      ll  श्री ll     
                        नागपूर                शुक्रवार दि२८//२०००.

    दि. १९ ते २६ या सप्ताहात रचलेली उर्वरित गीते आज पाठवित आहो.

     ) साष्टांग नमन

      चैतन्य महाप्रभू सागर पुलिनी तल्लीन नाचे 'राधेकृष्ण राधेकृष्ण' जयघोष चाले सतत वाचे राजस्थानी मीरा कृष्णभक्तीत रममाण झाली विसरली जगरहाटी, विसरली पतिला, कृष्णरुप झाली ll ll निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही संन्याशाची पोरे किती हाल सोशिला त्यांनी अंगी भरले भक्तीचे वारे ज्ञानराज माऊलीने रचिली, ज्ञानेश्वरी जी जगन्मान्य झाली 'बोलविता धनी तो निवृत्ती' वदून अहंभाव तुडविला चरणतळी  ll ll आद्य शंकराचार्य आणिक समर्थ रामदासांनी आसेतु हिमाचल पदयात्रा करुनी जनजीवन निरखिले स्वनयनी शंकराचार्ये शह दिला बुध्दमताने अन् प्रतिष्ठापिला वैदिक धर्म रामदासे महंत संघटना उभारुन शिवबाकरवी रक्षिला महाराष्ट्र धर्म  ll ll एकनाथ, नामदेव, तुकाराम यांचे दैवत पंढरपूरचा विठ्ठल नाथांचे भागवत अन् तुकारामांची गाथा, महाराष्ट्राचे धन विशाल जनाबाई, बहिणाबाई, गोरा, चोखा, सेना, सावता, रोहिदास, सजन, नरसी मेहता, नरहरी सर्व स्तरांमध्ये आले संत उदया जे जड जीवा सहज मुक्त करी  ll ll कलकत्त्याच्या कालीचे भक्त रामकृष्ण परमहंस, त्यांचे शिष्य विवेकानंद ज्यांचे भाषण गाजले शिकागोस तुलसीदास, सुरदास, कबीर अन् गुलाबराव महाराज ऐशा सकल संतश्रेष्ठ, सुरभक्त सुजनांस सदाशिवाचे सहस्त्र साष्टांग नमस्कार रोज  ll ll

   )   नरदेह सार्थक

 तोंडातून लाळ गळे, खोकल्याने होसी कासावीस अंगी पडल्या सुरकुत्या, माथ्यावर पिकले केस नन्ना म्हणते मान, बोळके झाले ओस चालताना लागे काठी, भज रे मना जगजेठी  ll ll आल्या गेल्याचे स्वागत होई, गणगोता पाहुणचार तोवरी घरी भारी वर्दळ वाढे, पैसा सरता कोण विचारणार?
सुखाचे सांगाती सर्वही मिळत, शितं तिथं जमती भूतं दुःख येता कोण कामा येत, भज रे मना भगवंत  ll ll बालपण गेले खेळण्यात, यौवनी तारुण्याचा माज वार्धक्यी चिंता सोडीना, नरदेहाचे काय झाले चीज?
पूर्वपुण्ये नरजन्म लाभला, नामस्मरणाचा घेई छंद काहीतरी करी रे सार्थक, भज श्रीराम, भज गोविंद  ll ll रात्र सरता तांबडे फुटते, शिशिर संपता वसंत आगमन कालचक्र ऋतुचक्र फिरते अव्याहत, समीप येते मरण आशा तृष्णा होती कधी क्षीण, त्या सदैव तरुण रे मना, जप श्रीराम जयराम जय जय राम,
  भज श्रीकृष्ण ll ll
  षड्रिपु कधी सोडिती पिच्छा, पाठी लागल्या आशा, इच्छा
  चारित्र्य राखी स्वच्छ, जनसेवा करी निरिच्छ  रे मना, सदैव रहा जागृत, नको आमिषा  ते भुलू  संतत वाचे घे नाम हरीचे
  गोविंद, गोपाळ, पांडुरंग, विठ्ठलू  ll ll

    )   इंद्रधनु

   क्षितिजावरती इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
  मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे ( बालकवी )

   इंद्रधनुमाजी सामंजस्ये नांदती एकूण रंग सात लाल, नारिंगी, पीत, हिरवा, अस्मानी, निळा, जांभळा एकसाथ  ll ll
  अरुणोदयिचा अन् मावळतीचा लाल नभोरंग
 महालक्ष्मीने परिधृत शालूचा नारिंगी रंग
श्रीकृष्ण रासक्रीडासमयी नेसती पितांबर पीत भूदेवी वर्षाकाळी न्हाऊन नेसते शालू हरित  ll ll निरभ्र नभ अन् प्रशांत सागर यांचा रंग अस्मानी समुद्रमंथनातून निघाला कौस्तुभ निळा मणी श्रीकृष्णाने कालिंदी - डोही मर्दन केले कालियाचे त्या गरलाने यमुनेचे जल झाले जांभळे साचे  ll ll हे सप्तरंग जरी दिसती भिन्न वेगळाले जलदाच्या जलबिंदूतून रविकर जाता पृथक झाले कैलासशिखरी नांदे शिवकर्पूर गौर अन् हिमगौरी पार्वती शुभ्रवस्त्रावृता श्वेतपद्मासना धवलगौरी सरस्वती  ll ll तैसाच सूर्यनारायण नभिचा, त्याचे तेजस्वी कर शुभ्र निष्कलंक  मेघांबूच्या मधून जाता होती सप्तरंगी पृथक क्षितिजावरचे इंद्रधनु ते किती आकर्षक दिसते!
रामप्रभुने क्षितीजा सीतामुक्तीस्तव तेच वापरले मज गमते  ll ll

   दि. २६//२००० ला लिहिलेल्या पत्रात बाकी मजकूर लिहिलेलाच आहे.
चि. सौ गीता हिला अनेक सप्रेम आशिर्वाद. श्री. मुकुंदराव मुले यांना सप्रेम आशिर्वाद.
  कळावे, लोभ असावा. ही विनंती.
            आपले - बाबा.

    दि. १० एप्रिल २००१ या दिवशी अगदी सकाळीच बाबांचे निधन झाले. आयुष्याच्या उत्तरार्धात काव्यप्रतिभा किती लीलया व्यक्त होत होती हे सांगण्याची गरज नाही. अजूनही या प्रतिभेचा आस्वाद घेता येईल अशी पत्रे आहेत. सवडीने ती प्रसिध्द होतीलच!

      संगीता पाटखेडकर.

        ११//२०१६.

No comments:

Post a Comment