Friday, 22 April 2016

अतूट ऋणानुबंध

गेले ते सुखी झाले, या जन्मीचे त्यांचे भोग सरले. काहींच्या मते पुढचा जन्म वगैरे नाहीच; त्यामुळे पुढे काही भोगायचा प्रश्नच नाही. किती छान!.........
  जीवनपट हा सुखदुःखाचा विणलेला ताणा - बाणाच! 
'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे 
जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे' - असे कवी म्हणतोच ना! 
कुणाच्या आयुष्यात किती सुखं आणि किती दुःख हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. कारण सुख कोणते आणि दुःख कोणते? याच्या निश्चित व्याख्या ज्याच्या त्यानेच ठरवाव्यात, हेच खरे की नाही! 
पुंडलिकाला मायबापांची सेवा करण्यात परमानंद, तर कुणाला त्यांचे ओझे मानण्यातच आनंद, कुणाला शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी होणार दुःख, तर कुणाला उद्योगात पुरेसे खाता आले नाही हे दुःख, कुणाला महारोग्यांच्या सेवेत सापडले जीवनाचे सार्थक, तर कुणाला लोकांच्या उपयोगी पडण्यात गवसतो जीवनाचा अर्थ! म्हणजेच काय? प्रत्येकाची सुखदुःखाची कल्पना असते निराळी. पण इतरांसाठी जगणारी माणसे निश्चितच असतात ना आगळी वेगळी.
पण शेवटी मृत्यू असतोच अटळ - अशा लोकांचा मृत्यू हादरवून टाकतो. 
 पुढे जर काहीच नसेल तर अशा व्यक्ती पुनःपुन्हा जन्माला याव्या आणि त्यांनी समाज उन्नत करण्यासाठी खूप प्रयत्न नेहमीच करत राहावा असे वाटणारच ना! 
न करणाऱ्यांचे काहीच वाटत नाही. 
 'आला आला प्राणी जन्मासि आला, गेला गेला बापुडा व्यर्थ मेला' - असेच उद्गार निघणार! 
खूप चांगले काम करणाऱ्यांची आठवण समाजाने ठेवणे, हीच त्यांच्या अमरत्वाची प्रचीती!
गेलेल्या लोकांची आठवण का येते? याचे उत्तर त्यांचे सत्कर्म हेच ना! मग सत्कर्मी जीवनाला 'ऐल नाही, पैल तैसा, मध्य ना'
पटते ना! पण तरीही सारखे किती कष्ट करायचे त्यांनी? त्यांचीच निवड नियती का करते? याचा विचार करायला हवा! 
नियती म्हणा, चैतन्य म्हणा, शक्ती म्हणा, देव म्हणा, ईश्वर की परमेश्वर म्हणा. तो प्रकट होतोच आहे, कोणत्या ना कोणत्या माणुसकीच्या रुपात. तेव्हा नन्नाचा पाढा लावणाऱ्यांना राहू द्या आकंठ सुखात नास्तिकतेच्या.
आम्ही तर आहोत जाहीर आस्तिक - POSITIVE.
सर्व ठिकाणी चैतन्य अमर आहे यांचा जयनाद देणारे.
'उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे
त्यांनाच पुससी तू, आहे, की तो नाही?' - म्हणतातच ना कुसुमाग्रजांसारखे साहित्यिक आणि आस्तिकही. 
माझे वडील अत्यंत आस्तिक, याचा मला अभिमान आहे. त्यांनी अनेकांची आयुष्ये घडविली; यामुळे आमची मान ताठ आहे. बाबा, तुमच्या स्मृतीस सादर समर्पण.(चैत्र कृष्णपक्ष द्वितीया-श्राध्ददिन)
 जीवनाच्या रामरगाड्याला तुम्ही आस्तिकतेच्या निष्ठेनेच तोंड दिले. 
 'सदासर्वदा देव सन्निध आहे
कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे' - हे रामदासांचे वचन सतत तुमच्या तोंडात असावयाचे. आजचा काळ पाहता वाटते; सुटले तुम्ही पुढच्या सर्व दुःखातून. शेवटी मरण हीच सुटका.
'आपुले मरण पाहिले म्या डोळा l तो सुखसोहळा अनुपम' - तुकाराम. मरणात खरोखर जग जगते. 
'आधी मरण, अमरपण ये मग ते' - भा.रा.तांबे. वगैरे वचने आठवतात. 
 विवेकानंदांनी आश्वासन देऊन ठेवले आहे की, एक ना एक दिवस माणूस परमोच्च पदाला पोहोचणारच! अशी Positive आश्वासने माणसांचे बळ वाढवितात. 
नकारघंटेत माणूस गर्तेत जाणार! 
तुमच्या स्मृतीप्रित्यर्थ हे सर्व मला लिहावेसे वाटले. असे म्हणतात की, मनापासून जर उद्गार निघाले तर ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.

    संगीता पाटखेडकर.
     २३/४/२०१६.

No comments:

Post a Comment