Monday, 25 April 2016

विजिगीषु निर्णय

निर्णय इतिहास घडवितो, इतिहास बदलतो. निर्णायक निर्णय तडीस नेताना वाटेत येणाऱ्या ब-या-वाईट अडथळ्यांना पार करणारे महाभागच शेवटी इतिहासाचे साक्षीदार होऊन इतिहासाचा मैलाचा दगड बनून जातात. काही निर्णय वैयक्तिक असले तरी त्या व्यक्तीशी संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावरही वैयक्तिक निर्णयाचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक विधानाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय, स्वतःच्या संदर्भात ती विधाने कशी लागू पडतात याचे प्रत्यंतर घेतल्याशिवाय, उदाहरणांनी विधानांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करुन पाहिल्याशिवाय त्या विधानांचे खरेखुरे महत्व समजणे कठीणच जाईल! 
  आयुष्य, मग ते व्यक्तीचे असो की समाजाचे की राष्ट्राचे की जागतिक की पारमार्थिक, ऐहिक की आध्यात्मिक, निर्णयांची अखंड मालिका असते. निर्णय घेतला तो बरोबर ठरला तर अर्थातच आनंद नाहीतर निर्णयक्षमता नसण्याचा शिक्का बसलाच म्हणून समजा! कोर्टाला, निर्णय देताना सबळ पुराव्यांचा आधार घ्यावा  लागतो. ते पुरावेही कितपत योग्य असतात हा प्रश्न पुन्हा अलाहिदाच! रामदासांनी 'सावधान' होण्याचा जो निर्णय घेतला तो त्यांच्याबरोबर अनेकांचे आयुष्य घडवून गेला. निर्णय घेणे एकवेळ तत्काल बरेचदा असते. तिरीमिरीतल्या निर्णयापेक्षा विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाची खात्री जास्त असते. तत्कालच्या निर्णयाला, भविष्य अंधारात जाण्याची शक्यता असते. शिवाजीने आग्र्याहून सुटकेसाठी पेटा-यांचा जो वापर करुन घेऊन शक्कल लढविली ती यशस्वी झाली म्हणून शिवाजी पुढचे कार्य करु शकला. नाहीतर काय झाले असते? उदाहरणांची मुळीच कमतरता नाही. कारण पावलागणिक निर्णय घेऊनच पुढे सरकावे लागते. 
 शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांमुळे, पाण्याच्या कमतरतेमुळे जे निर्णय घेतले जात आहेत त्यामुळे समस्या तर कमी होतीलच पण
 भविष्यकाळासाठी श्रमदानाचा पायंडा पडेल. अनेकांसाठी सोदाहरण देण्याजोगी ती घटना ठरेल. 
 राम-रावणाचे युध्द आणि कौरव-पांडवांचे युध्द ह्या आपल्या पूर्वेतिहासातील दोन महत्वपूर्ण घटना. अशी युध्दे झाली नाहीत असे म्हंटले जाते. पहिले महायुध्द व दुसरे महायुध्दही काही कमी नाही. सा-या जगाला हादरा देणारी ही युध्दे समाजजीवन विस्कळीत करुन गेलीत. हे निर्णय सा-या मानवजातीचा पाया ढिसूळ करण्यास कारणीभूत ठरले. 'मूल्य' या शब्दाला फक्त आर्थिक एवढाच अर्थ उरला. 'माणुसकी' हा शब्द तर दूरदूरपर्यंत दृष्टीपथात येईनासा झाला. 
मनाशी युध्द तर अखंडच चालू असते. काय योग्य, काय अयोग्य याचा नीरक्षीरविवेक माणसाला घडवत असतो. प्रत्येकाच्या योग्य, अयोग्यतेच्या व्याख्याही भिन्नच असतात. समूहात असताना माणूस कसा वागेल याचा नेम सांगता येत नाही म्हणतात. खरा माणूस ओळखणे खूपच कठीण आहे. मुखवटे घातलेले चेहरेच जास्तीकरुन दिसतात. 
'आला क्षण, गेला क्षण' असे जीवनाचे स्वरुप आहे. प्रत्येक क्षणाचा नितांतसुंदर उपयोग करुन घेण्याचा निर्णय माणसाला खचितच आनंद देणार! 
 एका नाण्याच्या दोन बाजू असतात. 'चित भी मेरी पट भी मेरी' म्हणणारे असतातच. सुवर्णमध्य साधणारेही असतात. 'वादे वादे जायते गुद्दागुद्दी' वालेही असतात. 'अनेकांचे हित' जेणेकरुन होईल असा निर्णय योग्य ठरेल. पण आजवरच्या राज्यक्रांत्या व एकूणच इतिहासाचा पडताळा घेतला तर मनुष्यहानी, वित्तहानी एकूणच पडझड खूप झाली आहे. तरीही माणूस तोंड देतोच आहे. ढासळून जावे अशी परिस्थिती असतानाही माणूस हिम्मतीने उभा राहिला आहे, असे अनेकवार घडले आहे, इतिहास घटनांची साक्ष हमेशा देतोच आहे; म्हणून सांगोपांग अभ्यास ज्या व्यक्तींचा असेल, अशा, अभ्यासू, विद्वान, व्यासंगी, कार्यतत्पर, जागृत आणि स्पृहणीय निर्माणकौशल्य असणाऱ्या व्यक्ती ज्या समाजात असतील तो समाज आदर्श म्हणावा लागेल. आपण म्हणतो जग जवळ आले आहे कारण या कानाची खबर त्या कानाला तेव्हाच कळेल अशी साधने उपलब्ध आहेत. माणूस जास्तीतजास्त चिकित्सक, जिज्ञासू आणि एकमेकांचे पाहून का होईना काही ना काही लोकोपयोगी कार्य करण्याच्या वृत्तीचा बनतो आहे. नैसर्गिक आपदांवरही विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू आहे. ही विजिगीषु वृत्ती खचितच अभिनंदनीय आहे. 
  शिवाजीला मुसलमानी सत्तेपासून महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या निर्णयात यश आले म्हणून इतिहास घडला व आधीचा इतिहास बदलला. 
'निर्णय इतिहास घडवितो व इतिहास बदलतो' हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे. निर्णय घेतल्यानंतर त्याची जबाबदारी ज्याची त्याची असते. जी वाट निवडली त्याच्यावर हिरवळ आहे की वणवा हे अज्ञातच असते; पण निवडलेल्या वाटेने चालणे याला बरेचदा पर्याय नसतो. 
'समुद्रमंथनाचा निर्णय' झाल्यानंतर त्याच्यातून अमृत, लक्ष्मी, कामधेनू वगैरे उत्तम गोष्टी निघाल्या पण विषही निघाले ते शंकराला प्राशन करावेच लागले. 'नीळकंठ' म्हणून, म्हणूनच तर तो प्रसिध्द झाला. सीतेचा त्याग करण्याचा निर्णय कठोर होता पण तो रामाने घेतला. पित्याच्या इच्छेसाठी वनवासात जाण्याचा निर्णय रामाशिवाय दुसऱ्या कुण्या मुलाने घेतला असता, असे अशक्यच आहे. रामाबरोबर लक्ष्मणाचा वनात जाण्याचा निर्णय, सीतेचे पतीबरोबर वनात जाणे हे निर्णय सर्वांसमोर एक आदर्श ठेवणारे निर्णय ठरले. इतिहास, इतिहास म्हणजे काय हो? जे अशक्यप्राय वाटते त्या वाटेने जाण्याची विजिगीषु वृत्ती ठेवणारेच इतिहास घडविणारे ठरतात. अर्थातच आधीच्या इतिहासाची सीमारेषा केव्हाच मागे टाकतात. असे अनेकानेक आहेत. शोधा आणि त्यांच्या निर्णयांचा आनंद लुटा.

     संगीता पाटखेडकर.
         २४/४/२०१६.

No comments:

Post a Comment