Friday, 15 April 2016

'रामकथेवरील गीतकाव्य'

   'गीतरामायण' माहीत नाही असा महाराष्ट्रीयन असेल का. दि. माडगूळकरांचे काव्य आणि सुधीर फडक्यांचे गायन हा समसमासंयोग महाराष्ट्राने पोटभर अनुभवला. 'रामकथा' हा आपल्या संस्कृतीचा आत्माच समजा ना! नसानसातून रामकथा अव्याहत वाहतेच आहे. ती पराकोटीच्या बंधुप्रेमामुळे की सीतेच्या पातिव्रत्यामुळे, की 'आदर्श राजा' या बिरुदावलीमुळे, की नीतिमत्तेचा आदर्श व्यक्त झाल्यामुळे?
 मर्कट सेनेने रामाला विजय मिळवून दिला या अद्भुततेमुळे की हनुमंताच्या दास्यभक्तीमुळे? कोणतेही एक कारण किंवा अनेक कारणे सांगूनही ज्याची निश्चित व्याख्या करता येणार नाही अशी या रामकथेची अवीट गोडी आहे.
  'स्वयें श्रीरामप्रभु ऐकती l कुश लव रामायण गाती' l - इथून गीतरामायणाच्या कथेचे सृजन झाले आहे. 'पुत्रभेटीचा घडे महोत्सव l परी तो उभया नच माहिती' l - इथे हे गीत संपते.
माडगूळकरांची प्रतिभा क्षणोक्षणी जाणवून देणारी शब्दकळा आपल्याला तेव्हाच कथेच्या गतीत बांधून टाकते.
    "स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक
    पुत्र उपजती निजकुलदीपक
 नृशंस ना कुणी, कुणी ना नास्तिक
  अतृप्तीचा कुठे वावर, नगरी, घरी, अंतरी" - अशी ही अयोध्या नगरी. पण कल्पतरुला फूल नसे का? वसंत सरला तरी ही व्यथा शोकाकुल करते.
  'गगन अम्हाहुनि वृध्द नाही का?
त्यात जन्मती किती तारका  अकारण जीवन हे वाटले' - ही कौसल्येची प्रतिक्रिया माडगूळकर नोंदवितात. अल्पाक्षरात खूप आशयाचा परीघ ते तेव्हाच साकारतात.
     'सरयूतीरी यज्ञ करु गे, मुक्त करांनी दान करु, शेवटचा हा यत्न करु गे, अंती अवभृत स्नान करु, ईप्सित ते तो देईल अग्नी, अनंत हातांनी' - असे दशरथ कौसल्येला समजावितो. मग यज्ञपुरुष दशरथा, घे हे पायसदान.
   "तुझ्या यज्ञि मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान l प्रसवतील त्या तीनही देवी l श्री विष्णूंचे अंश मानवी l धन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान" - असे म्हणून अंतर्धान पावतो. अगदी नेमक्या शब्दांची पखरण करुन कथाभाग पुढे सरकविण्याचे माडगूळकरांचे कौशल्य वादातीत आहे. अघळपघळ पाल्हाळ वाचताना, कंटाळा आणतो. माडगूळकरांचे काव्य पुढे काय?, याची उत्सुकता, कथा माहीत असूनही मनात सतत निर्माण करते, कारण कोणत्या शब्दसंपदा, कोणत्या कल्पना, कोणत्या भावभावना आपल्याला दिसतील याचा शोध नजर घेत असते. शब्दकळा इतकी ओघवती की मन त्याबरोबर प्रवाही बनते.
   "दोन प्रहरीं कां गं शिरीं सूर्य थांबला?
  राम जन्मला गं सखी राम जन्मला"
एकदम शब्दसमूह समोर येऊन,
   "दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
  गगनांतुन आज नवे रंग पोहती
 मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला" - हे चित्र समोर उभे करतो. रामजन्माचा आनंद वृत्तीवृत्ती ओसंडून टाकतो.
   "सावळा गं रामचन्द्र, त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण. सावळा गं रामचन्द्र उद्या होईल तरुण, मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण". कौसल्येचे पुत्रप्रेम व्यक्त होते होते तोच, 'ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोचि सर्वथा' - म्हणत विश्वामित्र प्रगटतो. लगेच, 'मार ही त्राटिका रामचंद्रा' म्हणत, 'बघती तव विक्रमां देव पुरुषोत्तमा, होऊ दे पौर्णिमा शौर्य चंद्रा' - हे शब्द, राक्षसांच्या वधाकरिता विश्वामित्राने राम लक्ष्मणाकडून कार्य करवून घेतले हा कथाभाग थोडक्यात सांगतात.
   'चला राघवा चला l पहाया जनकाची मिथिला' l - हा आवडता कथाभाग समोर आलेला आहे.
        'यज्ञमंडपी सुनाभ कार्मुक, ज्यास   पेलता झाला त्र्यंबक
त्र्यंबक देवें त्याच धनूनें त्रिपुरासुर मारिला.' - वगैरे माहितीही कवी देतो. कोणताही मुद्दा सुटता काव्य प्रवाही ठेवणे ही अशक्य वाटणारी गोष्ट माडगूळकर तेव्हाच सिध्दतेला नेतात.
  अहिल्येचे कथानक - ' तुझ्या कृपेची शिल्प - सत्कृति, माझी मज ये पुन्हा आकृति, मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन ही पाऊले' - या सुंदर शब्दात कथानक सांगून पुढची वाट कवी चालवितो.
  ' आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे
     स्वयंवर झाले सीतेचे'. यात सीतास्वयंवर कथाभाग माडगूळकरच व्यक्त करु जाणे!
 ऊर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती म्हणतात -
  'महाराणी तू आम्ही दासी l
  लीनसारख्या तव चरणासी l
   कधी कोणती आज्ञा देसी l
 तुझिया चरणी लीन राहू दे, सदा आमची मति' l अनुक्रमे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या भार्यांचे उल्लेखही आणि त्याही किती सीतेला मान देणाऱ्या याचे उल्लेख करायला कवी विसरत नाही. त्यातून रामाच्या तीनही भावांचे झालेले लग्न सुचवितात.
  'उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया
   नको रे जाऊ रामराया' - या शब्दात 'रामाला वनवास' हा कथाभाग येतो.
  'रामाविण राज्यपदीं कोण बैसतो?
 घेऊनिया खड्ग करी, मीच पाहतो'
लक्ष्मणाचे बंधुप्रेम क्रोधी स्वभाव.
 'निरोप कसला माझा घेता? जेथे राघव तेथे सीता' - हे सीतेचे उद्गार, मग अयोध्येचे नागरिक किती व्याकुळ झाले ते वर्णन बघा -  'गगननील हे, उषःप्रभा ही, श्री रघुनंदन सीतामाई चवदा वर्षे का अस्तंगत? चवदा वर्षे छत्र लोपता, चवदा वर्षे रात्रच आता उरेल नगरी का ही मूर्च्छित?
  थांब सुमंता, थांबवि रे रथ
 निषादराज गुह आणि नावाडीः -
 नकोस नौके, परत फिरु गं
   नकोस गंगे ऊर भरु
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करु चित्रकूट हा, हेच तपोवन येथ नांदती साधक, मुनिजन, सखे जानकी, करि अवलोकन  ही निसर्गशोभा भुलवि दिठी जमव सत्वरी काष्टें कणखर l उटज या स्थळी उभवू सुंदर l शाखापल्लव अंथरुनी वर l रेखुं या चित्र ये गगनपटी' - हे सर्व काव्यमय वर्णन निसर्गचित्र उभे करते.
 'अयोध्येस तू परत सुमंता,
 कुशल आमुचे कथुनी तातां
पदवंदन करी माझ्याकरिता
 तातचरण ते वंदनीय रे, शततीर्थांचे धाम'
   सुमंत म्हणतो आहे -
  'बोलत बोलत ते गहिवरले
कमलनयनीं त्या आसूं भरले
 करुणदृश्य ते अजुन सरले
 गंगातीरी - सौमित्रीसह - उभे जानकीराम.'  व्यक्तिचित्रणाचे माडगूळकरांचे सामर्थ्य वादातीत आहे. दशरथ शुध्दीवर येतो. त्याला श्रावण आठवतो.
  'मरणसमयी मज राम दिसेना
 जन्म कशाचा? आत्मवंचना
 अजुन तोडी जीव बंधना
धजेल संचित केवीं उघडूं मज मोक्षाचे द्वार?
क्षमा पित्याला करी श्रीरामा l पतितपावना मेघश्यामा l राम लक्ष्मणा सीतारामा l गंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकारश्रीराम - श्री - राम रा - - शब्द बघाःव्याकूळ होणारा सापडणे अशक्यच!
भरत म्हणतोः-
 'माता तू, वैरिणी
असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास हाच एकला ध्यास, येथुनी हीच एकली आस कालरात्रसी रहा इथे तू , आक्रंदत विजनी'
'भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो
येऊ दे पुढे जरा, कंठनाल छेदतो
कैकेयीस पाहू दे, छिन्न पुत्रदेह तो'
   लक्ष्मणाचा क्रोध भरत येताना पाहून कसा उफाळतो याचे वर्णन करायला माडगूळकर विसरत नाहीत.
मग प्रसिध्द गीत समोर येते.
'दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा'
   या ओळी अनेकांना मुखोद्गत असतील.
  भरत म्हणतो -
"चालवितो राज्य रामा, दुरुन तुम्ही येईतो
मोजितो संवत्सरे मी, वाट तुमची पाहतो
नांदतो राज्यात, तीर्थी कमलापत्रासारखा
मागणे हे एक रामा, आपुल्या द्या पादुका."
   शूर्पणखेचे कथानक -
  'कोण तू कुठला राजकुमार?
 देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार.' सीता म्हणतेः- 'तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणुनि द्या हो हरिण अयोध्या नाथा'
याचका थांबू नको दारात l घननीळांची मूर्त वीज मी, नकोस जाळू हात  कथाभाग पुढे सरकतो. श्रीराम म्हणतातः-  'ही तिच्या वेणिंतील फुले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊलें उजाड आश्रम उरे काननी l कोठे सीता जनकनंदीनी? काय भोगणे आता उरले?
चार दिसांचे चरित्र सरले l हे दुःखाचे सागर भरले l यात जाऊ दे राम वाहुनि'
  मग जटायूचे कथानक -
'हे पंख छेदिल्यावरती l मी पडलो धरणीवरती l तो थरथर कांपे युवती l तडफडाट झाला माझा, तिज कवेत त्याने घेतां l मम प्राण लोचनी उरला l मी तरी पाहिला त्याला l तो गगनपथाने गेला l लाडकी तुझी सम्राज्ञी आक्रंदत होती  जाता' l  शबरीचे कथानक - 'निजज्ञानाचे दीप चेतवुन l करिते अर्चन, आत्मनिवेदन l अनंत माझ्या समोर आले तेवुनिया नीलिमा.' - अत्यल्प शब्दात व्यक्तीत्व उभे करण्याचे माडगूळकरांचे सामर्थ्य बघा!
   सुग्रीवः- 'हनुमान, नील ऐका, मंत्री तुम्ही माझे, सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे आज्ञा प्रमाण यांची आता, मला तुम्हाला'
 कालावधीनंतर राम त्याला आश्वासन देतात - 'अंत्यघडी तुज ठरो मोक्षदा l सांभाळिन मी तुझ्या अंगदा l राज्य तुझे हे, ही किष्किंधा l सुग्रीवाच्या करी समर्पण  बालीवध ना खलनिर्दालन.'
 जांबुवान म्हणतो - 'तरुन जो जाईल सिंधु महान l असा हा एकच श्री हनुमान l करी हनुमंता, निश्चय मनसा l सामान्य तू या कपिजनसा l उचल एकदा पद वामनसा l घे विजयी उड्डाण' l
   हनुमान लंकेत जातो -
  'हीच ती रामांची स्वामिनी l चंद्रविरहिणी जणू रोहिणी l व्याघ्रीमाजी चुकली रोहिणी श्येन - कोटरी फसेपक्षिणी l हिमप्रदेशी थिजे वाहिनी l
  रामवर्णिता आकृति - मुद्रा,
 बाहुभूषणें, प्रवाळ - मुद्रा
 निःसंशय ही तीच सु - भद्रा
 हीच जानकी जनकनंदिनी.'
 माडगूळकरांचे व्यक्तिचित्रण सामर्थ्य वारंवार अधोरेखित होते.
  सीता रावणास काय म्हणते बघा -
'नको करुस वल्गना रावणा निशाचरा!
समूर्त रामकीर्ती मी, ज्ञात हे सुरासुरां.'
  काहीच ओळींचा उल्लेख करुन मनाचे समाधान होत नाही. पण असेच उद्धृत केले जाते की जे श्रेष्ठतम आहे.
  'मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
 मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची
 जोवरी तयांचे कुशल ऐकते कानी
 तोवरी सजीव मी असेन तैशा स्थानी
 जन्मात कधी का होईल भेट तयांची?
कुश लव म्हणून राहिले, लीलया उडुनी गगनात पेटवी लंका हनुमंत.'
 'वारा अग्नी, अग्नी वारा l नुरे निवारा l नाही थारा l जळत्या वेशी, जळे पहारा l नाचतो अनल मूर्तिमंत  बांधा सेतू, बांधा रे सागरी सेतू नच हा ऋतु श्रमांचा l विशाल हेतु श्रीरामांचा l महिमा त्यांच्या शुभनामाचा l थबकुनि बघतो संघकार्य हे स्तब्ध दिशा चारी l भुभुःकारुनी पिटवा डंका l विजयी राघव, हरली लंका l मुक्त मैथिली, कशास शंका l सेतुरुप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी' l
  शब्दकळा माडगूळकरांची अगदी मनापासून वाखाणण्याजोगी आहे. या काव्याला तोड नाही.
 'काय ऐकते? काय पाहते? काय अवस्था ही? रघुवरा, बोलत का नाही?
 रावणाचे कपटनाट्य रेखाटले आहे.
     राम सुग्रीवाला म्हणतो -
'जा सत्वर जा, जमवी सेना l करी रणज्ञा, सुयोग्य रचना l आप्त - सैन्यसह वधूं रावणा l व्यर्थ दवडी शौर्य आपुले l सुग्रीवा हे साहस असले l भूपतीस तुज मुळिं शोभले l जा, झणिं जा, रावणास सांग अंगदा l शेवटचा करी विचार फिरुन एकदा l नामहि तव भूमीवर कठिण राहणे आपणिली रामकृपा सुज्ञ बिभिषणेलंकेच्या भूषवील तोच नृपपदा' l
   कुशलव सांगत आहेत,
 'नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभीचे
अनुपमेय हो सुरु युध्द हे रामरावणांचे
द्वीप कोसळे, पडला घोडा l वर बाणांचा सडा वाकडा l हाणा मारा, ठोका तोडा.'
संहारार्थी अर्थ धावती. सर्व भाषितांचे युध्दवर्णनही खूप सुंदर केले आहे, माडगूळकरांनी. प्रसंगानुसार शब्द त्यांच्या साह्याला धावून येतात असे वाटते.
 कुंभकर्ण म्हणतो -
'योग्य समयी जागविले बांधवा, मला
लंकेवर काळ कठिण आज पातला.'
श्रीराम म्हणतात - 'आज का निष्फळ होती बाण? पुण्य सरे की सरले माझ्या बाहूंमधले त्राण.'
 गंधर्व आणि अप्सरा म्हणू लागल्या -
'देवहो, बघा रामलीला l भूवरी रावणवध झाला l श्याम राम हा धर्मपरायण l हा चक्रायुध श्रीनारायण l जगत्उत्पादक त्रिभुवनजीवन l मानवी रामरुप ल्याला l हा श्री विष्णू, कमला सीता स्वये जाणता असुन, नेणता l युध्द करी हे जगताकरिता l दाखवी अतुल रामलीला' l
  श्रीराम म्हणतात - 'किती यत्ने मी पुन्हा पाहिली तूं ते, लीनते, चारुते, सीते हे तुझ्यामुळे गे झाले l तुजसाठी नाही केले मी कलंक माझे धुतले l गतलौकिक गे लाभे रघुवंशाते l मी केले निजकार्यासी l दशदिशा मोकळ्या तुजसी l नच माग अनुज्ञा मजसी l सखी, सरले ते दोघांमधले नाते l लोकसाक्ष शुध्दी झाली सती जानकीची l स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची' l
    अयोध्यावासी म्हणतात -
 'त्रिवार जयजयकार रामा, त्रिवार जयजयकार l पुष्पकयानातुनि उतरले स्वर्गसौख्य साकार l रामराज्य या असता भूवर l कलंक केवळ चंद्रकलेवर l कज्जल रेखित स्त्रीनयनांवर l विचारातले सत्य आणतिल अयोध्येत आचार' l
   हनुमंत म्हणतो - 'प्रभो, मज एकच वर द्यावा l या चरणांच्या ठायी माझा निश्चल भाव रहावा l असंख्य वदनें, असंख्य भाषा l सकलांची मज एकच आशा l श्रीरामांचा चरित्र - गौरव त्यांनी सांगावा सूक्ष्म, सूक्ष्मतम देहा धरुनी l फिरेन अवनी फिरेन गगनी l स्थली स्थली पण रामकथेचा लाभ मला व्हावा' l
  सीता म्हणते - 'ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे l डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे.
मज उगा वाटते वनी विहारा जावे l
पाखरांसारखे मुक्त स्वरांनी गावे l
मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे?
पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे?
कठोर झाली जेथे करुणा l गिळी तमिस्त्रा जेथे अरुणा l पावक जिंके जेथे वरुणा l जे शाश्वत त्याचा देठ तुटे'
  खूप सुंदर वर्णनशक्तीची परिसीमा बघा -
  वाल्मिकी म्हणतात -
 'रघुराजाच्या नगरी जाऊन l गा बाळांनो, श्रीरामायण l नच स्वीकारा धना कांचना l नको दान रे, नको दक्षिणा l काय धनाचे मूल्य मुनिजना? अवघ्या आशा श्रीरामार्पण' l 'श्रीरामचंद्रार्पणमस्तु' म्हणून काव्य पूर्ण झाले.
 काव्याची शक्ती शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. मूळ काव्य बघा, आस्वाद घ्या आणि पूर्ण रामकथा माडगूळकरांनी जशी व्यक्तविली त्याच्या सामर्थ्याचा अंदाज जरी घेतला तरी धन्य व्हायला होते.
  सुधीर फडक्यांनी हे कथाकाव्य गाऊन लोकांसमोर सादर केले. तो प्रभाव तर अलौकिकच होता, पण माडगूळकरांची निवेदनशैली केवळ अजोड, अतुलनीय असाध्य आहे.

      संगीता पाटखेडकर.

         १५//२०१६.

No comments:

Post a Comment