आठवणी वा स्मृती यांना मुळातच एक सहज जात असा गोडवा असतो. आठवणी या प्रकाशझोतासारख्या असतात. रसिकमनाच्या परावर्तकावर परावर्तित होऊन स्मृतिविषय झालेल्या व्यक्तिमनांचे कंगोरे उजळून टाकण्याचे सामर्थ्य या प्रकाशझोतात असते. विशिष्ट घटनाप्रसंग, भाष्यात्मक वा प्रतिपादनपर शैलीत न होता, लेखकाच्या व्यक्तिमत्वाच्या चौकटीत बध्द न होता, संपूर्ण मानवी जीवनाची व्यापक पार्श्वभूमी या आठवणींच्या अनुभवाला लाभते.
व्यक्ती-स्थल-काल-परिस्थिती या चतुर्विध परिमाणानुसार वेगवेगळ्या त-हेने तो अनुभव जाणवू शकतो. संमिश्र, अनेकपदरी रुप या अनुभवांना येते.
अर्वाचीन आठवणीसंग्रहात स्मृतिविषय झालेली व्यक्ती - स्मृतिकथन करणारी व्यक्ती एकमेकात मिसळून जातात. व्यक्तीचे सामाजिक स्थान, चरित्रविषय व्यक्तीशी असलेले संबंध, जीवनविषयक दृष्टिकोन आणि घटनांचा अन्वयार्थ लावण्याची क्षमता या विविध घटकांमुळे अर्वाचीन चरित्रे आणि आत्मचरित्रे मन वेधून घेतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींचा, Barister - पी.जी. पाटील यांनी संपादित केलेला 'कर्मवीरोपनिषद' हा संग्रह यादृष्टीने अभ्यासण्याजोगा आहे.
जंव जंव जाणता तंव तंव नेणता - जीवनाच्या अनेक सुसंगती - विसंगतीने नटलेल्या, चैतन्यसंपृक्त व सदैव अनाकलनीय राहणाऱ्या विलक्षण अनुभवसृष्टीत प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे शोध घ्यावयाचा असतो.
प्रत्येक भाषेतील साहित्यात अनेक कथांचा खजिना असतो. कथाविश्वामुळे लहानपणापासून बालकाला आयुष्याचा अर्थ समजायला मदत होते. कथेचे माणसाला नेहमीच आकर्षण असते. कथा, आख्यान, पुराण अगदी रंजक रीतीने लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम निरनिराळे साहित्यप्रकार नेहमीच करीत आले आहेत. कीर्तन, प्रवचन, ललित, नाट्य, काव्य, सुभाषित, वाक्प्रचार, म्हणी हे सर्व प्रकार कथेला खूप रंजक बनवित असतात. जीवनाचा तळस्पर्श घडवून आणण्याचे फारच महान कार्य या कथा नेहमीच करतात.
विश्वास ठेवा की नका ठेवू. धृवाची कथा, नचिकेताची कथा, रामकथा, कृष्णकथा, शिवाजीची गोष्ट, अद्भुत कथा, रहस्यरंजक कथा, विज्ञानकथा आजवर पिढ्यान्पिढया सांगत आल्या आहेत. जिजाबाईने शिवाजीला घडविले असे आपण म्हणतो. तिने स्फूर्तिदायी कथा त्याला लहानपणापासून सांगितल्या आणि त्याच्या बालमनावर वीरश्रीचे, तेजाचे, संस्कार घडविले. इतका त्याचा पिंड मजबूत बनविला की, कोणत्याही संकटातून पार कसे व्हावयाचे याविषयी त्याची बुध्दीमत्ता, कार्यकुशलत्व अगदी योग्य त्या पध्दतीनेच कार्य करायला लागले. कसोटीचा पासंग कधी वाकड्या मार्गाने वळला नाही.
नारदपुराणाच्या पूर्वभागाच्या सातव्या अध्यायात गंगावतरणाच्या प्रसंगात श्रीसनक यांनी सूर्यवंशीय राजा बाहु याची एक विचित्र, चमत्कृतिपूर्ण इतिहासकथा सांगितली आहे. राजा बाहु धर्माचरणी, ऐश्वर्यसंपन्न होता, पण अहंकार उत्पन्न झाला. हैहय आणि तालजङ्ग कुळातील क्षत्रिय त्याचे शत्रू; त्यांनी आक्रमण करुन राजाचा पराभव केला. राजा गर्भवती पत्नीला घेऊन वनात गेला. और्व मुनीच्या आश्रमाच्या जवळ रोगाने पीडित होऊन राजाचा मृत्यू झाला, त्याच्या पत्नीने सती जाण्याचा निश्चय केला, पण और्व मुनीने समजाविले. 'तुझ्या गर्भात बालक आहे, आणि गर्भवती स्त्री सती जाऊ शकत नाही', असे सांगितले. मृताचा दाहसंस्कार कर असे सांगून सर्व कार्य करुन घेतले. राजा बाहु महान तेजाने प्रकाशित होऊन चितेतून निघाले व परमधामाला पोचले. ज्यांच्यावर महापुरुषांची दृष्टी पडते त्यांचे कल्याण अवश्यच होते. राणीच्या पोटी 'सगर' जन्माला आला. अशा कथा आपल्या पुराणांतून खूप आहेत. त्याद्वारे 'महापुरुषांची महती' पटते. जीवनदायिनी कथा व्यक्तित्व घडविण्यास मदत करतात; प्रेरणा देतात, म्हणून महान व्यक्तित्वांची चरित्रे, आत्मचरित्रे वाचावयास हवीत. आठवणी, आख्यायिका, दर पिढीला सांगत राहण्याने चांगले संस्कार तर घडतातच पण जीवन जाणायला खूप मदत होते.
'स्मृतिस्थळ' हे महानुभावपंथाचे नागदेवाचार्य यांच्या आठवणींचे एक सुंदर चरित्र आहे. बोलीभाषेमुळे ते सहजरम्य झाले आहे.
'माझी जन्मठेप', सावरकरांचे चरित्र, किती प्रसंगांना त्यांना देशभक्तीखातीर तोंड द्यावे लागले याचा उत्तम नमुना आहे. अशी चरित्रे, आणि 'स्मृतिचित्रे' सारखे लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचावयास हवे. 'श्यामची आई' हे सानेगुरुजींचे पुस्तक लहान मुलांनी अवश्य स्वतःजवळ बाळगावे. संग्रहणीय पुस्तके कोणती? हे जाणकारांना विचारावे व त्याचे परिशीलन केल्याने व्यक्तित्वविकासाला मदत होते.
वाचनसंस्कार हा पुढच्या आयुष्याला गती देतो, आणि इतके व्यक्तित्व प्रभावित होते की कुठेच कमी पडण्याची वेळ येत नाही. खूप सारे साहित्य आपल्या नशिबाने उपलब्ध आहे व आपली वाट पाहत आहे. स्वतः आनंद घेणे व दुसऱ्यांना तो उपलब्ध करुन देणे यासारखे महत्कार्य नाही. अनेक सारस्वतांनी उत्तम साहित्याची देणगी आपल्याला दिलेली आहे, त्याचा आस्वाद आपल्याला घ्यावयाचा आहे. त्या आस्वादाने मिळणारा आनंद अवर्णनीय असेल हे निश्चित!
अमेरिकेतही निरनिराळ्या 'लायब्ररी' मी माझ्या मुलाबरोबर (अमोलबरोबर) बघितल्या! 'लायब्ररी' ला विषयांचे बंधन नसते. विषय अगदी खाद्य पदार्थांच्या पुस्तकांपासून ते चित्र, शिल्प, संगीत, काव्य, नाटक, महिलांचे प्रश्न, सौंदर्यप्रसाधनांवरील प्रश्न असे अनेकविध असतात. अनेक लेखक, अनेक विचार यांनी विस्तारित अशा त्या 'लायब्ररी' असतात. वेळ अपुरा पडतो. आवडीचे पुस्तक शोधता शोधता इतके लेखक तुम्हाला खुणावतात की तुम्ही कधी कल्पनाही केली नाही अशी पुस्तके तुम्ही निवडता. जिथे जाल तिथे 'लायब्ररी' ला भेट देण्याची इच्छा प्रबळ होते. घरातल्या दोन गोष्टींवरुन त्या घराची ठेवण कळू शकते. एक लायब्ररी व दुसरे देवघर. स्वच्छता, खाद्यप्रकार, वेषभूषा, घरात व्यक्ती किती, यावरुनही व्यक्तीविचार कळतातच; पण सर्वांचा शेवटी एकच उद्देश असतो, जास्तीतजास्त निरोगी मन ठेवण्याचा! ज्या ज्या, त्यासाठी पोषक गोष्टी आहेत त्याचा अंगिकार मन करतेच करते. कितीतरी व्यायामप्रकार! आपण कोणते अंगिकारायचे, विचार करता करता प्राविण्य मिळविणा-या व्यक्तींची मोठ्ठी नामावली डोळ्यांसमोर उभी राहते; आणि विषयांना काहीच कमी नाही हे वारंवार प्रत्ययाला येते. जीवन विविधांगी, सर्व विषयांचा आवाका मोठा. सर्वच हस्तगत करु शकत नाही, ही जाणीव प्रकर्षाने बळावते व वेळेच्या सदुपयोगाची तीव्रतेने इच्छा निर्माण होते. एकातून दुसरे - आपोआपच निर्मित होते आणि जीवन पुढे सरकतच राहते. एकच लेखक वाचून समाधान होत नाही. अनेकांचा जिथे तिथे खचच खच असतो. जीवन किती अपरिमित आहे याची जाणीव माणसाला विनीत बनविते. हा साक्षात्कार माणसाला उंचीवर नेण्यास मदत करतो.
"हात मारितां अपुल्या भाळी
तिथेच फुटतो तिसरा डोळा
आणि उमगतो मुशाफिराला
अंधारातील देश निराळा." हेच खरे!
संगीता पाटखेडकर.
४/४/२०१६.

No comments:
Post a Comment