चैत्र महिना अनेक आठवणींना उजाळा देणारा महिना आहे. प्रमोदचा(माझा मोठा भाऊ) जन्मदिन चैत्रातला(२१ एप्रिल), माझे वडील(कै. सदाशिव मोरेश्वर मोहरीर) यांचे निधनही चैत्रातच झाले. मला श्री. मुकुंदराव गोपाळराव पाटखेडकर(माझे पती) बघण्यासाठी रामनवमीला आले होते. तेही सव्वातीन वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाले. त्यांचे वडील रामनवमीच्या दिवशीच स्वर्गवासी झाले होते. मोहरीर आणि पाटखेडकर ही दोन्हीही घराणी अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची व सर्व सणवार यथासांग पार पाडणारी होती. माझ्या सासूबाई(अन्नपूर्णाबाई पाटखेडकर) ह्या फक्त 'श्रीराम' लिहू शकत असत. त्यांचे पाठांतर खूप होते; पण इतक्या जुन्या काळात स्त्रीच्या शिक्षणाचा प्रसार नसल्यामुळे ब-याच हुशार स्त्रिया केवळ स्मृतींच्या, पाठांतराच्या भरवशावर, अनेक स्तोत्रे, अभंग, ओव्या यांचा नित्य जागर करीत असत. त्यात माझ्या आईची आई(सत्यभामाबाई सास्तीकर)हिचाही समावेश आहे.
तो काळ जेव्हा आठवतो तेव्हा गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंतचा काळ घरोघरी किती उत्साहाने साजरा केला जात असे याचेही चित्र मनासमोर आजही उभे राहते. श्री. बाळ त्रिपुरवार यांच्याकडे चंद्रपूरला रामनवमीचा मोठा उत्सव होत असे. ते आमचे मामा होते. तेही आज हयात नाहीत. रामजन्म देवळांमधून तर साजरा होतच असे; पण घरोघरी 'रामविजय' हा श्रीधर कवींचा ग्रंथ असावयाचा आणि त्याचे पारायण करण्याची पध्दत असे. बाबाही करावयाचे.
काळ खूप बदलला. नित्य काहीच नसते; पण एक गोष्ट बराच काळ टिकून राहते, ती म्हणजे लिखित स्वरुपातील त्या व्यक्तीचे हृद्गत म्हणजेच मनोगत!
बाबांची अनेक पत्रे माझ्याजवळ आहेत. खजिनाच आहे म्हणा ना! दोन पत्रे उद्धृत करते.त्यावरुन त्यांचे पत्र किती सर्व गोष्टींना प्राधान्य देणारे असावयाचे याचा पडताळा येईल!
ll श्री ll
मुंबई
दि. ८/६/१९९२
चि. श्री. मुकुंदराव आणि चि. सौ. गीता यांना अनेक सप्रेम शुभाशिर्वाद.
आम्ही चि. आशुतोषसह शुक्रवार दि. १५ मे १९९२ ला रात्री १०-१० च्या सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरहून निघालो. चि. श्री. आमोदराव व चि. सौ वृन्दा आम्हाला निरोप द्यायला नागपूर स्थानकावर आले होते. आरक्षण असल्यामुळे प्रवासात काहीच त्रास झाला नाही. आम्ही दुसरे दिवशी दुपारी ४ वाजता दादर स्थानकावर पोहोचलो. चि. अरुण स्थानकावर आलाच होता. Taxi ने आम्ही घरी सुखरुप येऊन पोहोचलो.
दि. १४-५-९२ ला चि. सुधीरचा Viva झाला होता. तो चांगला झाला. Viva घ्यायला आय.आय.टी. कानपूरचे डॉ. त्यागी आले होते. चि. सुधीरने नंतर त्याच्या शोधप्रबंधाची Hard bound copy आय.आय.टी. ला सादर केली.
आय.आय.टी. मुंबईचा दीक्षान्त समारंभ शुक्रवार दि. २९ मे १९९२ ला दुपारी ४ वाजता डॉ. गोविंद स्वरुप, professor of Eminence & Director, National Centre of Radio Astrophysics, Tata Institute of Fundamental Research(TIFR), Pune यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, व त्यात चि. सुधीरला P.H.D. पदवी मिळाली. आम्ही समारंभाला गेलो होतो.
शनिवार दि. ३०-५-९२ ला आम्ही रात्रीच्या सह्याद्री एक्सप्रेसने दादरहून निघून सकाळी ६ ला कोल्हापूर स्थानकावर पोहोचलो. आमच्याबरोबर चि. सुधीर, चि. सौ. कविता व चि. आशुतोष होते. आरक्षण असल्यामुळे त्रास झाला नाही. कोल्हापूर स्थानकावरच आम्ही दिवसभराची Taxi ठरविली. प्रथम धर्मशाळेत गेलो. तेथे स्नान केले. श्रीमहालक्ष्मीचे दर्शन घेतले. रंकाळा तलाव पाहिला. New Palace मधील म्युझिअम पाहिला. तेथील शाहू महाराजांचा दरबार, शस्त्रास्त्रांचे दालन, गेंडा, वाघ, चित्ता, अस्वल, सिंह, हरीण, रानमांजर इ. (पेंड भरुन ठेवलेले) यांचा कक्ष सुरेख आहे. तेथून नृसिंहवाडीला गेलो. हे रमणीय स्थान कृष्णा नदीच्या तीरावर आहे. तेथे कृष्णा उत्तरवाहिनी आहे. श्री दत्तात्रेयाच्या पादुका आहेत. श्री नृसिंह सरस्वती आपल्या पदयात्रेत येथे आले होते. नंतर ज्योतिबाला गेलो. ज्योतिबाचा डोंगर चढून मोटर वर माथ्यावर जाते. तेथून पाय-या उतरुन खाली ज्योतिबाचे मंदिर आहे. येथे दर रविवारी यात्रा भरते. ज्योतिबाचे दर्शन घेऊन पाय-या चढून वर आलो. नंतर पन्हाळगडावर गेलो. ज्योतिबापासून पन्हाळगड २५ किलोमीटर आहे. तेथे बाजीप्रभूचा दोन्ही हातांनी तलवारी चालवित असलेला भव्य पुतळा आहे. बावडी(पाय-यांची विहीर), तीन दरवाजा, अंबरखाना, धान्याची कोठारे, सज्जा चौक, संभाजीला पन्हाळ्यावर कैदेत ठेवले होते ती जागा, इ. स्थळे पाहिली. सज्जा चौक बराच उंच आहे. दगडी पाय-या चढून वर जावे लागते. सज्जाला चारी बाजूंनी कठडा आहे. तेथे भन्नाट वारा होता. तेथून दूरवरचे पहाड, द-याखोरी, त्यात वसलेली गावे, झाडी, इ. दृश्य विलोभनीय दिसते. शिवाजी महाराज येथून शत्रूंच्या हालचालींचे निरीक्षण करीत असत. ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळ्याचा घाट चढताना अनेक नागमोडी वळणे घेत असलेला रस्ता, एकीकडे उंच पर्वत व दुसरीकडे खोल दरी, खोऱ्यात वसलेली गावे इ. निसर्गरमणीय दृश्य मनोवेधक आहे.
पन्हाळ्यावरुन आम्ही परत कोल्हापूरच्या धर्मशाळेत आलो, व तेथून सामान घेऊन रात्री साडेनऊ च्या सुमारास कोल्हापूर स्थानकावर पोहोचलो. रात्री ९-५० ची मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस होती. तिने निघालो. आरक्षण फक्त पुण्यापर्यंतचेच मिळाले. दि. १/६/९२ ला सकाळी पुण्याला उतरुन चि. सौ. कविताच्या काकांकडे गेलो. त्यांच्याकडून दि. २/६/९२ ला निघून दुपारी ४ च्या एशिआड बसने रात्री ८-३० ला चि. अरुणकडे सुखरुप येऊन पोचलो. 'ही' ज्योतिबाच्या डोंगराच्या माथ्यावर Taxi ने आली, पण तेथून पाय-या उतरुन ज्योतिबाच्या दर्शनाला येऊ शकली नाही, तसेच पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेला बाजी प्रभूचा पुतळा, बावडी व तीन दरवाजा पाहिला, पण बाकीची ठिकाणे वर पाय-या चढून पाहावी लागत होती त्यामुळे ती पाहणे तिला शक्य
नव्हते. पुण्याहून मुंबईला बसने आल्यामुळे खंडाळ्याचा घाट व सृष्टिसौंदर्य अगदी जवळून बघता आले.
दि. ४/६/९२ ला चि. सुधीर, चि. सौ. कविता व चि. शरयू भिलईला गेले. ते दि. १२/६/९२ ला मुंबईला परत येतील. दि. १३/६/९२ पासून चि. सौ. कविताचे कनिष्ठ महाविद्यालय सुरु होणार आहे. तिची १९९२-९३ वर्षाकरिता पुनश्च नेमणूक झाली आहे. चि. मंजिरी आता पालथी पडते व पुन्हा उताणी होते. चि. सुधीरच्या लग्नाचा वाढदिवस दि. २० जूनला असल्यामुळे त्यानेच आमचे २१ जूनचे दुपारच्या साडेबाराच्या सेवाग्राम एक्सप्रेसचे दादर-नागपूर परतीच्या प्रवासाचे मागेच आरक्षण करुन आणले. आम्ही दि. २२ जूनला सकाळी नागपूरला पोहोचू आणि ते आवश्यकही आहे कारण चि. आशुतोषची शाळा दि. २३ जूनपासून सुरु होत आहे.
हे पत्र येथपर्यंत लिहून झाले असतानाच तुमचे पत्र मिळाले; त्यावरुन तुमचा सर्वांचाच मुक्काम चिखलद-याला आहे असे कळले, म्हणून अकोल्याच्या पत्त्यावर हे पत्र न पाठविता
चिखलद-याला पाठवित आहो. १ जूनला अकोल्याला बदली झाली नाही असे दिसते. चि. मृदुलाच्या निकालाची वाट पाहणे सुरु आहे.
चि. मृदुला, चि. अमोल व चि. विशाल यांना सप्रेम शुभाशिर्वाद. बाकी सर्व ठीक.
आपले - बाबा.
हे एक पत्र. यावरुन सविस्तर सर्व कळविण्याची त्यांची ओढ दिसते. केलेल्या विवेचनावरून इत्थंभूत त्या काळातील घटनांची माहिती मिळते. उल्लेख झालेल्या व्यक्तींसमोरही तो काळ उभा राहतो; त्यांनाही हे सर्व वाचताना आनंद होतो. पत्रांचे वैशिष्ट्य, त्या व्यक्तीची लिखाणशैली सांगून जाते. व्यक्ती, घटना व प्रसंग, स्थळे डोळ्यांसमोर साक्षात करण्याचे सामर्थ्य बाबांच्या लेखणीत होते. आपुलकी तर पदोपदी जाणवते. हे सर्व आज फार दुर्मिळ झाले आहे. मोबाईलचा, इंटरनेटचा जमाना. 'पत्रवाङ्मय' हरपले आहे.
आता दुसरे एक पत्र उद्धृत करते. पत्रे खूप आहेत. मोहरीर कुटुंबातील घटनांचा तारीखवार उल्लेख माझ्याजवळ आहे. कोणाला किती मार्क्स् मिळाले हे त्यात नमूद आहे. सर्व कुटुंबियांची जातीने दखल घेण्याची सवय आज खूप आणि खूपच दुर्मिळ झाली आहे. सहृदयता क्षणोक्षणी जाणवणारी ही बाबांची पत्रे माझ्याजवळचा सर्वात अमूल्य ठेवा आहेत. हा खजिना मी जपून ठेवला आहे.
ll श्री ll
नागपूर.
दि.१०/९/१९९९
चि. सौ. गीता हिला अनेक शुभाशिर्वाद.
तुझे दि. २९/८/९९ चे पत्र दि. २/९/९९ ला मिळाले. आता श्री. मुकुंदरावांची प्रकृती बरी आहे हे वाचून बरे वाटले. तुम्ही राखीचा सण व चि. अमोलचा वाढदिवस गोडधड करुन उत्तम रीतीने साजरा केला, याचाही आनंद झाला. तू व चि. अमोल माझ्या वाढदिवसाला येथे आल्याने मला खूप आनंद झाला. चि. प्रमोद व चि. विश्राम अनुक्रमे हैदराबाद व नाशिकवरुन आल्यामुळे त्या आनंदात आणखी भर पडली. माझ्या वाढदिवशीच पुस्तकाच्या प्रती घरी येण्याचा व त्यांच्या वाटपाचा मुहूर्त साधल्याने आनंद द्विगुणित झाला. तुझ्या स्तोत्रपठनाने व माझ्या गतवर्षी स्वरचित श्रीकृष्णाष्टकाच्या तू केलेल्या वाचनाने माझ्या वाढदिवसाच्या समारंभाला भगवंताचे अधिष्ठान लाभले.
"सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे"
या संतश्रेष्ठ समर्थ रामदासस्वामींच्या बहुमोल उपदेशाचे काकणभर का होईना, पालन झाल्याचे आंतरिक समाधान लाभले. माझ्यासारख्या प्रपंचपथिकाच्या पाठीशी परमेश्वर परायणतेचे पाथेय असल्यामुळेच तुमच्यासारख्या सप्तकन्यापुत्रांचा पिता होण्याचे परम भाग्य प्राप्त झाले. आयुष्याच्या अंतिम उंबरठ्यावर 'अमृत कलश' रचयिता कवी,
'मज्जीवनमणिमाला' लेखक आत्मचरित्रकार व 'अध्यक्ष महाराज' हा ३५० पानांचा ग्रंथ लिहिणारा निबंधमालाकार, असे त्रिविध यशाचे तुरे शिरी खोचून मी परमेश्वरचरणी आपले जीवनपुष्प भक्तिपुरस्सर अंतःकरणाने अर्पण करीत आहो, याचा मला खचितच हर्षोल्लासयुक्त आनंद आहे. माझी काहीही योग्यता नसताना या यशोशिखरावर त्याने मला नेऊन बसविले ही त्या प्रभूची किमया अगाध आहे. तुमच्या घरची दिवाळी आटोपल्यावर पाडव्याची अक्षत लावायला पंचमी पावेतो अवश्य या.
चि. श्री. मुकुंदराव, चि. मृदुला, चि. अमोल व चि. विशाल यांना अनेक सप्रेम शुभाशिर्वाद. विद्यार्थ्यांनो! जोमाने व नेटाने अभ्यास करुन मातापित्यांचे पांग फेडा.
चि. अमोल! तुझ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व अभीष्टचिंतन.
बाकी सर्व ठीक. कळावे, लोभ असावा.
तुमचे - बाबा.
बाबांच्या स्मरणाने जेव्हा चित्त व्याकूळ होते तेव्हा त्यांचा पत्रसंग्रह हा मला मोठा दिलासा असतो. दोनच पत्रेः- त्यांचे सर्व लेखनगुण व्यक्त करणारी ठरतील.
अशी पत्रे आहेत अनंत, वेळ मात्र मर्यादित, म्हणून येथेच थांबते.
संगीता पाटखेडकर.
१०/४/२०१६.
No comments:
Post a Comment