Friday, 8 April 2016

कालवैशिष्ट्य

आजचे कालवैशिष्ट्य असे की, Attention Span कमी झाला आहे. प्रत्येकजण इतका घाईगर्दीच्या वातावरणात जगतो आहे की लक्ष देण्याजोगत्या गोष्टींकडेसुध्दा तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही. साशंकता - काय होईल? - कसे होईल? - याची अनिश्चितता असल्यामुळे बरेच प्रभावी वाटणारे विचार आणि अभ्यास, सुध्दा बाजूला पडत आहेत; पण पाठपुरावा करायला हवा. 'मराठी भाषा' हा एक मुद्दा आपण उदाहरण म्हणून घेऊ. मराठी बोलणारे लोकसुध्दा इतर भाषांना - व्यावहारिक दृष्टीने जास्त उपयोगी व सोयीचे म्हणून महत्त्व देत आहेत. काही हरकत नाही. काळानुसार चालले पाहिजे. इतर भाषांशी वैर थोडेच आहे? उलट मी तर म्हणेन अनेक भाषांतील जी समृध्दता, आशय- विचारसंपन्न्ता आहे ती आवर्जून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा; पण याचा अर्थ हा थोडीच आहे की, आपल्या भाषेकडे लक्षही देऊ नये. नावाजलेल्या मराठी कुटुंबातूनही ही अनास्था दिसून येते. हे पाहून खेद होतो. साध्या साध्या मराठी शब्दांचे अर्थ माहित नसतात. 'प्रगल्भ भाषा' हे दूषण होणार की काय? मराठी भाषा खूप सुंदर, प्रवाही, परिपक्व  व भावभावनांचे आविष्करण करण्यासाठी  अत्यंत समृध्द अशी भाषा आहे. विचार-विनिमयाची खाण आहे.
      अनेक साहित्य सारस्वतांनी खूप सारे, भाषेला ललामभूत वाटावे असे वाङ्मय, अक्षर वाङ्मय, अभंग वाङ्मय, कालातीत व अजोड वाङ्मय शब्दबध्द करुन ठेवले आहे. इतके आहे की सगळे वाचणे अशक्यच! पण चुणून चुणून दर्जेदार, उत्तम वाङ्मयाचा आस्वाद प्रत्येक मराठी माणसाने घ्यावा ही अपेक्षा तरी निदान मला कराविशी वाटते. 'माझ्या भाषेचा मला अभिमान आहे' असे माथा वर करुन म्हणण्याची हिम्मत ठेवण्याचा काळ आला आहे. असो.
    सरकारतर्फे शिक्षणाचा प्रसार - प्रचार होतो आहे. ग, म, भ, न, अ, ब, क, ड, ई, येऊन; सही करता आली की झाले उद्दिष्ट साध्य, असे समजावयास नको. कितीतरी उत्तम साहित्य शिक्षणाच्या द्वारे प्रगत झालेल्या, ज्यांना आपण समाजाच्या निम्न स्तरातले समजतो त्यांनी निर्माण केले आहे, आणि कोणत्या समीक्षेच्या कसोट्या या साहित्याला लावायच्या हा यक्षप्रश्न टीकाकारांसमोर निर्माण करुन ठेवला आहे. अभिनव गुप्ताची रसमीमांसा असो की मर्ढेकरांचा सौंदर्यवाद, खांडेकरांची जीवनासाठी कला असो की ना. सी. फडक्यांची 'कलेसाठी कला.' सर्व समीक्षक आघाड्यांवर सर्वसामान्यांनी निर्माण केलेले साहित्य आव्हान देत दंड ठोकून उभे आहे. साहित्य निर्मिती ही फक्त पदवीधारकांची मिरासदारी नाही. शिक्षण नसतानाही 'प्रतिभा' हे मूल्य असे आहे की एखादी बहिणाबाई चौधरीही अमर साहित्य लिहून जाते. एखादी जनाबाई दळता दळता सुंदर ओव्यांची निर्मिती करते. आधीचे साहित्यकार काय 'डिग्री होल्डर' होते? त्यांच्यावर पदव्या मिळवाव्या, व समाजात मान्यवर साहित्यिक म्हणून मिरवावे, असे साहित्य  लिहून त्यांनी स्वतःचे नाव काळाच्या पटावर अजर आणि अमर केले आहे. सर्वात मोठा अनुभव, आणि शिक्षण तर जीवनाच्या शाळेतच मिळते.
     आमच्या मुलांना मराठी येत नाही याचे भूषण मानण्याची सध्या प्रथा रुढ होऊ पाहते आहे. ती फारशी गौरवास्पद नाही. पालकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून मातृभाषेचा आस्वाद घेण्याची रसिकता पाल्यात निर्माण करावयास हवी.
    गोपाळ गणेश आगरकर अत्यंत कठीण परिस्थितीतून, शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन, एकच सदरा व कितीतरी मैल शाळेसाठी पायपीट, अशा कठीण मार्गाने डिग्री संपादन करते झाले. १ जानेवारी १८८१ साली 'केसरी' व 'मराठा' ही वर्तमानपत्रे लोकांना समाजपरिस्थितीचे योग्य आकलन व्हावे यादृष्टीने काढली. पैसा मिळविणे व तो फक्त स्वतःसाठीच खर्च करणे हे ध्येय त्यांच्यासारख्या लोकांचे कधीच नव्हते. आगरकर, टिळक, न्यायमूर्र्ति रानडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर  अशांसारख्या महनीय व्यक्तींनी त्या काळाचा पट स्वतःच्या आदर्श विचारप्रणालीने भारुन टाकला होता. १ जानेवारी १८८० रोजी 'न्यू इंग्लिश स्कूल' काढले. जानेवारी महिन्यात १८८५ साली 'फर्ग्युसन कॉलेज' काढले. इतरांचे शिक्षण सुकर करावे म्हणून खूप प्रयत्न केले. शिकवितांना त्यांना वेळेचे भान कधीच नसे. विषय मुलांना समजलाच पाहिजे म्हणून ते उरस्फोड करीत. 'मेकॉले' हा त्या काळातील अभ्यासविषय. 'रासेलस' शिकवितांना ते रंगून जात. हुशारीचा, आगरकर एक आदर्श उदाहरण होते. साहित्य, समीक्षा, समीक्षा तंत्रवाद या सर्वांचा त्यांचा अभ्यास होता. टिळक हे राजकीय सुधारणांना प्राधान्य देणारे होते तर आगरकर सामाजिक सुधारणांना!
      कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींना रा.ब. बर्वे यांनी वेडे ठरवून, त्यांना अनेक शिक्षा करुन, त्यांचा छळ करुन खूप त्रास दिला. त्या रहस्याचा दंभस्फोट करण्याचे सामर्थ्य टिळक आणि आगरकरांमध्येच होते; पण वेळेवर कोर्टाला योग्य ते पुरावे सादर न करु शकल्यापायी त्यांना डोंगरीच्या तुरुंगवासाची सजा झाली. निकृष्ट प्रतीचे अन्न व आरोग्याची काहीच काळजी घेता येणार नाही अशी परिस्थिती यामुळे त्यांना दम्याचा विकार जडला. ही अशी उदाहरणे देण्याचे कारण समाजहितासाठी या लोकांनी प्राणांची बाजी लावली.
    विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी 'निबंधमाला' लिहिली. त्यांना तर 'मराठी भाषेचा शिवाजी' म्हणत असत. फक्त ३२ वर्षांचे आयुष्य चिपळूणकरांना लाभले. आगरकरही अल्पायुषीच ठरले.
     सात तारीख व जुलै हा सातवा महिना या ७७ व्या वर्षीच्या रात्रीला 'भीमरात्र' म्हंटले जाते. नवरात्रीतील नऊ दिवस महत्वाचे. शिवरात्रीचा दिवस महत्वाचा. 'भीमरात्र' जेव्हा माझ्या वाचनात आले तेव्हा मी एकदम उंचच उडले. काय कारण? तर ७/७/१९४५ ही माझी जन्मतारीख, व मी सध्या ७० वर्षे पूर्ण करीत आहे. येत्या ७ जुलै २०१६ ला! ७७ वर्षांचे आयुष्य जर मला मिळत असेल तर ७/७ तर आहेतच पण ७७ वर्षे आयुष्य! तर ती माझ्यासाठी भीमरात्र ठरणार! नाही का? काय असेल ही भीमरात्र म्हणजे? - मला बघायचे आहे. पण तेवढेच  नाही. राहिलेल्या आयुष्यात जास्तीतजास्त होईल, तितके कार्यही करायचे आहे. भीमरात्र सार्थक करायची आहे. बघू या काय होते ते!
      काही ना काही ठरविल्याशिवाय आपोआप तर काहीच साध्य होणार नाही ना! मग ध्येय ठरवावयाचे व तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावयाचा, एवढे तर आपल्या हातात नक्कीच आहे ना!

         संगीता पाटखेडकर.
         ८/४/२०१६.

No comments:

Post a Comment