रावणाने
सीतेला पळविले. जटायू - रावण
युध्द झाले. जटायूचे
मरण कशात आहे
हे रावणाने त्याला
विचारले. तुझे मृत्यंग
जर तू मला
सांगशील तर मीही
माझे मृत्यंग सांगतो
असे रावण म्हणाला.
माझे पक्ष उपटले
तर मला मृत्यू
येईल असे जटायू
म्हणाला. माझे चरणांगुष्ठ
फोडल्यानंतर माझा मृत्यू
असे रावण म्हणाला.
दोघांचे तुंबळ युध्द झाले.
त्यात रावणाची सरशी
झाली. सीतेला खूप
दुःख झाले. रावण
तिला घेऊन निघाला.
मातंग पर्वतावर सुग्रीव,
नळ, नीळ, जांबुवंत
आणि पाचवा हनुमंत
असे उभे होते.
सीतेने स्वतःचा पदर फाडून
त्यात तिचे अलंकार
बांधले व ती
पुरचुंडी यांच्या दिशेने अंतरिक्षातून
फेकली. ती पुरचुंडी
हनुमंताने उचलली व अंतरिक्षाकडे
पाहिले. सीता मोठमोठयाने
रामाचा धावा करुन
आक्रंदत होती. असा पहिला
हनुमानाचा उल्लेख 'रामविजय' या
श्रीधर कवीच्या ग्रंथात आठवतो.
'रामविजय' - अध्याय १५(कवी
श्रीधरस्वामी)
'कोणे सभाग्याची
वस्त l राक्षस नेतो चोरुनी'
l - म्हणून अत्यंत आवेशाने त्याने
उड्डाण' केले. धृवमंडळापर्यंत. रावण
भयभीत झाला. रावण
वेगाने लंकेत शिरला.
'पुढे यांचा सूड घेईन
l बहु गांजीन राक्षसा'
ती पुरचुंडी त्याने पृथ्वीच्या
पोटात लपवून ठेवली.
'रामविजय'
च्या अध्याय १७
मध्ये हनुमंताचा उल्लेख
जो आहे तो
रामविजयच्या शेवटच्या अध्यायापर्यंत राहणारच
आहे; कारण राम
पंपा सरोवराजवळ सीतेचा
शोध घेत येऊन
पोहोचला तो ऋष्यमूकपर्वतावर
वर उल्लेखिलेले पाच
वानर उभेच होते.
सुग्रीव घाबरला. सुग्रीवाला वाटले,
वालीने आपल्याशी युध्द करण्यासाठी
राम- लक्ष्मणाला पाठविले
आहे. त्याने त्याची
शंका हनुमंताजवळ बोलून
दाखविली. मी आत्ताच
त्यांचा समाचार घेऊन येतो
असे हनुमान म्हणाला.
पंपातीरावरील वटवृक्षाच्या तळाशी श्रीराम पहुडले
होते. त्या वटवृक्षावर
हनुमान येऊन बसला.
'हर्षे दावित वाकुल्या' असे
वर्णन.
'माझे चित्त स्नेहे करुन
l यासि देखोनि पूर्ण असे'
- राम म्हणतो.
'जो वोळखे कौपीन गुप्त
l तोचि स्वामी तुझा असे'
l - मातेचे वचन हनुमंताला
आठवते. लक्ष्मण ताबडतोब धनुष्यावर
बाण चढवायला तयार
झाला, पण रामाने
त्याला आवरले. हे सर्वच
श्रीधर कवीँचे काव्यमय वर्णन
खूप रसाळ आहे.
ग्रंथ इतका मोठा
आहे आणि वर्णन
अगदी कोणतीही घाई
कवीला नाही हे
जाणवून देणारे, स्तुती रामाची,
हनुमंताची अनेक विशेषणांनी
युक्त अशी की
वाचणारा थक्क होतो.
भरपूर वेळ ज्या
वाचकांजवळ आहे आणि
कथेतील रसाळपणाचा आस्वाद घेण्याची
श्रध्दा ज्यांच्याजवळ आहे त्यांनीच
या ग्रंथाला हात
लावावा. नुसते वाचन - कंटाळ्याने
केलेले काही आनंद
देऊ शकत नाही.
आस्वाद घेण्याजोगती मनाची तयारी
ठेवा व मगच
ग्रंथ उघडा, नेटाने,
रसज्ञतेने कवीची निवेदनशैली बघा.
इतका मोठा ग्रंथ
लिहिणे मुळीच सोपी गोष्ट
नाही, शिवाय कथेनुसार
वाचकाची उत्सुकता शिगेला पोचविण्याची
हातोटी कवीजवळ आहेच. त्यामुळे
काढा वेळ आणि
आयुष्यात एकदातरी वाचा ग्रंथ.
'कवी' म्हणजे ज्ञानी,
बहुश्रुत आणि व्यासंगी.
कवी स्वतःबरोबर वाचकालाही
कवेत घेऊ बघतो.
दोघांनी(राम आणि
हनुमंत) यांनी एकमेकांची पारख
केली आणि हनुमान
रामाचा अनन्य सेवक बनला.
हे सर्वच वर्णन
द्यायचे म्हंटले तर एक
ग्रंथच तयार होतो.
मला तसे काहीच
करायचे नाही. मला फक्त
रामविजयातील हनुमानाच्या दास्यभक्तीचे जे
दोन सुंदर अध्याय
आहेत, की जे
वाचून अक्षरशः डोळे
पाणावतात, त्याविषयी वर्णन करावयाचे
आहे.
अध्याय:- ३१
अहिरावण
- महिरावण कपटविद्येने रामलक्ष्मणाला नेतील
आणि काळिकेपुढे त्यांचा
बळी देतील यात
हनुमानाची काय भूमिका
आहे बघा. बिभीषणाच्या
प्रधानांनी हा कट
ऐकला आणि हनुमंताला
येऊन सांगितला. शेपट्यांचे
मोठे दुर्ग त्यांनी
सेनेभोवती उभारले. ते वरुन
उडून येऊन त्यांनी
रामलक्ष्मणाला उचलले. सात सहस्त्र
योजने लांब असे
विवर कोरले आणि
सात घटिकात त्या
दोघांना घेऊन गेले.
तेथून १३ सहस्त्रयोजने
लांब दधिसमुद्र ओलांडून
महिकावती नगरी होती.
नगराच्या मध्यभागी १० योजने
उंच असे भद्रकालीचे
मंदिर, दधिसमुद्रीतीरी ९० कोटी
राक्षस आणि 'मकरध्वज'
यांना रक्षणासाठी ठेवले.
निद्रिस्त, मौन अशा
रामलक्ष्मणाला नागपाशांनी बांधले. इकडे
सगळे वानरगण घाबरले
कारण मोठे विवर
दिसले आणि रामलक्ष्मण
दिसेनात. आक्रोश माजला. बिभीषण
म्हणाला, ही गोष्ट
जर रावणापर्यंत गेली
तर रावण युध्द
करेल.
'मग मारुतीपुढे
वानर l घालिती साष्टांग नमस्कार
l म्हणती तुजवीण रघुवीर l ठायीं
न पडे सर्वथा
l रामप्राप्तीसी कारण l तू सद्गुरु
आम्हांसी पूर्ण l कामक्रोध अहिमही
निवटोन l आत्माराम दाखवी' l
पूर्वी तू सीता
शुध्दी केलीस, आता रामाला
शोध. नळ, नीळ,
अंगद, जांबुवंत यांना
घेऊन हनुमान विवरात
शिरला. खूप अंधार,
कासावीस होऊन चौघे
जण मूर्च्छित पडले.
मग त्यांना बांधून
मारुतीने बाहेर आणले. शुध्द
वारा मिळताच ते
सावध झाले. रक्षणाला
बसलेले राक्षस आणि मकरध्वज
दिसले. मग यांनीही
वेष पालटले. महिकावती
तीर्थ पाहायला आलो
असे यांनी सांगितले.
यांच्यावर ते राक्षस
भिडले. सगळ्या राक्षसांचा या
पाच जणांनी मिळून
नाश केला. मकरध्वजालाही
पाडले. तेव्हा तो म्हणाला,
माझा जर पिता
जवळ असता तर
अशी वेळ येत
नव्हती. मग तो
म्हणाला, माझा पिता
म्हणजे मारुती! कसे काय?
लंकादहनानंतर जो स्वेद
निघाला तो मगरीने
गिळला. मी तिच्या
उदरी जन्मलो. मग
ती मकरीही आली.
विशाल स्वरुप दाखवा
म्हणाली. भीमरुप धारण केले.
अयोध्यानाथ सुखी आहे
असे तिने सांगितले.
उद्या त्यांचा बळी
देणार वगैरे वर्तमान
कथन केले. देवळात
जाऊन गुप्त रुप
धरुन बसा, असे
सांगितले. तुम्ही पाचही जण
माझ्या वदन नौकेत
बसा, मी तात्काळ
तुम्हाला पोचविते असे म्हणाली,
चार वानर भयभीत
झाले. आम्ही येथील
रक्षण करतो. सिंधूलंघन
तुमच्यावाचून कोणी करु
शकणार नाही. मग
एकटा मारुतीच पुन्हा
समुद्रपार करता होऊन
महिकावतीत आला.
अणुरेणुपेक्षा लहान रुप
धारण केले. राक्षस
अनेक कपटी अनुष्ठानें
देवळात करीत होते.
मद्य, मांस, विप्र
प्रेत पूजनासाठी होते.
देवळातील देवी या
महारुद्राने उचलली आणि न्हाणीत
टाकून दार लावले.
देवीच्या जागी स्वतः
बसला. सेंदुर सर्वांगाला
लावून भवानी झाला.
षड्र्स अन्नाचे पर्वत व
पूजासामग्री घेऊन राक्षस
आले. दार उघडल्या
जाईना. देवी क्षोभली
असे त्यांना वाटले.
रुद्ररुपिणी बोलली, धन्य तुम्ही
भक्त! बळीसी रघुनाथ
आणिता. माझे स्वरुप
खूप तीव्र आहे.
तुमचे डोळे जातील,
तेव्हा खिडकीतून पूजासामग्री समर्पा.
मग देवळाच्या वर
एक गवाक्ष तयार
केले.
'पंचामृताचे घट सकळ
l स्नानालागी ओतले l तो मुख
पसरोनि हनुमंत l घटघटां प्राशी
पंचामृत l नैवेद्य झडकरी येऊ
द्या!
अन्न ओतिती एकसरे l सव्य
अपसव्य हस्ते करुनी l स्वाहा
करी रुद्ररुपिणी l जैसा
दावाग्नी चेतवुनी l तो नाना
काष्ठें भक्षित l दधिधृतनवनीत l त्याचे
पाट सोडिले बहुत
l जैशा वर्षाकाळी सरिता धावत
l सागरासी भेटावया' l
प्रसाद बाहेर यावा
म्हणून लोहदंडाने पुजारी न्हाणी
ढोसत होते. तो
लोहदंड देवीला लागत होता.
प्रसाद काहीच बाहेर येईना.
रामलक्ष्मणाला आणले म्हणून
अनर्थ ओढवला असे
त्यांना वाटले. बरेच जण
निघून गेले. अन्नाचे
पर्वत ओतून देवी
तृप्त होत नाही.
पण आतून रुद्ररुपिणी
बोलली, मी संतुष्ट
आहे. शहाणे लोक
परत फिरले. राम-सौमित्र झडकरी आणा.
देवळात त्यांना घाला. त्यांना
मी गिळून टाकते.
३० कोटी असुर
घेऊन रामलक्ष्मणाला आणायला
अहिरावण- महिरावण
निघाले. नागपाश सोडून रामलक्ष्मणाला
रथाला दृढ बांधले.
रामलक्ष्मणाला मोहनास्त्र काढून घेऊन
सावध केले.
'संकटी पावेल उमारमण
l तरी हे क्षण
मात्रें विघ्न निरसोनिया जाईल
l आमचा हनुमंत साचार l येथे
जरी पावता सत्वर
l तरी असुर संहारिता'
l - असे रामाला वाटले.
'ऐकता रघुपतीचे
वचन l कपीचे नेत्री
लोटले जीवन l स्फुंद-स्फुंदोनी वायुनंदन l धरी
चरण श्रीरामाचे l मग
तो सीताशोकहरण l रुप
आपुले प्रकट करी
l दृष्टी देखता वायुनंदन l प्रेमे
दाटला रघुकुलभूषण l हृदयीं
धरिला आलिंगून l काय दृष्टान्त
देऊ येथे l पाठीराखा
कैवारी भक्त l मारुती ऐसा
नव्हेची' l
मी अनंत
अवतार घेतले. पण
तुझे उपकार मी
कल्पांतीही विसरणार नाही. गुप्तरुपाने
जाऊन दोघांचे धनुष्यबाण
मारुतीने आणले. दोघांना पाठीशी
लपवून पुन्हा देवीरुप
घेऊन अहिरावणाला म्हंटले
की, तू आधी
माझे दर्शन घे.
तो आनंदाने देवळात
आला. पायाने त्याला
रगडून चूर्ण केले.
मग पुजारी देवळात
उतरला. त्यांना कळले की
हा हनुमंत आहे.
बाहेर वार्ता फुटली
की सगळेजण मारुती
रगडून टाकतो आहे.
महिरावणाने युध्द पुकारले.
वायुपुत्राने रामलक्ष्मण खांद्यावर घेतले.
पायाच्या प्रहाराने दारे तोडली.
पुच्छाने देऊळ उडविले.
रामाने खाली उतरुन
कोदंड चढविले. महिरावणाचे
बाण रामाने उच्छेदून
टाकले. त्याचे रक्तबिंदु खाली
पडताच कित्येक महिरावण
तयार होत होते.
हनुमंत मगरीपाशी आला आणि
महिरावणाचे रहस्य काय विचारले.
तिने सांगितले, चंद्रसेनेला
जाऊन विचारा.(महिरावणाची
पत्नी)
अहिरावणाने तप करुन
शिवाला प्राप्त करुन घेऊन
वर मागितला की,
युध्दसमयी वर्षावे अमृत. अमृत
आणि रक्त एकत्र
होताच महिरावण तयार
होतील. पाताळात जाऊन तो
अमृतकुंड शोधून सगळे भ्रमर
(पर्वतासारखे शरीर असलेले)
मारले. (मारुतीने)
'भ्रमरमाळा शिवकंठी l ते
मिलिंद पाताळा जाती l अमृतचंचु
भरुनि वृष्टी l रक्तावरी
करिती त्या' l - असे
वर्णन आहे. चंद्रसेनेची
रामावर भक्ती असते. कृष्णजन्मात
तू सत्यभामा होशील
असे राम तिला
म्हणतात.
महिकावतीला मकरध्वजाची स्थापना
करुन राम, लक्ष्मण,
हनुमान निघाले. नळ, नीळ,
अंगद, जांबुवंत हेही
पुढे भेटले.
'हनुमंताचा
प्रताप समग्र l राजीव नेत्र
स्वये वर्णी' l
चंद्रसेनेचे कथानकही खूप
रंगविले आहे. श्रीधरस्वामींनी!
रामाशी गाठ घालून
द्या म्हणून ती
हनुमंताच्या पाठीमागे लागते. हनुमंत
म्हणतो, रामाची गाठ घालून
देतो पण मंचक
तयार ठेव. मंचक
जर मोडला तर
राम थांबणार नाहीत.
मग जो भ्रमर
वाचविला होता त्याला
मंचक कोरायचे काम
करायला हनुमान सांगतो व
अर्थातच मंचक मोडतो.
हे कथानक यासाठी
की हनुमंताला रामलक्ष्मणाला
वाचविण्यासाठी काय काय
करावे लागले. इतक्या
अडचणींवर मात करुन
हनुमंताने वेळोवेळी अप्रतिम कामगिरी
बजावली.
अध्याय३२:-
मयशक्ती
लक्ष्मणावर घालून रावणाने लक्ष्मणाला
मूर्च्छित केले. लक्ष्मण पडला
म्हंटल्यानंतर रामाचा आवेश आणि
त्याने रावणसेनेचा केलेला विध्वंस
पाहून रावण घाबरला.
सगळीकडे राम-राम
आणि रामच आहे
असे त्याला दिसू
लागले. अनुष्ठान करायचे रावणाने
ठरविले. भूमीत गुप्त गुहा
निर्माण केली. 'द्रोणागिरी' हनुमान
आणण्याची शक्यता आहे; तेव्हा
त्याच्या वाटेत संकटे उत्पन्न
करण्याची आज्ञा कालनेमी निशाचराला
केली. हनुमान द्रोणागिरी
आणू शकला नाही
तर पहाटेपर्यंत लक्ष्मणाचा
प्राण जाईल, तेव्हा
असे घडू द्या
अशी आज्ञा रावणाने
केली.
राम लक्ष्मणाचे शिर मांडीवर
घेऊन व्याकूळ होऊन
बसला होता.
'समय देखोनिया
कठिण l निर्वाणीचा सखा पूर्ण
l भूगर्भ रत्न शोकहरण
l उभा ठाकला ते
काळी l नमस्कारुनि जनकजामाता l म्हणे
काही न करावी
चिंता तृतीयप्रहर न
भरता l द्रोणाचळ आणितो'
'श्रीराम म्हणे हनुमंतालागोन,
सौमित्र तुझा याचक
जाण l यासि देऊन
प्राणदान झडकरी उठवी वेल्हाळा
l घेत उड्डाणावरी उड्डाण
l जयजय रघुराज म्हणोन वारंवार
गर्जतसे' l
द्रोणाचलाच्या आधी मंदराचल
पर्वत. तेथे राक्षसांना
शिष्य करुन कालनेमी
ब्राह्मणाच्या वेषात बसला होता.
(आश्रम तयार केला)
हनुमंत दिसताच खूप
मायेने तो पुढे
येऊन; खूप थकलेले
दिसता, आराम करा
म्हणाला. हनुमंताने फक्त पाणी
मागितले. तो शिष्यांना
म्हणाला याला सरोवर
दाखवा - जेथे विवसी(कृत्या) राहत असे.
तिने पाणी पिण्याला
येणाऱ्या अनेकांचे प्राण घेतले
असतात. हनुमंताने तिला मारले.
ती म्हणते, मी
देवांगना पूर्वीची, आता तुमच्या
हातून उध्दार झाला.
हा ब्राह्मण कोण
ही गोष्ट ती
हनुमंताला सांगते. कालनेमीचाही हनुमंताने
नाश केला.
द्रोणागिरी औषधवेली द्यायला
तयार होईना, तेव्हाच
पर्वतच उपटला आणि तळहातावर
धरुन हनुमान उडाला.
'अंतरिक्ष जाता हनुमंत
l चंद्र पाहता होय चकित
l म्हणे काय हे
अद्भुत l आकाशमार्गे जातसे' l
नंदिग्रामी भरताला असे
स्वप्न की त्याचा
उजवा हात कुणीतरी
पिळीत आहे. त्याने
वसिष्ठाला सांगितले. वसिष्ठाने शांतीसाठी
त्याला होम करायला
सांगितले. होमाच्या ज्वाळा वरपर्यंत
जात असताना त्याला
पर्वत घेऊन कुणी
जातो आहे आणि
तो होमात पडेल
असे वाटले. रामनामबिजांकित
बाण हनुमंताला खाली
पाडता झाला. त्याच्या
तोंडी नाम होते
रामाचे! हनुमंताने सर्व वर्तमान
सांगितले. मी रावाणापेक्षासुध्दा
तुला जास्त त्रास
दिला. रामनामांकित बाणाला
मी मान दिला.
एरवी माझे सामर्थ्य
रामप्रभु जाणतात. हनुमंत आला.
सुशेषाने मंत्रौषधीने द्रोण भरले
आणि त्यामुळे लक्ष्मण
पुन्हा चेतन झाला.
हनुमंताने भरताचा सर्व समाचार
रामाला सांगितला.
'स्वामी निःस्सीम भरताचे
भजन l
सप्रेम अद्भुत वैराग्यज्ञान
l
चकोर इच्छी रोहिणीरमण l तैसा
वाट पाहतसे' - अशी
भरताची स्तुती हनुमंताने केली.
एका रामभक्ताने दुसऱ्या
रामभक्ताला नावाजले. हा सर्व
कथाभाग वाचताना डोळे पाणावतात.
इंद्रजित(मेघनाद) रावणाचा
मुलगा. खूप शूर.
कोणतेही रुप घेण्याची
त्याला कला प्राप्त.
त्यामुळे त्याच्याशी युध्द करणे
कठीण. पण त्याचा
मृत्यू लक्ष्मणाकडून झाला. त्याला अमरत्वाचा
वर होता. पण
मृत्यू अशा व्यक्तीकडूनच
येणार होता जो
१४ वर्षे निराहारी
आहे व झोपला
नाही. असा एकटाएक
लक्ष्मणच होता. त्याची पत्नी
सुलोचना, ती पतिव्रता.
हे एक सुंदर
कथानक रामविजयमध्ये अवश्य
खूपच वाचनीय आहे.
'निर्जीव हस्तें लिहिले
पत्र l तरीच आम्ही
मानू साचार l जरी
हे हांसविल शिर
l प्राणपतीचे ये काळी'
l
सुलोचना इंद्रजिताचे शिर
मागायला रामाजवळ आली तेव्हा
बाकी सर्वजण म्हणाले
की प्रेताच्या हाती
'येथे शिर आहे'
हे हिला त्याने
लिहून कळविले, हे
आम्हाला मान्य नाही. ही
जर त्या शिराला
हासवून दाखवेल तरच आम्ही
मानू. त्यावर ती
पुष्कळ प्रयत्न करते. पण
शिर हासत नाही.
शेवटी म्हणते, 'जरी
पिता साह्य आणित्यें
येथ l तरी तुमचे शत्रु
समस्त l पराभविता क्षणार्धें l ऐसी
ऐकताच मात l गदगदां
तेंव्हा शिर हांसत'
l
सगळे वानर
रामाला विचारतात, काय कारणाने
शिर हासले? राम म्हणाला,
हिचा पिता सहस्त्रवदन,
तोच लक्ष्मण बनला
या जन्मीचा. सास-याने जावयाला
मारले. तो साह्य
कसे करणार होता?
म्हणून शिर हासले.
असे रसाळ
कथाभाग सांगत बसता येत
नाहीत, कारण असे
अनेकानेक आहेत. ग्रंथ थोडीच
लिहायचा आहे! तो
तर श्रीधर कवींनी
लिहिलेलाच आहे. तो
वाचण्यास प्रवृत्त करण्यासाठीची ही
एक युक्ती आहे.
हनुमान हा शिवाचा
अवतार आणि राम
हा विष्णूचा. या
धर्मप्रामाण्यानुसार दोघांनी राम-रावण
युध्दात परस्परांना साह्य केले
यात काहीच नवल
नाही. हनुमान रामभक्त
व राम शिवभक्त.
एवढे मोठे युध्द;
त्यात अनेकांची मदत!
वानरसेना - हे सर्व
देवगण. रामविजयात सीतेला शोधून
काढणे, समुद्र उल्लंघिणे, अशोकवनात
मुद्रिका सीतेसमोर टाकणे, लंकादहन
वगैरे. जे प्रसंग
आहेत त्यात हनुमानाची
भूमिका खूपच महत्वपूर्ण
आहे. पण या
दोन अध्यायात जे
वर्णन आहे ते
फक्त हनुमानामुळेच राम-लक्ष्मणाचे प्राण वाचले
याविषयीचे असल्यामुळे हे दोन
अध्याय मी लेखनासाठी
निवडले.
हनुमानजयंतीच्या या वर्षीच्या
(शुक्रवार २२ एप्रिल
२०१६) निमित्ताने मला
हा लेख लिहावासा
वाटला.
'जय श्रीराम',
'जय हनुमान'.
संगीता पाटखेडकर.
१८/४/२०१६.
No comments:
Post a Comment