Friday, 29 April 2016

ज्ञानवेध

   "समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा?
   कोठुनि फुलांपरी वा मकरंद मिळावा
  जात्याच रुक्ष या एकच त्या आकांक्षा 
 तव आंतरअग्नि क्षणभरी तरी फुलवावा"
    - कुसुमाग्रज.  खूप व्यंग्यार्थ प्रकटविणारी भावना. 
  "मधु मागसि माझ्या सख्या परी 
  मधुघटचि रिकामे पडति घरी" - असे भा.रा.तांबे खूप विनयाने म्हणतात. सारे आयुष्य ज्याने ज्ञानपिपासेत आणि काव्याचा आकंठ आस्वाद घेण्यात आणि देण्यात घालविले अशा व्यक्तींचे आयुष्य जीवनानुभवाचा पुरेपूर प्याला पिऊन झाल्यानंतर राहिलेल्या जीवनतळाच्या 'समिधा' बनलेल्या असतात. झिजून झिजून शुष्क झालेल्या 'समिधा'(यज्ञात अग्नी तयार करण्यासाठी, विशिष्ट वनस्पतींच्या समिधा आवश्यक असतात. त्या,त्या क्षेत्रातील पुरोहितांनाच माहीत असतात.) जीवनानुभवाला कोळून पिणारा व्यक्ती वयोवृध्दच असला पाहिजे असे जरुरी नाही. जीवनानुभवाचा कस घेण्याजोगते त्याचे वय नसले तरी परिस्थितीने तो इतका तयार झालेला असतो की ज्ञानवृध्द त्यालाच म्हणता येईल. 
   नाना पाटेकरांनी 'भूक आणि अपमान' याविषयी लिहिलेल्या अनुभवात हा पडताळा घेण्यात येतो. 'भाकरीचा चंद्र' ही नारायण सुर्वे यांची प्रसिध्द कविता आहे. ते गिरणी कामगार होते. कामगारांसाठी त्यांनी बरेच कार्य केले. मुंबईसारखे क्षेत्र, कामगार चळवळीत सहभाग, कामगारांविषयी जिव्हाळा आणि स्वतःही दलित समाजाच्या परिस्थितीला तोंड देण्यामुळे, शिवाय कवी असल्यामुळे साहित्यिक क्षेत्रातही त्यांच्या उद्गारांना मान्यता प्राप्त झाली. पाठ्यपुस्तकांतून त्यांच्या कवितांचा समावेश झाला. श्रीकृष्णाने दिलेल्या, द्रौपदीच्या थाळीला चिकटलेले पान खाऊन, तृप्तीचा ढेकर देऊन, द्रौपदीवरील, दुर्वास व त्यांच्या हजार शिष्यांची भूक भागविण्याचा, प्रसंग कृष्णाने निभावला. ही कथाही बरेच सुचवून जाते. 'भूक' ही सर्व आसक्तीची जननी आहे. भुकेला पर्याय नाही. 
   विश्वामित्राने सृष्टी तर तयार केली; पण त्याची ती सृष्टी शुष्क करुन टाकण्याचे काम इंद्राने केले. एक पानही जिथे शिल्लक नाही तिथे विश्वामित्राचीच भूक कशी भागणार? कोणत्यातरी घाण जागी आढळलेले शुष्क पान खाण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. अशी असते भूक - माणूस काय वाटेल ते करतो. 
 चपातीच्या सुवासाची सर कोणत्याही फुलाच्या सुवासाला नाही असे पाटेकर म्हणतातच, तसेच भाकरीमध्ये सुर्व्यांना चंद्राची शितलता दिसू लागते. जीवनाच्या ज्या मुलभूत गरजा आहेत, त्या तरी पुरविण्यासाठी ज्यांना हाडाची काडे करावी लागतात, असे बरेचजण आपल्या समाजात आहेत. प्रत्येकाच्याच प्रतिक्रियेला उजाळा मिळतो असे नाही. १ मे हा कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनही आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नेते प्रयत्न करीत आहेत. श्रीहरी अणे आणि मा.गो.वैद्य पुढाकाराने बोलत आहेत. प्रतिवाद होत आहेत. ही सर्व चर्चा प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे हे तर दाखवून देतेच; पण प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुणीतरी अटीतटीने पुढे येऊन 'आयुष्याच्या समिधा' केल्याशिवाय होणार नाही हेही दाखवून देते. 
  "अमुचा प्याला दुःखाचा l डोळे मिटुनि प्यायाचा l पिता बुडाशी गाळ दिसे l त्या अनुभव हे नाव असे" l - केशवसुत. 
 प्रत्येकाची प्रतिक्रिया भिन्न असते; पण आयुष्यातल्या अनंत दुःखाशी असलेली ओळख दाखवून देण्याचे कार्य करीत असते. 
  "आकाश अंत न कळोनिहि अंतरिक्षी
   आकाश आक्रमिति शक्त्यनुसार पक्षी"
  - वामन पंडीत. 
   काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, षड् विकारांच्या आधीन असलेल्या माणसाला अनुभवांची काय कमतरता? जीवनाची शाळा आपोआपच व्यक्तीला तरबेज करते. चांगल्या गोष्टींची प्रेरणा व्यक्तीला खूप पुढचा रस्ता सुकर करुन देत असते. एकदा वाट सापडली की - त्या वाटेने चालत राहिल्यास इतर वाटा येऊन मिळून रस्ता प्रदीर्घ होतो. रस्ता कधीच संपत नाही आणि चालणेही थांबत नाही. 
   "थांबला तो संपला l चालत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे" l - हे तर निश्चितच. वाटा चोखाळण्याची इच्छा वाढत जाते आणि ज्ञानाच्या कक्षा खूपच रुंदावतात. 'मळवाटा' तयार होतात. असे हे व्यासंगाचे रुप असते. 
   चरित्रे-आत्मचरित्रे हा विभाग जरी घेतला तरी पूर्वीपासून माणसाला, एक-दुस-याला कथन करण्याची जी हातोटी आहे, त्यातून कथा, आख्यायिका, दंतकथा विस्तारत गेल्या. जात्यांवर दळतांना काव्य स्फुरत गेले. वेदसुध्दा मुखोद्गत पध्दतीने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचले. 'लक्षात ठेवणे' ही जी बुध्दीची 'स्मृती' नावाची देणगी आहे त्याद्वारे तर माणूस कितीतरी गोष्टी इतरांपर्यंत पोहचवू शकतो. मेंदू हा इतका संग्राहक आहे की त्याच्या कार्यक्षमतेची बरोबरीच नाही. पाहिजे तितका उपयोग आपण करुन घेत नाही. क्षमता खूप पण उपयोग कमी अशी परिस्थिती आहे. तेव्हा उपयोग असलेल्या इतक्या कार्यशक्तीची हेळसांड करणे म्हणजे स्वतःच्याच पायावर दगड मारुन घेणे होय. 
  ज्ञान कोणीही चोरुन नेऊ शकत नाही. मनुष्य संपेल पण त्याचे ज्ञान जर त्याच्यानंतरही कोणी उपलब्ध करुन दिले तर त्याला मरण नाही. गोपाळ गणेश आगरकरांची जन्मशताब्दी त्यांचा लेखसंग्रह प्रसिध्द करुन करण्यात आली. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ७८ व्या पुण्यतिथीला त्यांचे निबंधमालेतील चांगले चांगले लेख (चुणून चुणून) संपादित करुन पुण्यस्मरण करण्यात आले. 
 'जीवनगौरव' ग्रंथ म्हणून अनेकांचे लेखही त्या विशिष्ट व्यक्तीच्या सन्मानार्थ प्रकाशित केले जातात. एकूण काय, आज काळ असा आहे की प्रत्येकाचे ओळखपत्र त्याच्याजवळ असतेच. व्यक्त होण्याची कलाही खूप उन्नत आहे, त्यामुळे इतिहासाला खाद्य भरपूर आहे. प्रत्येकाने हे खाद्य जास्तीतजास्त चविष्ट बनविण्याचा प्रयत्न केल्यास इतिहास खूपच समृध्द आणि सरस होईल.   
  एलिझाबेथ राणीचे खजिनदार Lord Baley ला राणीने स्पेन्सरच्या सर्व प्रसिध्द काव्याबद्दल काही इनाम दिले या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटले. यःकश्चित गाणे केल्याबद्दल एवढे इनाम! काय वेड आहे हे! असे आश्चर्योद्गार त्याने काढले म्हणतात. कोणा काव्याची कोणी फार प्रशंसा केली असता एका तत्वज्ञाचा उद्गार निघाला, 'अः यात काय आहे? या काव्याच्या योगाने बाजारात दाणे स्वस्त झाले की काय?' मला सांगा; अशा लोकांना उपयुक्तता या मूल्यापलीकडे दुसऱ्या कशाचेच गम्य नसते. 
      "इतर पापफलानि यथेच्छया
      वितरितानि सहे चतुरानन
     अरसिकेषु कवित्वनिवेदनं
शिरसि मा लिख मा लिख मा लिख"
    "हे चतुरानना, माझ्या पातकाबद्दल मला आणखी काय पाहिजे तितकी शासनें कर; पण बाबा, अरसिकाला कवित्व सांगत बसण्याची कटकट मात्र माझ्या कपाळी नको, नको, नकोच लिहू!" - या प्रार्थनेवाचून आणखी काय म्हणावे? 
   ज्ञानाला कोणत्याही बक्षिसाच्या मर्यादेत बसविता येत नाही. अधिकाधिक ज्ञानाचा हव्यास वाटणे हेच त्याचे बक्षिस आहे आणि हीच इतिकर्तव्यता! ज्ञानाची भूक माणसाला खूप उच्च पातळीवर नेते. या भुकेला खाद्य कधीच कमी पडणार नाही. जीवनयज्ञात जळून ज्या आयुष्यांच्या समिधा झालेल्या असतात व त्या समिधांचीही जी 'विभूति'(भस्म) तयार होते त्यामुळे ते 'विभूतिमत्व' खूपच सामर्थ्यशाली आणि प्रेरणादायी होते. एरवी कोणत्याही लाकडाच्या झालेल्या राखेला तशी काहीच किंम्मत नसते, पण 'भस्म' हे वैराग्याचे प्रतीक आहे. सर्व आयुष्याचा 'प्रसाद' जो वाटू शकतो तीच व्यक्ती खरी भजनमार्गी असते. खरे भजन म्हणजे तुमचा आहार, परिवेश, संस्कार, सर्वच आचार-विचार हे निर्मळ असावे लागतात. आयुष्याचा होम करणाऱ्या व्यक्तींचे विभूतिमत्व कालातीत, अजय, अमर असते. हा मार्ग अवलंबिणे अत्यंत कठीण, शुक्लकाष्ठ पाठीमागे लावणारे असते. मोठ्यामोठ्यांची तें तें फें फें होते. 
 'तेथे पाहिजे जातीचे l येरागबाळ्याचे काम नोहे' l 
   ज्ञानवेधाला कोणतीही मर्यादा अर्थातच नाही. नोबेल पारितोषिक मिळविणारे रविंद्रनाथ टागोर जसे आपल्याला आपले वाटतात, त्याचप्रमाणे विल्यम शेक्सपिअरही आपण विसरुच शकत नाही. ४०० वर्षे झाली त्याला जाऊन! जगभर आता त्याच्यावर निरनिराळे कार्यक्रम होणार आहेत. मृदुला, माझी मुलगी इंग्रजीची M.A. आहे. तिच्या निमित्ताने मीही तिच्या त्या M.A. च्या काळात इंग्रजी साहित्याचा आस्वाद घेतला. तिला शेक्सपिअरची स्वगतें पाठ असायची. शेक्सपिअर मनोवैज्ञानिक आहे की तत्वज्ञ, की शेतकरी कुटुंबातील ३ रे अपत्य असलेला एक भावनिक जिव्हाळा जपणारा सामान्य माणूस, की जागतिक कीर्तीचा प्रतिभावंत असे अनेक प्रश्न निर्माण करणारे त्याचे साहित्य हा जागतिक साहित्याचा मानदंड ठरला आहे. 'अमर साहित्यिक' आणि त्यांचा अभ्यास करायला जन्मानुजन्म अपुरे पडतील, कारण हा स्त्रोत कधी न संपणारा आहे. 
 प्रत्येक विषय, प्रत्येक भावना, प्रत्येक कलाकृती ही अविरत आपल्या 'ज्ञानवेध' चा विषय केल्यास तुम्हीच सांगा, वेळ कुठून पुरणार?

     संगीता पाटखेडकर.
        २९/४/२०१६.

No comments:

Post a Comment