Tuesday, 26 April 2016

स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती?

मोरोपंत पराडकर यांनी आपल्या प्रचंड ग्रंथसंभारापैकी बहुतेक सर्व महत्त्वाचे काव्यग्रंथ बारामतीस लिहिले. बारामतीकर जहागिरदार जोशी यांना पुराण सांगणे आणि रसिकजन संतोषाकरिता व परमेश्वर प्रसादाकरिता काव्यरचना करणे हेच दोन उद्योग त्यांनी नाईकांच्या आश्रयास आल्यानंतरच्या आयुष्यात केले. 
 केकावली रचल्यानंतर श्रीभगवान पंतांपुढे प्रत्यक्ष प्रकट झाले अशी आख्यायिका आहे. पूर्वी कवितांच्या भेंड्यांचा कार्यक्रम, शाळा, कॉलेजातून कवितांचे वाचन व पठन-पाठन व्हावे या उद्देशाने होत असे. स्पर्धा खूप गाजत असत. भेंड्यांच्या वह्या तयार केल्या जात. जुन्या मराठी घरांतून त्या त्या अक्षरांवरील कविता साठवून संग्रह घरोघरी साधारणपणे सापडतील. 
  'सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो, कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंघ्रि कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो' - ही केका अनेकांना पाठ असते. 
  'मुक्तमयुरांची भारतें' हा डॉ. ना. गो. नांदापूरकर यांचा डॉक्टरेट मिळविलेला प्रसिध्द ग्रंथ आहे. मुक्तेश्वर, मोरोपंत हे प्रसिध्द पंडित कवी. पंडिती काव्याचे प्रमुख आधारस्तंभ. पंडिती वळणाची भाषा म्हणजे लवकर समजणार नाहीत असे शब्द त्यांच्या काव्यात असणारच! तळटीपांशिवाय अर्थ कळण्याला भाषेचे ज्ञान त्याच तोडीचे असावे लागते. तळटीपा शोधाव्या लागल्या की समजावे त्या लोकांची भाषा आणि ज्ञान पराकोटीचे आहे. 
   कित्येक केका मला स्वतःला पाठ आहेत कारण भेंड्यांच्या स्पर्धांमध्ये आम्ही आवर्जून भाग घेत असू. पाठांतराची एक किमया असते. स्मरणशक्ती वाढविण्याचे सामर्थ्य पाठांतरात आहे; आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ते उल्लेख तुम्ही उद्धृत करु शकत असाल तर त्याचा आनंद काही वेगळाच आहे. आजच्या माझ्या लेखाचा उद्देश एवढाच आहे की, या केकांमधून नारदासंबंधीचे उल्लेख जाणवून देणे. 
 मी एकेक केकाही देते व त्याचा अर्थही सांगते. 
 केकाः- १) 'प्रभो तुज न मोहिनी भुलवि, मोहिला तोहि ती, त्यजी जन; नव्हे तशी, तुज तुझी कथा मोहिनी; निजानुभव तू पहा; जशी महौषधी पारदा, तुला स्थिर बळें करी, कळविले तुला नारदा'
  अर्थः-  हे ईश्वरा, मोहिनी इतरांना भुलविते खरी पण ती तुला भुलवू शकत नाही. ज्या इतरांना तिने भुलविले त्यांना (दैत्यांना) तिने टाकून दिले. तुझी कथा तशी नाही, ती तुला स्वतःला मोह पाडते.(नादावून सोडते.) हे पटवून द्यायला लांब कोठे जायची जरुरी नाही. आपल्या चरित्रातील प्रसंग तू आठवून पहा; म्हणजे तुझ्या लक्षात येईल की, ज्याप्रमाणे काही अमूल्य वनस्पतींच्या योगाने पारा स्थिर होतो, त्याप्रमाणे कथा तुला स्वसामर्थ्याने आपल्या ठिकाणी खिळवून टाकते, असे तू स्वतः नारदाला सांगितले आहेस. 
   केकाः- २) 'सुरर्षि जवळी स्वयें वदसि 'तत्र तिष्ठामि'; या तुझ्याचि वचनें म्हणे तुज कथावश स्वामिया! 
  जसा स्थिर कथेत तू, स्थिर करी तसे या मना, स्वभक्त सुर पादपा! सफळ हे असो कामना' 
 अर्थः-  देवांचा ऋषि जो नारद, त्याच्यापाशी तू 'माझे भक्त गाती जेथे l नारदा मी उभा तेथे' l - असे म्हणालास; या तुझ्याच वचनास अनुसरून मी तुला 'कथावश' (कथेच्या अधीन) असे म्हणतो. तुझ्या कथेमध्ये जसे तुझे अढळ वास्तव्य असते, तसे हे (माझे) मन कथेमधून हलणार नाही; असे कर. आपल्या भक्तांच्या कल्पवृक्षा! हा माझा मनोरथ सफल होवो!
 केकाः- ३) सुरर्षि म्हणतो, 'तुझे यशचि धन्य यो गायना मला; कवि म्हणोत, ते सुखद अन्य योगायना, विमुक्ति बहु साधनें तदितरे गणीनाच तो; सजूनि वरवल्लकी तव सभांगणी नाचतो'.
  अर्थः-  देवांना ऋषि नारद म्हणतो, "तुझे यशच सर्वोत्तम आहे; त्याचे गायन माझ्याकडून घडो. योग वगैरे अन्य मार्ग सुख देणारे आहेत, असे ज्ञाते लोक म्हणत असतील तर म्हणोत. मला ते मान्य नाही."
 मोक्ष मिळविण्याची जी इतर पुष्कळशी साधने आहेत, त्यांना तो मोजीत नाही; आणि आपली छानदार वीणा ('महती' नावाची) सज्ज करुन तुझ्या कथाकीर्तनाच्या मेळाव्याच्या जागेत भक्तिभराने नृत्य करतो. 
  केकाः- ४) 'तुझे चरित सन्मुखे श्रवण जाहलें यास्तव, प्रजापति सुतत्व ये, करिति साधु ज्याचा स्तव; स्वनीचपण मागिले बहु दया अशी नारदा 
स्मरे घडिघडी, प्रभो! भवपयोधिच्या पारदा' 
  अर्थः-  भगवत् भक्तांच्या तोंडून तुझ्या लीला ऐकण्यात आल्यामुळे तो नारद पुढील जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झाला. तो असा की, सगळे सज्जन त्याची कीर्ती गात असतात. संसार समुद्रातून तारुन नेणा-या परमेश्वरा! नारदाला आपली पूर्वजन्मीची निकृष्ट स्थिती (दलित अवस्था) आणि तू त्याच्यावर याप्रमाणे केलेली महान कृपा घटकोघटकी आठवते. 
   अजून एक केका देते. त्यात नारदाचा उल्लेख नाही, पण मोरोपंतांचे शब्दसामर्थ्य दाखविणारी ही केका मला आवडते म्हणून उल्लेखिते.
  'अतर्क्य महिमा तुझा, गुणहि फार बा! 
  हे; विधी श्रुतिज्ञहि म्हणे सदा, स्तविल आमुची कें वि धी? 
 तरी जन यथामति स्तवुनि जाहले सन्मति; स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती?' 
    सारे आयुष्य काव्याच्या भक्तिनंदात घालविणारे मोरोपंत - त्यांचे काव्य वाचल्यानंतर आपली शब्दसंपदा वाढली, भाषेचे माधुर्य आणि गोडवा आवडला आणि काव्यातील लय कशी असावी याचे लयदार वळण मनाला कधी चटका लावून गेले हे कळत नाही. ठसा म्हणतो ना, तो असतो असा वसा! काव्यामृताचे काही थेंब आस्वादिल्यानंतर पूर्ण अमृतकुंभच शोधणे, हेच घडते नाही का? 

        संगीता पाटखेडकर.
           २६/४/२०१६.

1 comment:

  1. सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटाने अडो;

    वियोग घडता रडो मन, भवच्चरित्री जडो ॥११८॥

    कृपया अर्थ समजावून सांगा

    ReplyDelete