Friday, 11 March 2016

नारायणी नमोsस्तुते

      'माया' असल्याशिवाय जगाची निर्मितीच झाली नाही. 'माया' हे स्त्रीवैशिष्ट्य. स्त्रीमुळेच सगळी नाती बांधली जातात. स्त्री ही आचार-विचार-संस्कृतीचे प्रतीकच! स्त्रीशिवाय जशी जगताची उत्पत्ती नाही तसेच तिच्यामुळेच तर आजतागायत सर्व काही यथास्थित चालू आहे. ' स्त्री स्वातंत्र्यमर्हति' मनू म्हणतो, पण आजची स्त्री कोणतेच बंधन मानायला तयार नाही. पुरुषाच्या बरोबरीने तिला सर्व हक्क हवे आहेत. तिने झटून, झगडून ते हक्क प्राप्तही केले आहेत. स्त्री पुढे गेलेली, पुरुषप्रधान संस्कृतीला नको असते. स्त्रीच्या मार्गात खोडे घालण्याचे प्रयत्न आजवर खूप झाले, होत आहेत होत राहतील पण स्त्री  कधी नामोहरम झाली नाही; तर पूर्वीपेक्षा जास्त जोमाने तिने तिच्यातील ऊर्जा हरघडी दाखवून दिली आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्र आज स्त्री हिरीरीने पादाक्रांत करते आहे. सीमेवर लढणारा सैनिक कशाच्या भरवशावर तिथे काम करु शकतो? इकडे त्याची आई, बायको, मुलगी खंबीरपणाने त्याला पाठबळ देत असते. तो राहिला नाही तरी स्त्री अखंड आयुष्याला तोंड देण्याची जबाबदारी नको त्या हिमतीने पेलत असते हे हमेशा आपण बघतोच! शेतकरी आत्महत्या करतात पण त्यांची बायको, मुलगी, आई यांना तर अजून हिमतीने परिस्थितीशी झगडावे लागते. एवढे तेवढे काही झाले की माणूस व्यसनांचा आधार घेता दिसतो. स्त्रीला नाही का मनस्ताप होत? पण ती व्यसनांच्या आहारी गेलेली दिसते का? सहनशक्ती हा स्त्रीचा फार मोठा गुण आहे. स्त्रीला पृथ्वीची उपमा दिली जाते. आज पृथ्वीवर जितके अत्याचार माणूस करतो, तसेच स्त्रीवरही होताना दिसताहेत. अत्याचार, बलात्कार, अपमान, हिंसा, पदोपदी तिच्या सामर्थ्याला आव्हान दिले जात आहे. आजच्या समाजात स्त्रीला काही मान आहे असे वाटत नाही. दररोजच्या बातम्या मन विदीर्ण करतात. याचे या 'पुरुषप्रधान' व्यवस्थेला चांगल्याच मोठ्या प्रमाणात शासन व्हायला हवे. स्त्रीप्रधान व्यवस्था आली तर? - विचार - विचारच राहणार, पण हरकत नाही. अशाही सर्व अटीतटीच्या वातावरणात 'स्त्री' खंबीर आहे, हे दाखवून दिले जातेच आहे.
     अगदी पुरातन काळापासून स्त्री ही त्या त्या समाजव्यवस्थेशी झगडतच आलेली आहे. मग ती सीता असो, अहिल्या असो, द्रौपदी असो, कुंती असो, झाशीची राणी असो, की अहिल्याबाई होळकर! 'कल्पना चावला' ला आयुष्य मिळाले नाही म्हणून, नाहीतर तिने आकाश दुमदुमवून टाकले असते. कोणत्याही परीक्षांचे निकाल बघा - स्त्री बुध्दीमती असल्याची, साक्ष पटवतात. आज 'जागतिक महिला दिन' आहे. स्त्रियांनो, जे जे गुण तुमच्यात आहेत त्यांचा सढळ वापर करुन अधिकाधिक उन्नती स्वतःची साधाच पण राष्ट्र घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे हे लक्षात ठेवून, सर्व सामर्थ्य पणाला लावून जगाच्या इतिहासावर आपले नाव कोरा!
     लक्ष्मी असो की सरस्वती, दुर्गा असो की काली, ते तुमचेच स्वरुप आहे. सर्व आघाड्या तुमच्या आहेत. दुर्गेने - कालीचे रुप घेतले राक्षसांचा नायनाट केला. अधर्माचा, असत्याचा नायनाट करणे हे स्त्रीच करु शकते याला इतिहास साक्षी आहे. सरस्वती ही बुध्दीची देवता आहे. हे 'स्त्री', ती तूच आहेस! तूच लक्ष्मी, तूच माता, तूच सहधर्मचारिणी, तूच मुलगी, तूच भावजय, तूच सून, तूच सासू, तूच मामी, तूच आत्या, तूच मावशी, तूच काकू, सर्वकाही तूच, तूच आणि तूच आहे. तूच जगावर अधिराज्य गाजविणारी 'नारायणी' आहे. शक्ती आहेस, सामर्थ्य आहेस बुध्दीही आहेस. मुळीच डगमगायचे कारण नाही. तुझ्याच भरवशावर आजपर्यंतचा इतिहास घडला आहे. नेहमीच घडत राहणार आहे. तू अजिंक्य आहेस. तुझी स्तुतिस्तोत्रे गावीत तितकी कमी! जिजाबाईने शिवाजी घडविला. सीतेमुळे राम जनमानसात पुरुन उरला. द्रौपदीने महाभारत घडविले. तुझ्याकडे सा-यांचे लक्ष आहे. राज्यसभा असो की लोकसभा, परराज्यमंत्री असो की गृहमंत्री, तुझे आसन कुणीही डावलू शकत नाही.
  'नमोsस्तुते, नमोsस्तुते, नारायणी  नमोsस्तुते
  जयोsस्तुते, जयोsस्तुते, लक्ष्मीदेवी जयोsस्तुते विजयोsस्तुते, विजयोsस्तुते, सरस्वती विजयोsस्तुते'.
  'दुर्गे दुर्घट भारी l तुजवीण संसारी l
   अनाथ नाथे अंबे - करुणा विस्तारी' l - अशीच सर्व जग तुझी प्रार्थना करणार आहेत.
     स्त्री ही क्षणाची पत्नी अनंतकाळची माता आहे. आज कुटुंबव्यवस्था धोक्यात आली आहे. याची सामाजिक कारणे शोधायला हवीत. स्त्रीवरच आरोप करुन चालणार नाही. पूर्वापार स्त्रीकडून खूप अपेक्षा केल्या गेल्या, त्यात आता बदल अपेक्षित आहे. संसार  यशस्वी करणे ही जबाबदारी फक्त स्त्रीची नाही. पुरुषानेही तिच्या अपेक्षांना समजून घ्यायला हवे आहे. कुटुंबव्यवस्था सुरक्षित राहिली तर आणि तरच 'वारसा' या शब्दाला अर्थ राहील.
     ढासळलेल्या नीतिमत्तेच्या पायावर समाजाची इमारत उभी राहू शकत नाही. समाजाचे आधारस्तंभ आपण आहोत या जबाबदारीची जाणीव मुलांपर्यंत पोचविणारे पालकच नीतीमत्तेची राष्ट्रनिर्मिती करु शकतात. परस्पर पूरकतेची जाणीव समाजाच्या सर्व घटकांनी ठेवावयास हवी. 'एकला चलो रे' ही अवस्था राष्ट्रघडणीला विघातक आहे. स्वातंत्र्य हे दुःखाची निर्मिती करणारे नको तर सुखनिर्मितीचे स्वातंत्र्य, संपन्न समाज, राष्ट्र निर्माण करेल हे का विसरले जात आहे?
  विघटन नको; घडण हवी! नाही का?

              संगीता पाटखेडकर.

               //२०१६.

No comments:

Post a Comment