Sunday, 13 March 2016

साहित्यिकांची बिकट वहिवाट

    "हमरस्त्याहुनि दूर, चिमुकलाच गाव, 
   डाकघराचाही जिथे नेणवे अभाव,
       कष्टकरी दीनांचा मूठभर जमाव,
    जीवन अज्ञात तिथे वाटे मज कोते" 
      - स्वप्नरंजन, कविता क्र.- ९२. 
        'सर्वा खल्वियं माया' या कवितेत माधव ज्यूलियन यांनी रेंदाळ या खेडेगावाच्या परिस्थितीचे चित्र चार ओळीत साकार केले आहे. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर(१ जुलै १८८७ - २२ नोव्हेंबर १९२०) यांचा जन्म कोल्हापूरजवळील रेंदाळ या लहानशा खेडेगावात झाला. फक्त ३३ वर्षांचे आयुष्य ते जगले. 
 "अजुनि चालतोचि वाट l माळ हा सरेना l विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना' l त्राण न देहात लेश, पाय टाकवेना, गरगर शिर फिरत अजी होय पुरी दैना l सुखकर संदेश अमित पोचविले कोणा, भार वाहुनि परार्थ जाहलो दिवाणा l काट्यांवरि घातलाचि जीव तयासाठी, हसवाया या केली किती आटाआटी l हेच खास माझे घर म्हणुनि शीण केला, उमगुनि मग चूक किती अश्रूसेक झाला! दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली, निकट वाटते जीवनसंध्या ही आली l कुठुनि निघालो, कोठे न जायचे ठावे, मार्गातच काय सकल आयु सरुनि जावे l काय निरुद्देश सर्व जीवन मम होते
मरुसरितेपरी अवचित झरुनि जायचे ते?
पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता,
या धूळित दगडावर टेकलाच माथा?"
   - मासिक मनोरंजन. मे - १९२० 
     'क्षणेक्षणे यन्नवतामुपैति' हा अनुभव ज्यात प्रत्ययाला येतो असे हे मराठी कवितेतले एक अजरामर आत्मपर भावगीत आहे. अवघे ३३ वर्षांचे आयुष्य, अनेक विदीर्ण करणारे जीवनानुभव यांचा संक्षिप्त आलेख यात आपल्याला आढळतो. नुसतीच कविता वाचली तर असे वाटते वयस्कर व्यक्तीची कविता असेल; पण जेव्हा कळते फक्त ३३ वर्षे तेव्हा धक्काच बसतो. मृत्यूपूर्वी ६ महिने त्यांना हे काव्य स्फुरले आहे. या गीताला धृपद नाही, त्यामुळे त्याची गती अनिरुध्द आहे. त्यांनी एवढे जरी एक भावगीत लिहिले असते तरी ते मराठी वाङ्मयात अमर झाले असते. त्यांची कविता सुरुवातीपासून निर्यमक आहे. 'विविध ज्ञानविस्तार', 'काव्यरत्नावली', 'ज्ञानांजन' व 'इंदुप्रकाश' इ. नियतकालिकातून निर्यमक रचनेचा वाद सुरु झाला. निर्यमक रचनेच्या मागे ते मुद्दाम लागले नाहीत. संस्कृत व इंग्रजी भाषांतील कवितांत जर यमक बंधनकारक नाही, तर ते मराठीत का आवश्यक असावे हा प्रश्न त्यांना सोडवावयाचा होता. आधुनिक बंगाली कवितेचे वाचनही यास्तव कारणीभूत झाले असावे. यमके कवितेच्या सौंदर्यात भर घालून त्यांचे माधुर्य वृध्दिंगत करतात असे द.मा.कुळकर्णी यांचे मत होते. निर्यमक रचनेचा वाद खूप गाजला. निर्यमक रचनेचा प्रयोग प्रथम रेंदाळकरांनी केला असे नाही. त्यांच्या जन्मापूर्वी दोन वर्षे अगोदर घंटय्या नायडू यांनी 'मैना' या लहान काव्यात तो केला होता. त्यानंतर १९०९ च्या बडोदे येथील सातव्या साहित्य संमेलनात न.चि.केळकर यांनी 'मराठी कविता व यमक' हा अभ्यासपूर्ण व विद्वत्ताप्रचुर निबंध वाचला होता. तो नोव्हेंबर १९०९ च्या विविध ज्ञानविस्तारात प्रसिध्द झाला आहे. निर्यमक रचना रुढ करण्याचे श्रेय मात्र रेंदाळकरांना द्यायला हवे. 
     केशवसुतांनी इंग्रजीतून सुनीत (sonnet) हा काव्यप्रकार व रचनाप्रकार मराठीत आणला. त्यांना माधवानुज, रहाळकर व तांबे यांनी पाठिंबा दिला. गोविंदाग्रज, बालकवी व रेंदाळकर यांनीही सुनीत हाताळण्याचा प्रयत्न केला. 
   सुनीत हा काव्यप्रकार फारच थोड्या कवींना उत्कृष्ट साधतो. सुनीतात एकामागून येणाऱ्या दोन भावना, दोन प्रसंग किंवा प्रसंगानंतरच्या भावना दाखविलेल्या असतात; त्यामुळे सुनीताचे दोन भाग पडतात. दोन्ही सारख्याच महत्वाचे असतात. दुसरा भाग हा पहिल्या भागाला केवळ पूरक नसतो, तर आवश्यक असतो. काही कवी पहिल्या भागाला आठ तर दुसऱ्या भागाला सहा अशी चौदा ओळींची विभागणी करतात, तर काही कवी बारा व दोन अशी विभागणी करतात. सुनीतात दोन भाग असले तरी दोन्हीत भाव एकच पाहिजे आणि दोन्ही भाग आपापल्यापरीने पूर्ण असून एकूण सुनीताच्या एकतेसाठी, पूर्ततेसाठी आणि सुसंवादितेसाठी आवश्यक आहेत. 'तू' या सुनीतात रेंदाळकरांनी तसा प्रयत्न केला आहे व त्यात ब-याच प्रमाणात यश मिळविले आहे. बघू या 'तू' हे सुनीत -

   "अहा! दिसति कौतुकस्तिमितलोचना  तारका!
   परागकण फेकितो सुरभिशीतमंदानिल 
  प्रमत्त जन डोलती भ्रमर मंजुगुंजारवे 
   तुझ्या विमल दृष्टिचा प्रचुर दिव्य आलोक हा 
   तुझे मृदुल लज्जित स्मित इथे तिथे नाचते! 
   त्वदीय मधुरालसोच्छवसनगंधरेणुव्रज
   भरी भुवनि देवि! हा अनिल गात संगीतिका! 
  गडे! जनन पावला तवचि कंठि वीणारव
   निनादमय अंबरा करि निज प्रभावे पहा
   मनोज तव रुप हे धरुनि सृष्टि सारी कशी      
अहा! मम विलोभना झटत आज जीवेश्वरी मनी वससि तू सदा सुमुखि! तेवि बाहेरही
नसे तुजविणे दुजे किमपि सर्व विश्वी प्रिये."  गुजराथीत सुनीतासाठी(sonnet) 'पृथ्वीवृत्त' योजितात असे म्हणतात. रेंदाळकरांचे प्रस्तुत सुनीत त्याच वृत्तामध्ये आहे आणि ते पूर्णतया निर्यमक असून यशस्वी झाले. एकमात्र कवितेच्या चिंतनात अंतर्बाह्य विलीन झालेल्या कवीने या सुनीतात तिचे स्तोत्र आलापिले आहे. या कवितेतील 'तू' किंवा देवी म्हणजे अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यकलाकामिनी, विश्वमोहिनी शारदा होय. गानलुब्ध, दावाग्नी, मुक्ता व बाष्पबिंदु ही सुनीतेही त्यांनी लिहिली आहेत. 
        १९१२, तेरा व चौदा ही तीन वर्षे रेंदाळकर मुंबईला मासिक मनोरंजनाच्या कार्यालयात सहसंपादक होते. रेंदाळकर सुधारणावादी होते. त्यांच्या अंतःकरणावर केशवसुतांच्या सामाजिक विचारसरणीचा ठसा उमटला होता. 
  'केशवसुतास' या कवितेत त्यांनी 'गंगौघापरि भव्य केशवसुता l सावेश वाणी तुझी' असा केशवसुतांच्या तेजस्वी विचारसरणीचा आणि ओजःसंपन्न वाणीचा गौरव केला आहे, आणि केशवसुत व म्हातारी या कवितेवर टीप लिहिताना त्यांनी 'कविकुलचक्रवर्ती' हा किताब दिला आहे. 
    चिपळूणकर आणि मंडळीने हरिभाऊ आपट्यांकडे महाभारताचा उपसंहार लिहिण्याचे कार्य सोपविले होते, त्यासाठी रेंदाळकर टिपणे तयार करीत होते. काव्यव्युत्पत्तीचा, सिध्दान्तकौमुदीचा व मीमांसेचाही त्यांनी अभ्यास केला होता अशी अनंततनयांची साक्ष आहे. १९१५ च्या सुरुवातीपासून १९१९ च्या मार्च अखेर रेंदाळकर पुण्यास हरिभाऊ आपट्यांच्या सान्निध्यात होते. इंग्रजी वाङ्मयाची लज्जत चाखवून चटक लावण्यात हरिभाऊ कारणीभूत ठरले. 
     संस्कृत, इंग्रजी आणि बंगाली या तीनही भाषांवर रेंदाळकरांचे इतके प्रभुत्व होते की त्यांनी काही अनुवादही मराठीत केले आहेत. १९१९ च्या मार्चमध्ये हरिभाऊंचा मृत्यू झाला. रेंदाळकर विषण्ण झाले. 'धर्मविचार', 'मनोरंजन', 'करमणूक' व 'विविधज्ञानविस्तार' या नियतकालिकांच्या कार्यालयात रेंदाळकर निरनिराळ्या काळी संपादक होते. संपादनाचे काम सोपे नव्हते. ज्यांचे साहित्य घेतले नाही त्यांचे आक्षेप असणारच! १९१५ च्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धामुळे कागद व छपाईच्या साधनांची महागाई होऊन 'मनोरंजना' चा प्रचंड व्यवसाय मोठ्या भांडवलाशिवाय यशस्वी रीतीने चालणे अशक्य झाले. रेंदाळकर पुण्यात 'करमणूक' कचेरीत सहाय्यक म्हणून आले. १९१७ मध्ये 'करमणूक' ही बंद पडले. 'तोरुलता दत्त' हिने अनेक फ्रेंच कवींच्या कविता इंग्रजीत उतरवल्या, त्या रेंदाळकरांनी मराठीत आणल्या. पुण्याच्या वास्तव्यात त्यांनी ब्लेक, बायरन, टेनिसन, लँडॉर इ. इंग्रजी कवींच्या कवितांना मराठी पेहराव दिला आहे. मधुसूदन दत्त, द्विजेंद्रलाल रॉय व रवींद्रनाथ ठाकूर यांच्या बंगाली कवितांचे मराठीकरण केले आणि कालिदास, बाण, शंकराचार्य, भर्तृहरी इ. च्या संस्कृत कृतींना मराठीत आणले. एकूण काय बिकट परिस्थितीत या कवीने खूप मोठा आवाका पेलला. सांसारिक स्थितीही ठीक नव्हती. बायकोला 'हिस्टेरिया' होता. दोन मुलींची जबाबदारी, त्यांना स्वतःला 'क्षय' झाला तरीही इतके कार्य त्यांनी केले. 
    अण्णासाहेब कर्वे यांच्या हिंगणे येथील    महिलाश्रमात रेंदाळकर संस्कृत व मराठी या भाषांचे व वाङ्मयाचे शिक्षक होते. तिथे त्यांना मलेरियाचा उपद्रव झाला म्हणून त्यांनी एक दीड वर्षातच हिंगणे सोडले. पुन्हा ते आनंदाश्रमात आले. हरिभाऊ आपट्यांना जलोदर होऊन त्यात ते गेले. रेंदाळकरांनी श्रीलक्ष्मीनारायण प्रेसमध्ये मुद्रित शोधकाची जागा मिळविली. तिथून 'विविधज्ञानविस्तार' हे मराठीतील सर्वश्रेष्ठ मासिक निघत असे पण येथीलही
काम तात्पुरते होते. नंतर ते कोल्हापूरास आले. त्यांनी सांगलीस मराठी  शाळेत शिक्षक म्हणून जागा मिळविली. तिथेही त्यांना २-३ महिन्यांहून अधिक काळ राहता आले नाही. ते त्यांच्या मोठ्या भावाकडे इचलकरंजीला आले. त्यांचा आजार बळावत होता. काही काळ ते गडहिंग्लज येथे त्यांच्या मित्राकडे, रावसाहेब चव्हाण(न्यायाधीश) यांच्याकडे हवापालटासाठी राहिले. त्यांचा शेवट २२ नोव्हेंबर १९२० ला दुपारी २-२ll च्या सुमारास झाला. 
    हा सगळा वृत्तांत सांगण्याचे कारण तो काळ, जिकिरीची परिस्थिती, तरी साहित्यिकांनी अपार मेहनतीने साहित्याचे संवर्धन केले हे कळावे म्हणून. रेंदाळकरांचे एक उदाहरण म्हणून फक्त घेतले. साधारण सर्वचजण जिकिरीच्या परिस्थितीतच असत, पण साहित्योपासकांची कमतरता 'शारदा-मातेला' कधीच पडली नाही. "म्हणोनि माझे नित्य नवे l श्वासोच्छ्वासही प्रबंध होआवे" l - हे ज्ञानेश्वरांचे दोन काव्यचरण त्यांनी आपल्या प्रत्येक काव्यकृतीवर उध्दृत केले आहेत. ही अपेक्षा प्रत्येक साहित्यकाराने ठेवायला काय हरकत आहे? त्यांच्या काळातील प्रसिध्द वाङ्मयीन नियतकालिकांशी संबंध असल्यामुळे त्यांनी साहित्यही खूप निर्माण केले व त्याचा प्रसारही झाला. सर्वच तशा मानमान्यता त्यांना मिळाल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कवितांचे खंड त्यांच्या मित्रांनी प्रसिध्द केले. विद्यापीठात त्यांची कविता अभ्यासग्रंथ म्हणून नेमण्यात आली. रामण्यक(Romantic) युगातील हा कवी तसा सतत भाषांच्या सान्निध्यातच वावरला. 
अनेक साहित्यिक - केशवसुत, गडकरी, हरी नारायण आपटे, सुमंत, नागेश, का.र. मित्र(आजगावकर), नेहमीच संबंधित होते. माधव ज्यूलियनांना त्यांच्यावर लिहावेसे वाटले हे लक्षणीयच म्हणावे लागेल. नंतर येणाऱ्या पिढीला आधीच्या पिढीची माहिती असणे हे केव्हाही पुढचे पाऊल टाकण्याच्या दृष्टीने उपयोगाचे असते. जास्तीतजास्त भाषा येणे हेच तर महत्त्वाचे, त्यातही त्या भाषेतील कवितेचे मराठीत अनुवाद करता येणे हे त्याहुनही महत्त्वाचे. हरि नारायण आपटे, ज्यांनी 'पण लक्षात कोण घेतो' सारखी साहित्यातील मापदंड असणारी 
कादंबरी (सामाजिक) व 'उषःकाल', 'गड आला पण सिंह गेला' सारख्या ऐतिहासिक कादंबऱ्या व कथासंग्रहही असे बरेच वाङ्मय लिहिले. कोणतीही परिस्थिती अनुकूल नसताना या सर्व साहित्यिकांनी ही जी वाङ्मयसेवा केली त्याला तोड नाही. वाङ्मयाच्या इतिहासात मानाचे पान मिळणे याहून गौरव तो कोणता? 'काळावर मात' ती कोणती? 
    कवींच्या काव्याचा अभ्यास कधीच संपत नसतो. 'कवी' याचा अर्थ तसा गाणारा आहे. 'गेयता' हा काव्याचा प्रमुख गुण. कविता ही अल्पाक्षरी पण बहुअर्थ प्रसवा असते. नेमक्या शब्दात विश्व आकळण्याचे सामर्थ्य फक्त कवितेतच असते, म्हणून कवितेचा अभ्यास करणारा रसिक आपोआपच विश्वव्यापक जाणिवेचा 'धनी' होतो. 
     रसिकहो, कवींच्या काव्याचा आस्वाद घ्या व निरंतर आनंदाचे स्वामी व्हा - हेच माझे कळकळीचे सांगणे आहे. साहित्यविश्वात डुंबणे, यासारखा आनंद नाही. 

      संगीता पाटखेडकर.
         १३/३/२०१६.

No comments:

Post a Comment