Wednesday, 2 March 2016

पण मोदक कुठे आहे?

   जेव्हा आपल्याला खूप इच्छा असतात तेव्हा अहम्, अहंकार, अभिमान आणि उध्दटपणा हा अधिक असतो. एखाद्या घाणेरड्या कपड्याने आपण आपला चेहरा पुसू शकत नाही. इच्छा ही कमी केली पाहिजे म्हणजे बुध्दी ही जास्त तीव्र बनते.
   कोणतेही शास्त्र किंवा त्याचा अभ्यास याला एखाद्या जंगलाची उपमा द्याविशी वाटते.जंगलात हरवणे, वाट चुकणे हे प्रकार होतातच! जंगलात घर करावे लागते. केवळ घरात बसून जंगलाच्या कथा ऐकणे पुरेसे नाही. काही वर्षे या जंगलात राहा. मग त्यातले मार्ग, पायवाटा, चढ, उतार, धोके, महाभयानक सर्प, अन्न, वा-याची जागा, आश्रयस्थान(निवारा) या सगळ्यांचा अभ्यास करता करता खरे जीवनाचे स्वरुप आकळेल! श्रीराम चित्रकूटाला १३ वर्षे राहिले; म्हणून 'रामायण' घडले. अजरामर जीवनांचा अभ्यास इतरांना करता आला.
   अजरामर झालेली जीवने जर आपण बघितली तर एकच गोष्ट स्पष्टपणे जाणवते की सर्वकाही विसरुन या लोकांनी निदिध्यासाने कार्ये केली. प्रसिध्द गणितज्ञ 'रामानुजम' यांना ३२ वर्षांचे आयुष्य फक्त लाभले, पण गणिताचा ध्यास घेतला. आईनस्टाईन - गुरुत्वीय लहरींविषयीचा १०० वर्षांपूर्वीचा शोध आता नुकताच सिध्द झाला. अजूनही संशोधन चालू आहे. ब्लॅक होल एकमेकांभोवती फिरतात, कृष्णविवराचे अस्तित्व आहे - हे संशोधन विश्वपातळीवर होत आहे. खूप काळ, खूप परिश्रम, खूप अभ्यास, एकदम काहीच साध्य होत नसते. प्लेटो, सॉक्रेटिस, Aristotle सारखे पाश्चात्त्य तत्वज्ञ असोत की ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्यासारखे भारतीय- महाराष्ट्रीयन संत असोत, प्रत्येकाने ध्यासाने आयुष्याच्या कठीण वाटा चोखाळल्या. एवढी मोठी पृथ्वी, तिच्या सर्व इमारती आणि लोकसंख्येसहीत तिच्या व्यासाभोवती फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते तरीही आपल्या कपातील चहा सांडत नाही, आणि आपल्याला हे फिरणे जाणवतही नाही, दर nano सेकंदाला घडणारा चमत्कार आपण लक्षातही घेत नाही. एका जादूच्या विश्वात आपण जीवन जगत आहोत, जिथला जादूगार दिसत नाही. रोज चमत्कार तो घडवित आहे पण ते आपण लक्षात घेत नाही.
    गांधी, विनोबा, बाबा आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, प्रत्येक क्षेत्रात अनेक नररत्ने दिसतात. त्यांची जीवनश्रध्दा, त्याग, संयम, विचारसरणीचा आवाका बघास्वतःसाठी होते काय त्यांचे कार्य? 'स्व' गळून पडला म्हणून ते महान कार्य करु शकले.
   कोणतेही कार्य निष्ठेने करणे म्हणजे कार्यपूजा. पूजा सफल व्हावी, कार्य परिपूर्ण व्हावे ही इच्छा असतेच ना! मग पूजा घेणाराही म्हणतो, 'मोदक कुठे आहे?' गणपतीला तुमच्या श्रध्देचे, निष्ठेचे, दिर्घोद्योगाचे, आसक्तीरहिततेचे २१ मोदक आणि २१ दुर्वांची जुडी तुम्ही वाहिली तर आणि तरच जीवनकार्य सफल होणार!
आसक्तीविरहित कार्य म्हणजेच परमेश्वर प्राप्ती. खरे ना! इतिहासाच्या पानापानावर सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली नावे त्यागमय जीवनकर्त्यांचीच आढळतील! जीवनाचा धांडोळा घेताना वेळ खूप छान जातो आणि वृत्ती निरामय होते. या मोदकाचा प्रसाद घेऊ या!

    संगीता पाटखेडकर.

      //२०१६.

No comments:

Post a Comment