Monday, 7 March 2016

नीर-क्षीर-विवेक

     'हे घेऊ की ते घेऊ l दुकान उचलून की नेऊ' ही अवस्था फक्त लहान मुलाचीच होत नाही तर प्रत्येकजण या इच्छांच्या हव्यासात मग्न आहे. सगळ्यात जास्त सोबत माणसाला कुणाची असेल तर ती इच्छांची! 'जबतक सांस तबतक आंस'. लहानवयात चिंचोके, सागरगोटे, पतंग, गोट्या, पाटी, पेन्सिल, पेन इतके प्रिय की, जीव की प्राण. शाळेतल्या मुलाला शिकविणारा मास्तर म्हणजे अगदी आदर्श. त्याच्यासारखे होण्याची इच्छा. मोठे झाल्यावर मग ती इच्छा किती खुळचट होती हे लक्षात येते. ज्या क्षेत्रात, ज्या कुणी, यश मिळविले तसे व्हावेसे वाटते. कितीतरी क्षेत्रे कितीतरी यशस्वी व्यक्ती - जीवन विविधांगी - मग - विविधांगी इच्छा! चांगले पुस्तक आपल्याजवळ असावे या इच्छेपासून सारे आयुष्य फक्त चांगलेच जावे या इच्छेकरिता कितीतरी अनेकानेक इच्छा. या इच्छांचा ससेमिरा कधी पाठ सोडत नाही. अनेक व्यक्ती, अनेक इच्छा, अनेकांच्या अनेकानेक इच्छा! असे वाटते की या इच्छांपाठीमागे धावण्यापलीकडे माणसाच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. माणूस सतत धावतोच आहे. ' जितका धावशील तिथपर्यंतची जमीन तुझी' म्हंटल्यानंतर माणूस धावलाच धावला आणि शेवटी धापा टाकत मेला. अशा गोष्टी आपण ऐकलेल्याच असतात. धनाच्या, यशाच्या, कीर्तीच्या पाठीमागे लागणाऱ्यांची अवस्था बहुतांशी अशीच होत असते. ' मागे तयाची रमा होय दासी' असे म्हणतात. मागणारा नेहमी भिकारी असतो. देणारा दाता असतो; तेव्हा 'देणारे' व्हावे ही इच्छा सोज्वळ वाटते. एक इच्छा पूर्ण झाली समजा तर माणसाचे समाधान होते का? नाही. लगेच दुसरी इच्छा तयारच असते. सर्व जीवन हा इच्छांचा एक अखंड प्रवास आहे. जी.. कुळकर्णी हे मराठीतील प्रसिध्द कथालेखक. त्यांची 'प्रवासी' ही एक नितांतसुंदर कथा आहे. त्यांच्या सर्वच कथा वाचनीय आहेत. उत्सुकता असणाऱ्यांनी जरुर वाचाव्या. चांगले साहित्य वाचण्याची इच्छा असणे यात काहीच वावगे नाही. तर त्या 'प्रवासीकथेत जी.एं. नी हेच सांगितले की तुमचा प्रवास तुमच्या हातात नाही. इच्छा तुमच्या उदंड पण तुम्ही कोणत्या वाटेला अनुसरणार, काय होणार, कसे होणार, हे सर्व तुमच्या हातात नाही. या इच्छापूर्तीनंतर माणूस म्हणतो का, 'मी सुखी आहे म्हणून?' 
    'जगी सर्व सुखी असा कोण आहे?
     विचारी मना तूचि शोधूनि पाहे' - रामदास. 'विचारी मना' हा शब्दप्रयोग लक्षणीय. 'हे विचार करणाऱ्या मना', हा एक अर्थ आणि 'मनाला विचारुन पाहा', हा दुसरा अर्थ. विवेकशील, विचारवंत, जीवनाचा अनुभव घेतलेला माणूस शेवटी याच निष्कर्षाप्रत येतो की, आपण खूप आटापिटा केला, खूप उरस्फोड केली, सगळ्या गोष्टी मिळविण्यासाठी खूप जीवाची बाजी लावली, पण........ आपल्या हाती काय? - ते शाश्वत आहे का? नाही. सर्व नश्वर आहे; या विचाराने तो घाबरतोही. मग शाश्वत काय? याचा तो धांडोळा घेऊ लागतो. मिळते का त्याला शाश्वत काही? त्या शाश्वताचा शोध खूप कठीण आहे हे त्याच्या लक्षात येते. मिर्जा गालिब म्हणतो - 'खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले, खुदा बंदे से खुद पुछे, बता तेरी रजा क्या है?'
   तुमचे प्रयत्न इतके बुलंद हवेत की, प्रत्यक्ष परमेश्वराने तुम्हाला येऊन विचारले पाहिजे की, सांग, तुझी इच्छा काय आहे? काय हवे तुला? प्रयत्नांच्या महतीसाठी हा 'शेर' लक्षणीय आहे. धृवाच्या तपश्चर्येने भगवान प्रकट झाले. त्याच्या इच्छेनुसार त्याला अढळपद दिले. सावित्रीने यमाच्या पाठीमागे जाऊन, यमाला तीन वर देण्यासाठी विवश केले सासूसास-यांना नेत्र, सत्यवानाचे प्राण अष्टपुत्रा, हे वरदान मिळवून घेतले. नचिकेताही प्रत्यक्ष यमाकडे जाऊन मृत्यूनंतर माणसाचे काय होते हे ज्ञान मिळविण्यासाठी यमलोकात गेला. ही कथा कठोपनिषदात आहे. अशी स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी कठोर तपश्चर्या करणाऱ्यांची उदाहरणे खूप आहेत. शोधा म्हणजे सापडतातच. किती जिद्द असावी लागते हेही लक्षात येते. चांगल्या, सात्त्विक गोष्टींची अपेक्षा ठेवून त्यासाठी कार्यरत असणारा माणूस चिरंजीव होतो. त्याच्या कार्याच्या श्रेष्ठतेला मरण नाही.
   माणूस हा कधीच निराशावादी नव्हता नाही. असूही नये. विरक्ती, संन्यास याचा अर्थ कर्मसंन्यास नव्हे. उलट जीवन अनुभवांचा उपयोग इतरांना करुन देणारे विवेकी पुरुषच समाजाला जास्तीतजास्त उन्नत अवस्थेला नेऊ शकतात. हंस नीरक्षीरविवेक करु शकतो; म्हणून 'परमहंस' ही पदवी अशा विवेकी, विरागी लोकांना मिळते. सारासार विचार करु शकणारे अधिकाधिक लोक असणे हे राष्ट्रासाठी खूप गौरवाचे आहे. सगळी स़ंतवचने आठवा. संतविचाराचे अवगाहन हेच व्यक्तीच्या उत्क्रांतीचे बीज आहे. प्रत्येक धर्मातील संतपुरुषांनीच समाजाचे उत्थापन केले आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. डोळस होऊन आयुष्याला सामोरे जाण्यात इतिकर्तव्यता आहे. ही इच्छा सर्वात महत्वाची!

           संगीता पाटखेडकर.

            //२०१६.

No comments:

Post a Comment