Saturday, 5 March 2016

'काव्याची भावनानिष्ठ समतानता'

   'जया विश्वबीजाचिया कोंभा l साऊली केली' ll - ज्ञानेश्वरी - ६वा श्लोक, १४वा अध्याय, २७२वी ओवी.
  येथे प्रणव हे विश्वबीज आहे, त्याला कोंबही आलेला आहे. बी पेरले, त्याला पाणी, भूमी, हवामान जर का अनुकूल असेल तर कोंबही फुटतो. प्रणवापासून जो वाग्विस्तार होतो, वाङ्मयविस्तार होतो, त्या विस्ताराची सुरुवात म्हणजेच तो कोंब. भगवती जोपर्यंत त्याला मोकळे करत नाही, तोपर्यंत तो आतून प्रकट होऊ शकत नाही; मग सगळे शब्दब्रह्म, वाङ्मय स्वतःच प्रकट व्हायला लागते; म्हणून ला नमन सरस्वतीला, गुरुला नमन करण्याची पध्दत आहे. ' आपुलेनि वाचे नाही मी बोलत l सखा कृपावंत वाचा त्याची' l - असे तुकाराम महाराज म्हणतातच! जागृतीच्या अगोदरही वेगवेगळे स्वर, व्यंजने आणि त्यांच्यापासून होणारे शब्द यांची उत्पत्ती तीच करीत असते. अमुकाला काव्यस्फूर्ती, वाङ्मयस्फूर्ती झाली असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही शक्तीच आतून ते काव्य, ते वाङ्मय प्रकट करवीत असते, म्हणून आपण म्हणतो 'वाङ्मय प्रणव' प्रकट झाला. ' कां जे एकाक्षरपणेंसी l    त्रिमात्रकेचिये कुशी l
 प्रणव होता गर्भवासी l सांकडला' ll  ज्ञानेश्वरी - १८वा अध्याय, ६८वा श्लोक, १५१०वी ओवी. सांकडलेला गर्भवासी प्रणव मोकळा व्हायला पाहिजे. कुण्डलिनी जगदंबा कशी आहे? तर ती 'चैतन्यचक्रवर्तीची शोभा' आहे. परा, पश्यन्ति, मध्यमा, वैखरी या चार 'वाणी' आहेत. परावाणी म्हणजे बेंबीच्या देठापासून, पश्यन्ति म्हणजे हृदयापासून, मध्यमा म्हणजे कंठापासून वैखरी म्हणजे प्रत्यक्ष उमटलेले बोल! या प्रत्यक्ष उमटलेल्या वाणीला जर परा, पश्यन्ति मध्यमाचे बळ असेल तर ती अमर झालीच म्हणून समजा! 'शब्दांवर थोडी हुकमत असली आणि लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहिणं फारसं कठीण नसतं; पण भूमिकेचा टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचं सोंग घ्यायला लावणं हा त्यावर तोडगा खास नाही' असे बा.सी.मर्ढेकर म्हणतात.
मर्ढेकरांच्या काही सुंदर ओळी बघू या!
   जरा असावी मरणाचीही l अमोघ  आणिक दुबळी भीती, जरा आतड्यांमधून यावी l अशाश्वताची कळ ओझरती.
आणि मृगाचा पाऊस झाला, l जरा लाजली काळी धरणी "व्यर्थ कासया शिणविसी, देवा, गळ्यात माझ्या फुटका रे मणि" l खंत कशाला जिरेल का रग l आकाशाची? जगेन पोळत, फक्त तुझी जर दगडीभिवयी चळेल थोडी डोळ्यांदेखत!
   काव्य हा वाङ्मयाचा प्रांत खूप मनस्वी लोकांनाच पावतो. काव्याचा प्रभाव जनमानसावर जादूसारखा होतो. सुंदर ओळी मनात घर करुन राहतात. कवीच्या भावना तुमच्या बनतात. विश्वात्मक ऐक्य साधण्याचे सामर्थ्य काव्यात असते. मोजक्या, वेधक आणि वेचक, भावपूर्ण शब्दांची अभिव्यक्ती म्हणजे काव्य; ती साधली जाणे ही अर्थातच कठीण गोष्ट! ज्यांना हा आनंद गवसला ते खूप भाग्यवान! कवितेची चिरफाड करु नये या मताची मी आहे. कवीचे शब्द, तुमच्या मनाला जो आनंद देतात, तो आनंद घुसमटवून टाकू नका! शब्द मनाने पिऊन घ्या. 'शब्दांच्या ललित कडांचा अलवारपणा' मर्ढेकरांनी त्यांच्या काव्यात साधला आहे. विसाव्या शतकाच्या मध्यावर येऊन दुसऱ्या महायुध्दाच्या खाईत पडलेल्या जगाचे एक नखाएवढे चित्र मर्ढेकर काढतात आणि त्यात पर्वताएवढा आशय भरतात. अचाट हिकमती करुन दाखवायला त्यांची शैली त्यांना साह्य करते. 'मतामतांचे निखर्व l मोजिले म्यामग लावा अटकेपार चीड-झेंडे'. चीड-झेंडे लावणाऱ्या, लावणाऱ्या आणि लावायला लावणाऱ्या गण्य आणि अगण्य या सर्वांचे मिळून मर्ढेकर एक जीवारण्य कल्पितात. खूप अर्थवाही प्रतिमा. 'झाली ताटातूट कैशी l केव्हा आणि कोठे मजसी l काहीच नुरले स्मृतिशेषीं कृपावंता' l भावविव्हल मर्ढेकर जे वास्तवाचे चित्र रेखाटतात त्याला तोड नाही! त्यांची कविता समजून घ्यायला त्यांच्याइतकेच संज्ञाप्रवाही मन हवे! मराठीतील 'काव्यप्रांत' खूप समृध्द आहे. संत-पंत, तंत कवींची सृजनशीलता तर भावतेच पण आधुनिक कवींपासून तो आतापर्यंतची सर्वच कविता जीवनाचे अवगाहन करविते. 'कवितेचा अभ्यास' म्हणजे जीवनसमृध्दीची सुंदर पखरण!
   'अढळ धृवाचा ढळला तारा l सप्तर्षीचा चुकला प्रश्न, गारठल्याविण गळती गारा, l
   रेडिओत अन् राधे-क्रिश्न' l
   मानवी जीवनातील अढळ श्रद्धा नामशेष झाल्याची विदारक जाणीव व्यक्त करण्याची परिभाषा लक्षणीय! 'सौंदर्य आणि साहित्य' हा एक अजरामर, साहित्यशास्त्रावरील गाजलेला त्यांचा ग्रंथ. संवाद, विरोध, समतोल, भावनानिष्ठ समतानता, लयतत्व वगैरे परिभाषेची सुसंगत ओळख त्यांनी करुन दिली. 'खेड्यातील रात्र' या बालकवींच्या कवितेला संवाद, विरोध, समतोल ही तत्वे कशी लागू पडतात हे त्यांनी पटवूनही दिले; पण त्यांच्याच कवितांना ही तत्वे चपखल बसतात काय - हा एक विवादास्पद मुद्दा आहे. कविता अशी तत्वांच्या बंधनात जखडली जात नसते.
   आधुनिक मराठी काव्याचे प्रणेते 'केशवसुत', तर नवकाव्याचे प्रणेते - बा.सी.मर्ढेकर! दोघांच्याही पावलावर पाऊल टाकून जाणारे अनेक कवी उदयास आले. दोघांच्याही परंपरा खूप गाजल्या, पण अस्सलाची सर नक्कल्याला येत नाहीच! M.A. मराठी होणाऱ्यांसाठी 'मर्ढेकर' हा एक आव्हानात्मक वादग्रस्त, शिवाय, स्वतःकडे आकर्षित करुन घेणारा विषय होता. 'शिशिरागम' सारखे भावपूर्ण कथाकाव्यही त्यांनी लिहिले. एकाच वळणात वळण घेणारी त्यांची कविता नाही. काव्यप्रांतात उन्मुक्त रीतीने संचार करणारा हा कवी मनाला खिळवून टाकतो.     'आला आषाढ-श्रावण l आल्या पावसाच्या सरी, l किती चातकचोचीने प्यावा वर्षाऋतू तरी' l - अशी गत होऊन जाते.
   ' एवढ्याशा तळ्यात बदकं चार, पलिकडला काठ अन् हिरवागार,
   फुलतात फुलं वासंतिक l झुलतात पाखरं प्रासंगिक' l........... असं चालूच राहणार!
   'वावडी वाह्यात माझी l पोकळीचा पिंजरा l सोड दोरी, जाऊ दे ह्या कागदाच्या पाखरा' l - ह्या ओळी मनातून जाता जात नाहीत.
  ' काय मागावे परी म्या l तूही कैसे काय द्यावे, l तूच देणारा जिथे अन् l तूच घेणारा स्वभावे' ll - म्हणणारा हा ईश्वरनिष्ठ कवी- सरस्वतीच्या कृपेने उजळून निघाला.

           संगीता पाटखेडकर.

            //२०१६.

No comments:

Post a Comment