जड पदार्थ
नेण्यासाठी आडव्या वेळूच्या दोन
टोकास दोन दो-या बांधून
त्याला ओझी अडकविण्याची
केलेली व्यवस्था - हा 'कावड'
शब्दाचा अर्थ. पण लक्षात
घ्या, कावड वाहणारा
हा माणूस आहे.
'कावड्या' म्हणतात त्याला. हा,
ओझे मानेच्या, खांद्याच्या,
हातांच्या बळावर वाहणारा माणूस
किती सामर्थ्यशाली असावा
लागेल याचा विचार
करा!
श्रावणबाळाची गोष्ट प्रसिध्द आहे.
तो त्याच्या आईवडिलांना
( ते वयस्कर व
आंधळे - हेही लक्षात
घ्या.) तीर्थयात्रा घडवीत होता.
कावेडीत बसवून! दशरथाचा बाण
त्याला लागला. त्याने दशरथाला
आईवडिलांची माहिती दिली. दशरथाने
त्याच्या हातून त्यांच्या मुलाची
हत्या घडल्याचे सांगितले.
त्या मायबापांची अवस्था
शब्दात व्यक्त करणे अशक्यच!
त्यांनी दशरथाला शाप दिला.
पुत्रवियोगाने आमची जशी
अवस्था झाली आहे
तशीच तुझीही होईल
म्हणून! दशरथाला खूप आनंद
झाला. का? - कारण
त्याला पुत्रच नव्हता. या
शापाचे फळ मिळून
आपल्याला कमीतकमी पुत्ररत्नाचा लाभ
तरी होणार या
कल्पनेचा आनंद होता
तो! चार पुत्र
झाले त्याला! राम,
लक्ष्मण, भरत, शत्रूघ्न.
दशरथाच्या मृत्यूसमयी कोणीच जवळ
नव्हते. हा सर्वच
कथाभाग प्रत्येकाला माहित असतोच
असे मी गृहीत
धरते. नुसत्या कथा
वाचायच्या नसतात; त्याच्यात गर्भितार्थ
असतो आणि तो
खूप हृदयस्पर्शी आहे.
चांगल्या कामासाठी निघालेला श्रावणबाळ
स्वतःच्या मृत्यूनंतरही दशरथाला पुत्रांचे सुख
देऊन गेला आहे.
रामायणाचे मूळ या
कथेत आहे. ही
कथा माहित असल्याशिवाय
पुढच्या कथाभागाचे मर्म हाती
गवसणार नाही.
प्रत्येक गोष्टीला आरंभ
आणि संदर्भ असतो.
जीवन ही एक
'कावड' आहे. अनेक
ओझी प्रत्येकाला वाहायची
आहेत.
'कुणाच्या
खांद्यावर कुणाचे ओझे' हे
अज्ञात आहे, पण
हरघडी व्यक्तीला तयार
राहावयाचे आहे. ह्यालाच
'जीवन ऐसे नाव'
देऊ या! स्वतःची,
स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी पेलणे
एवढीच ही कावड
नाही. जग जवळ
आले आहे. जगातली
कुठलीही घटना ही
तुमच्याशी संबंधित आहे. विश्वात्मक
देवाचा प्रत्यय तो हाच!
पहिले महायुद्ध झाले.
भारत स्वतंत्र नव्हता.
लोक या महायुद्धात
सहभागी व्हायला तयार नव्हते;
पण महात्मा गांधींच्या
आवाहनावरुन भारत सहभागी
झाला. अनेकांच्या आहुती
पडल्या. शत्रूलाही संकटकाळात साह्य
करणारा भारत, स्वतः पारतंत्र्यात
असणारा, इंग्रजांची जुलूम, जबरदस्ती
हरघडी सहन करणारा
भारत प्राणपणाने या
लढ्यात सामोरा गेला. किती
बळी गेले याची
गणती नाही. जे
गेले ते सुटले,
पण जे राहिले
त्यांची काय अवस्था?
कावड वाहणे हे
असे जिकिरीचे व
खूपच कठीण असते.
बैलाच्या मानेवर जू असते,
त्या बैलाला फटकारत
त्याच्याकडून काम करवून
घेतले जाते. माणसाचे
तरी काय? बैलाहून
निपट्टर त्याची अवस्था असते.
बैल खाली बसला
तरी त्याची व्यवस्था
माणसालाच करावी लागते. जगात
इतके वेगवेगळे लहानमोठे
प्राणी आहेत. त्यांच्या मरणानंतर
त्यांची व्यवस्था लावण्याचे कामही
माणसंच करत आली
आहेत. ते प्राणी
त्यांची व्यवस्था करु शकत
नाहीत.
माणूस फक्त माणसांसाठीच
काबाडकष्ट करत नाही
तर सा-या
सृष्टीची कावड वाहतो
हे लक्षात घ्या!
दुरुन पाणी आणण्याचे
काम पूर्वी कावेडीद्वारे
केले जायचे. आजही
दुर्गम भागात पाण्यासाठी जनतेला
वणवण करावी लागते.
शिवशंकराच्या अभिषेकासाठी पाण्याच्या कावेडी
घेऊन महादेवाला अभिषेक
करणारे आजही आहेत.
ही कावड खाली
ठेवायची नसते. कावड वाहणे
यासाठी अत्यंत निष्ठा, परिश्रम,
त्याग, संयम, सचोटी या
सर्वच गुणांची परिसीमा
असावी लागते. ती
माणसाने नेहमीच दाखविली आहे.
अनेक संकटांचा, परकीय
आक्रमणांचा पाठपुरावा भारताला नेहमीच
करावा लागला आहे.
इतिहास हा रक्तरंजित
आहे.
'आधी लगीन
कोंढाण्याचे, मग रायबाचे'
म्हणणारा तानाजी एकटाच आहे
का?
'गड आला
पण सिंह गेला'
म्हणणारे शिवाजी महाराज अनेक
मावळ्यांच्या बलिदानाने व्यथित झाले,
नेहमीच! 'बाजीप्रभू देशपांडे', खूपजण
होते म्हणून शिवाजी
स्वातंत्र्याची कावड पेलू
शकला!
पहिले महायुद्ध(२८
जुलै १९१४ ते
११ नोव्हेंबर १९१८.)
दुसरे महायुद्ध १
सप्टेंबर १९३९ ला
सुरु झाले आणि
२ सप्टेंबर १९४५
ला संपले, पण
या महायुद्धांचे परिणाम
सर्व जगाला भोगावे
लागले. सगळ्या निष्ठांचा चकनाचूर
झाला. 'माणूस'
म्हणजे निव्वळ परिस्थितीच्या हातचे
'बाहुले' बनला. किती, काय
काय माणसाला भोगावे
लागले असेल या
कल्पनेनेसुध्दा थरकाप होतो. १५
अॉगस्ट १९४७ ला
भारत स्वतंत्र झाला,
पण त्यांच्यानंतरही हिंसेचा
डोंब उसळला. आज
आपण स्वातंत्र्यात जगतो
आहोत, पण भ्रष्टाचाराची
बजबजपुरी माजली आहे. प्रत्येक
अनैतिकतेचा आघात माणसाच्या
ठिकाणी असलेल्या निष्ठेला आव्हान
देतो आहे. सुख
कुठे आहे याचा
शोध घ्यावा लागतो
आहे. तरीही माणूस
कधी ना कधी
सुखाचा शोध लागेल
म्हणून जबाबदारीची कावड वाहतोच
आहे. कर्तव्यनिष्ठेची मानच
माणसाचा मान राखेल!
संगीता पाटखेडकर
९/३/२०१६.
No comments:
Post a Comment