Thursday, 10 November 2016

सुंदर मी होणार

  दिवस कोरा चेक रोज हाती ठेवणार
    येणाऱ्या दिवसांचे नेहमीच चांगले
       स्वागत मी करणार
   आनंदाने हसत हसत जीवनाला
    सामोरे जाण्याचा प्रयत्न करणार
    'शुभ सकाळ' 'शुभ सकाळ' नावाचा
     मंत्र जपत राहणार
    सकाळचं कोवळं ऊन मनसोक्त प्राशन
      करीत राहणार
    हिवाळ्यातील दवबिंदूंचे ओलसर
      थेंब न्याहाळत राहणार
     धुक्यातूनही स्वच्छ वाट शोधण्याचा
      प्रयत्न करतच राहणार
  
    सकारात्मक विचारांची पक्की भिंत
    आजूबाजूला उभी करत राहणार
    नकारात्मक विचारांची द्वारे, मनातून
    कायमची बंद करणार
    मायबापानं दिलेल्या संस्कारांची
     शिदोरी आयुष्यभर सोबत घेऊन
     मिरवत मिरवत फिरणार
     नवनवीन चांगले सुविचार
     जिथून कुठूनही मिळोत; मग ते
     कुणाकडूनही येवोत मग ते,
    बीज सुविचारांचे मनांत पेरत राहणार
     वृक्ष, पानें, फुले, कळ्या, वेली
     यांच्याशी घट्ट मैत्री करणार
  आयुष्यात जिव्हाळ्याची नाती जपणार
   
     जे जे सुंदर, उदात्त आणि उत्तम
     ते ते सगळे ग्रहण करण्याचा
        प्रयत्न करणार
      ज्यांच्याकडून जे जे मिळेल;
      शिकण्यासारखे काही,......
    ते ते नवनवीन ज्ञान शिकतच राहणार
   आयुष्यभर विद्यार्थीच बनून राहणार
   कितीही मिळविले खूप काही पुढे तरीही  पाय माझे मात्र नेहमीच जमिनीवर ठेवणार
 
    मनाला स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर
     ठेवण्यासाठी जपत राहणार
    घराला, कुटुंबाला, आनंद देण्याचा;
   जमेल ती साथ देण्याचा वसा मी घेणार
 ज्ञानेश्वरांची; 'एक तरी ओवी अनुभवावी,'
    या वचनामृताचा पाठपुरावा करणार
   चांगले संस्कार घेणार आणि देणार

     हाती येणारे प्रत्येक काम
    मन लावून आणि आनंदाने करणार
    प्राणी, पक्षी, मित्र, मैत्रिणी, सहकारी,
  नातेवाईक, या सर्वांनाच जीव लावणार
    सुंदर विचार आणि संस्कारांची बाग
    आयुष्यभर फुलवित राहणार
    सुखदुःखमिश्रित आयुष्याचा,
     स्वीकार करुन, फिरुनी नवी
     जन्मत राहणार, आनंदधन होणार

       खरंच सांगते दोस्तांनो,......
      या एकूणच सर्व गोष्टींनी
    नक्कीच मनाने सुंदर मी होणार!!!
     सुंदर मी होणार!!! सुंदर मी होणार!!!

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       १० नोव्हेंबर २०१६.

No comments:

Post a Comment