Monday, 14 November 2016

बालपणीचा काळ

     बालपण सुखाचं
     रम्य आठवणींचं

     वय बालपण कुतूहलाचं
     नवनवीनता जाणण्याचं
     अनोळखींच्या औत्सुक्याचं
    एकमेका टकामका पाहण्याचं
     वास्तव आणि कल्पितांच्या
      मजेदार रंगांचं
     निष्पाप, निर्भय, निरागसतेचं
       बालपण सुखाचं
       रम्य आठवणींचं

      जो देईल भेटवस्तू काही
      जो सांगेल रोज गोष्टी
      जो खेळेल करुन मज्जामस्ती
      त्या संगे गट्टी जमवण्याचं
       जो चिडवेल, डिवचेल खूप
       त्या संगे कट्टी करण्याचं
         बालपण सुखाचं
         रम्य आठवणींचं
   
       आईबाबांच्या मायेचं
       आजीच्या लाडाचं
       आजोबांच्या कौतुकाचं
       भावंडांच्या प्रीतीचं
      सवंगड्यांसवे खेळण्याचं
      गिल्लीदांडू, लंगडीत रमण्याचं
       बालपण सुखाचं
       रम्य आठवणींचं

      नवी पाटी, नवी पुस्तकं
      नवा गणवेश, नवी वही
      नवी पेन्सिल, नवा पेन,
       नवे खडू, नवं दप्तर
      नवंनवं सारं घेऊन
      शाळेत मिरवत जाऊन
      , , , , , , , , चा
       श्रीगणेशा गिरविण्याचं
        बालपण सुखाचं
        रम्य आठवणींचं

        काऊ चिऊच्या गोष्टींचं
     भोपळ्याच्या टुणूक टुणूकाचं
      चेटकिणीच्या गूढगम्यतेचं
      अली बाबाच्या चाळीस चोरांचं
       शिवाजीच्या पराक्रमी गोष्टींचं
       दिवाळीतल्या किल्ल्यांचं
      रामायण, महाभारत कथेचं
         बालपण सुखाचं
         रम्य आठवणींचं
  
      घोड्यावर बसावंसं वाटण्याचं
      प्राणी, पक्ष्यांना न्याहाळण्याचं
      कुतूहल सिंहाच्या डरकाळीचं
      माकडांना वाकुल्या दाखवण्याचं
      मोरपिसांना हळूवार कुरवाळण्याचं
      चिमणीच्या चिवचिवाटाचं
      कावळ्याच्या काव कावाचं
       मिठू मिठू पोपटाचं
       बालपण सुखाचं
       रम्य आठवणींचं

       बाबांबरोबर बोट धरण्याचं
       फिरता फिरता कुतूहलाने
       दुनियेला पाहण्याचं
      बगिचातल्या फुलवेलींना
       मायेने स्पर्शण्याचं
     आईबाबांच्या प्रेमळ कुशीत
       गाढ झोपी जाण्याचं
      राजासारखं डोलण्याचं
      मोरासारखं नाचण्याचं
        बालपण सुखाचं
        रम्य आठवणींचं

      बालपणीचं जग सुखाचं
     रम्य आठवणींच्या शिदोरीचं
     आयुष्यभर पुरुन उरण्याचं
      सरलं पुढे बालपण तरीही
      गेला बालपणीचा काळ तरीही
      बघुनी बालपण मन चित्रांत
     लख्खपणे आठवूनी पाहायचं
     मनातच खुदकन् हसायचं
     मिळता सुंदर बालपण असे
    स्वतःला भाग्यवान समजायचं
       बालपण सुखाचं
       रम्य आठवणींचं

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
      १४ नोव्हेंबर २०१६.

    बालदिन. नेहरु जयंती.

No comments:

Post a Comment