Saturday, 19 November 2016

काळीज

     काळीज असतं सर्वांनाच
     कधी असतं ते कठोर
     कधी असतं ते निष्ठूर
     कधी असतं मायेचं
     कधी असतं फुलांसारखं कोमल
      अलगद, हळुवार स्पर्शाचं
      कधी असतं वेदनांचं
      कधी असतं विवंचनांचं
      कधी असतं प्रतीक शुध्दतेचं

      कुणाचं काळीज असं
      कुणाचं काळीज तसं
     हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं
      कारण....ज्याचं त्यालाच ते
      लखलाभ असतं
     काळीज एकमेकांकडे जात असतं
     त्याचं तिला आणि तिचं त्याला
     येऊन अद्वैतासारखं मिळत असतं
     तेंव्हा मात्र ते -याखु-या प्रेमाची
     साक्ष देत असतं, मिसळून जात असतं

       काळीज होतं संतांचं
     दुनियेला मार्ग दाखविण्याचं
     विवेकाची पखरण करण्याचं

     काळीज होतं देशप्रेमींचं
    निःस्वार्थ देशसेवा करण्याचं
     प्राणांची आहुती देण्याचं

  काळीज होतं शिवाजीच्या मावळ्यांचं
    निधड्या छातीचा ढाण्या वाघ
   बाजीप्रभू देशपांडेचं, जीवा महालाचं
   जीवाला जीव देणाऱ्या साथीदारांचं
    महाराज गडावर पोहोचेपर्यन्त
    निष्ठेने खिंड लढविण्याचं

     काळीज होतं हनुमान सेवकाचं
     श्रीरामाच्या अखंड नामजपाचं
    दाखविता त्याने फाडून काळीज
    दिसत होतं रुपडं राम आणि सीतेचं

      काळीज होतं विवेकानंदांचं
    धर्म आणि न्यायनीतीने वागण्याचं
    देशाची संस्कृती आणि अभिमान
     अटकेपार उंचावण्याचं
     बलदंड युवक घडविण्याचं
    आत्मबल वाढविण्याचं
    भरभरुन प्रेरणा देण्याचं
    चारित्र्यसंपन्न राष्ट्र घडविण्याचं

      अस्सं काळीज सुरेख बाई
      ज्यांना ज्यांना मिळालं बाई
     अमरत्वाकडे ते घेऊन जाई
     आदर्शांच्या खुणा ठेवून जाई
      कितीही आली युगानुयुगे तरीही...
     नावलौकिक अलौकिक करुन जाई
     नावलौकिक अलौकिक करुन जाई.

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      १९ नोव्हेंबर २०१६.

No comments:

Post a Comment