इतिहासाने नेहमीच सर्वांना मागे वळून पाहायला लावले आहे. इतिहासातलं
एकेक पान सोनेरी आहे. भारतातल्या महान व्यक्ती, त्यांचे जीवन, त्यांची मूल्ये आणि विचार
व त्यांतून आपल्या देशवासियांना मिळणारी प्रेरणा यामुळे त्या-त्या काळावर महनीय व्यक्तींची
अमीट अशी छाप पडली.
इतिहास जरी भूतकाळात
इतिहासजमा झाला असला तरी तत्त्वज्ञ, विचारवंत, स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी नेते
यांच्या विचारांना आजच्या वर्तमान आणि पुढील भविष्यकाळातही मरण नसते; इतके ते विचार
कोणत्याही काळाला आणि वेळेला लागू पडतात.
भारतावर फ्रेंच, डच,
पोर्तुगीज, मुस्लीम या सर्वांनी खूप काळ राज्य केले. इंग्रजांनी तर १५० वर्षे राज्य
करुन साम,दाम,दंड,भेद या नीतीने आपल्या भारतावर जुलूम जबरदस्तीची सत्ता गाजविली. प्रथम
ते आपल्या देशात व्यापारी म्हणून आले आणि नंतर राज्यकर्ते बनले. जुलूम, अन्याय, अत्याचार,
सूडाची भावना या सर्व कुहिट विचार आणि कृतीत ते माहिर बादशहा होते. लहान, थोर, गरीब,
श्रीमंत, स्त्री, पुरुष, यापैकी कुणालाही त्यांनी सोडले नाही. अत्याचाराची मालिका अखंड
चालूच राहिली. भारत माता तारणहाराची वाट पाहत होती. दुःखी, कष्टी आणि बेजार झाली होती.
कुठल्याच बाजूने स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग दिसत नव्हता.
२ अॉक्टोबर १८६९
रोजी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. पुढे चांगले शिक्षण घेऊन ते बॅरिस्टर झाले.
मोहनदास ते 'महात्मा' हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. बॅरिस्टर झाल्यावर यातच पुढे
संपूर्ण आयुष्य ते आरामात व्यतीत करु शकले असते!! पण तसे झाले नाही. नियतीच्या मनात
वेगळेच होते. गांधी दक्षिण आफ्रिकेला गेले. तिथे त्यांनी वर्णभेदाची पेटलेली आग पाहिली.
गोरे लोक काळ्यांवर, निग्रोंवर अनन्वित अत्याचार करीत होते. गांधींनी तिथे स्वतः त्या
देशातील सामान्य जनतेला सोबत घेऊन, स्वतः पुढाकार घेऊन नवीन कायदे आणि करार करावयास
सरकारला भाग पाडले. तेथील सर्व परिस्थितीचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि तत्कालीन
अनिष्ट पध्दतींना कडाडून विरोध केला.
एक दिवस रेल्वेच्या
फर्स्ट क्लास ए.सी. डब्यातून प्रवास करतांना त्यांना खराब अनुभव आला. गो-या लोकांनी
त्यांना चालत्या गाडीतून, त्यांच्या सामानासकट, खूप रात्रीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर,
शिवीगाळ करुन फेकून दिले. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा 'Turning
Point' ठरला. माझ्यासारख्या बॅरिस्टर व्यक्तीचा असा वर्णभेदी अपमान?? तर मग.... सामान्य
व्यक्तींची काय अवस्था होत असेल?? माझ्या देशातील लोकांना पारतंत्र्यात हालअपेष्टा
सहन करतांना कसे वाटत असेल?? असा सतत दुस-यांविषयीचाच हृदय पिळवटून टाकणारा आणि जनतेची
काळजी सतावणारा प्रश्न त्यांच्या मनात आला आणि गांधींनी खंबीरपणाने आणि वेगळ्या पध्दतीने
या सर्व परिस्थितीला तोंड द्यायचे ठरविले.
भारतात आल्यावर त्यांनी
संपूर्ण देशात भ्रमण केले. इथली खेडी पाहून, खेड्यांचा विकास करण्यासाठी 'खेड्यांकडे
चला' असे सर्वांना आवाहन केले. सर्वात प्रथम कार्य जर त्यांनी कोणते केले असेल तर ते
सर्व जनतेला एकजुटीने सोबत घेऊन चालण्याचे केले. इंग्रजांना या देशातून पळवून लावण्यासाठी
एकसंघ राष्ट्राची गरज होती. आपल्या देशातील गरिबी पाहून त्यांचे हृदय द्रवले आणि सुटाबुटांतले
गांधी 'पंचा' नेसले. पैसा, मान, प्रतिष्ठा, पदवी, वकीली या सर्व त्यांच्याठायी असलेल्या
भूषणावह गोष्टींचा सहज त्याग त्यांनी केला देशासाठी!!
देशात जास्तीतजास्त
लोकांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या म्हणून त्यांनी स्वावलंबी होण्याचा मार्ग
सर्वांना दाखविला. गांधीजी नुसते उपदेश करणाऱ्यांपैकी नव्हते. जे विचार, उपदेश त्यांनी
मांडले; ते प्रथम स्वतः त्यांनी आचरणात आणले. चरख्यावर स्वतः सूत कातलेले धोतर व शाल
ते परिधान करीत. खादी आणि ग्रामोद्योगावर त्यांनी भर दिला. असहकार, स्वदेशी चळवळ, सत्याग्रह,
शांती आणि अहिंसेचे महत्त्व, जातीभेद, वर्णभेद, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचे हक्क,
स्वच्छता, ही शस्त्रें या शांतिदूताने अंगिकारिली. विदेशी वस्तूंची होळी करुन स्वदेशातच
पैसा यावा म्हणून त्यांनी स्वदेशी चळवळीला महत्त्व दिले. सगळीचकडून इंग्रजांना असहकार
केला. स्वतः सत्याग्रही राहून ते कितीतरी दिवस उपोषण करीत असत. इतरांसमोर उपोषण आणि
लोकांची पाठ वळल्यावर खाणे!! असे दिखाऊ उपोषण त्यांचे नव्हते. उपोषणासाठी जे धैर्य,
जिद्द आणि चिकाटी लागते; ती त्यांच्याजवळ होती, कारण; आध्यात्मिक बळ आणि सामर्थ्याचे
ते धनी होते. ईश्वरावर त्यांची निस्सीम श्रध्दा होती. 'तो दिसत नसला तरी श्रध्देने
मी त्याला मानतो,' असे ते म्हणत.
मीठावर सरकारने लावलेल्या
करविरोधात त्यांनी 'दांडी' येथे मीठाचा सत्याग्रह केला. हा विरोध दाखविण्यासाठी, सर्व
जनतेला घेऊन पायीच जाणे पसंत केले. गांधींची चाल वायूच्या वेगासारखी होती. 'दांडी'
येथे पोहोचण्यापूर्वी ज्या ज्या खेड्यांतून ते जात, त्या त्या खेड्यांतील लोक झपाझप,
भरभर पावले टाकीत आणि त्यांच्याबरोबर या यात्रेत सामील होत.
'चले जाव' आंदोलन हा
त्यांचा; इंग्रजांना या देशातून कायमचेच घालविण्याचा प्रभावी वार होता. या आंदोलनात
संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा होता. सर्वदूर प्रक्षोभ पसरला होता. लोकांच्या मनातील
ज्वालामुखी आता विकोपाला गेला होता. गांधींची ही मोहिम फत्ते झाली होती.
रवींद्रनाथ टागोर
यांनी 'महात्मा' ही उपाधी त्यांना बहाल केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'राष्टपिता'
संबोधले. आपल्या देशातील जनतेने प्रेमाने त्यांना 'बापू' म्हंटले.
स्वतः हातात झाडू
घेऊन खेड्यांखेड्यांतील रस्ते आणि शौचकूप त्यांनी
साफ केले. 'स्वच्छता' हे जबरदस्तीने करावयाचे काम नसून प्रत्येक व्यक्तीचा तो स्वभाव
बनला पाहिजे यावर त्यांनी विशेष भर दिला. सर्वच बाबतीत ते महात्मा होते असा विचार मनांत
येऊन त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते नेहमीच!!
लिओ टॉलस्टॉय, जॉन
रस्किन, गोपाळकृष्ण गोखले, यांसारख्या विचारवंत आणि तत्त्वज्ञांचा प्रभाव गांधींवर
होता. दक्षिण आफ्रिकेचे नेते 'नेल्सन मंडेला' आणि सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
'बराक ओबामा' यांच्यावर गांधींच्या विचारांचा प्रभाव आहे आणि आजही दक्षिण आफ्रिकेत
त्यांचे अनेक अनुयायी सापडतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वार्थानेच जागतिक व्यक्तिमत्त्व
होते; ज्याचा प्रभाव आणि पगडा शतकानुशतके कायम आहे आणि राहील. 'Man of Millenium' असेही
त्यांना म्हंटले जाते. 'यावच्चंद्रदिवाकरौ' महात्मा म्हणजेच जोपर्यन्त, सूर्य, चन्द्र,
तारे आहेत तोपर्यंत या महात्म्याची महती दर पिढीपर्यन्त पोहचत राहील.
आज २ अॉक्टोबर २०१६.
महात्मा गांधींची जयंती. याच दिवशी देशाचे पूर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचीही
जयंती आपण साजरी करतो. 'जय जवान, जय किसान' हा त्यांचा प्रसिध्द नारा. जरी प्रधानमंत्री
असले तरी शास्त्रींची 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' होती; गांधींप्रमाणेच!!
"वैष्णव जन
तो तेणें कहिएँ जे
पीड पराई जाने रे
परदुःखे उपकार करें
तो ये
मन अभिमान ना आये रे"
- हे त्यांचे आवडते भजन होते.
गांधींनी विपुल लेखन
केले. गुजराती भाषेत त्यांनी खूप लिखाण केले आणि स्वलिखिताचे हिंदी व इंग्रजीतून भाषांतर
आणि परीक्षण केले. लेखणीद्वारे आपले विचार जगापर्यन्त पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले.
लेखणीत खूप मोठी क्रांती घडविण्याची ताकद असते, हे त्यांनी जाणले होते. 'माझे सत्याचे
प्रयोग' हे त्यांचे स्वतःच्या चुकांची कबुली देणारे आत्मचरित्र प्रसिध्द आहे. किती
जणांमध्ये आपल्या चुका प्रांजळपणे कबुल करण्याचे धाडस असते??? त्यांच्यामध्ये ते होते!
याहीबाबतीत ते 'महात्मा' होते.
..... अशी ही व्यक्तिमत्त्वाला
अनेक महान पैलू असणारी, मोठ्या मनाची व्यक्ती दि. ३० जानेवारी १९४८ साली अनंतात विलीन
झाली. अंतिम समयी त्यांच्या मुखातून 'हे राम' शब्द बाहेर पडले. गीतेच्या आठव्या अध्यायात
असे सांगितले आहे की, मृत्यूसमयी ज्याच्यामुखी 'हरिनाम' असते त्याला खरी मुक्ती मिळते!!
मरतेसमयी हरिनाम निघणे कठीण असते! म्हणतात;- कारण, व्यक्ती स्वतःच्या व्याधी आणि विचारांमध्ये
अडकलेली असते. आधीच निःसंग व्यक्ती अंतिम वेळीही ख-या अर्थाने निःसंग झाली. याहीबाबतीत
ते 'महात्मा' होते.
खरोखर 'गीता' जगणारी
व्यक्ती!!
आज गांधी जयंतीनिमित्त
हे सर्व मला लिहावेसे वाटले. त्यांचे व्यक्तिविशेष लिहितांना माझी लेखणी तोकडी पडली.
शब्द अपुरे पडावेत; इतके त्यांचे कार्य महान!! तरीही लिहिण्याचे जमेल तसे, धाडस केले.
जयंतीनिमित्त गांधींना माझ्यातर्फे विनम्र अभिवादन!!!!!
२०१९ हे महात्मा
गांधींचे १५० वे जयंती वर्ष भारत राष्ट्र साजरे करणार आहे. त्यानिमित्ताने ठिकठिकाणच्या
राज्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. आत्तापासूनच या संकल्पाला सध्याचे प्रधानमंत्री
श्री.नरेन्द्र मोदी प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या संकल्पाला 'सिध्दी' प्राप्त
होवो हीच सदिच्छा!!!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
२ अॉक्टोबर २०१६.
No comments:
Post a Comment