Saturday, 8 October 2016

डोळा भेट

  ऊदो उदोने भारले वातावरण सारे
  ऊद आणि धूपाचा, सुगंध पसरी वारे
  जिकडे पाहावे तिकडे तुझाच नामघोष
  देवालये तुडुंब, तुझे दर्शन हाच संतोष

     तुझे अस्तित्व मायेची ऊब
  दे सर्वांना आई तुझ्या कृपेची डूब
  ऊबदार पांघरुणात गुडुप व्हावेसे वाटते
  तुझ्या मायेची शाल पांघराविशी वाटते

        मायभवानी तुझे देणे
        आयुष्याची ढाल बनते
 'ददाति प्रतिगृण्हाति' हे मनावर बिंबविते
  'शोधा म्हणजे सापडेल' हा तू मंत्र देते
       तुला धुंडता धुंडता
      आयुष्य व्यतीत होते

     कुलस्वामिनी माहुरगडवासिनी
     कुलस्वामिनी तुळजापूर भवानी
      तुझे देणे सरत नाही
     माणसाचे देणे पुरत नाही
 
     तुझ्यापर्यन्त यायचे आहे
     तुझ्यासारखेच व्हायचे आहे
     तुला डोळे भरुन पाहायचे आहे
     तुला डोळे भरुन पाहायचे आहे

       'कवडी एक अर्पिता देशी
          हार मुक्ताफळा हो'
           हे तुझे ब्रीद आहे
      
       भावफुलांची माला अर्पिण्या
      येतो भाविक तुझ्या दर्शनाला
तू कधीच भक्तांना विन्मुख पाठवित नाहीस
   अखंड शक्तीचा स्त्रोत, तू त्यांना देतेस
           हे तुझे ब्रीद आहे
           हे तुझे ब्रीद आहे

   कालातीत तू , तुला आमची साद आहे
        तुला आमची साद आहे
    तू सर्वांचा आसरा आणि निवारा
     आमच्या श्रध्देची ही गाज आहे
     आमच्या श्रध्देची ही गाज आहे

     संगीता पाटखेडकर.

     ८ अॉक्टोबर २०१६.

No comments:

Post a Comment