या दोस्तांनो,
बनवू आपण
दिवाळीत किल्ला
दोस्त हो, विसरा
आता खेळ क्रिकेटचा
विसरा आता खेळ
लंगडीचा
विसरा आता टिक्करबिल्ला
या दोस्तांनो,
बनवू आपण
दिवाळीत किल्ला
अंगण सजेल
रांगोळीने
द्वार सजेल तोरणाने
माळ सजेल
फुलाफुलाने
संध्या सजेल पणती
प्रकाशाने
आकाश सजेल
तारकापुंजाने
साद घालू
त्याला आकाशकंदिलाने
पोटोबा तृप्त होतील
फराळ करण्याने
चार दिवसांचा
आनंद लुटू
आपण खुल्लम
खुल्ला......
खुल्लम खुल्ला, खुल्लम
खुल्ला
या दोस्तांनो,
बनवू आपण
दिवाळीत किल्ला
सभोवतालची काळी माती
ओंजळीत घेऊ हाती
आकारु शिवबा, आकारु
मावळे
आकारु खिडक्या, आकारु
तटबंदी
पसरवू आजूबाजू शंख,
शिंपले, मोती
आकारांशी सांगड घालण्या
रमती
कलात्मकतेचा, कल्पकतेचा आनंद देती
मातीने माखलेले हात
सावळे
ध्येय अमुचे आता
गाठू दूरवरचा पल्ला
या दोस्तांनो,
बनवू आपण
दिवाळीत किल्ला
पणत्या लावू सभोवती
मशाल पेटवू
मधोमध वरती
बनविता, बनविता मातीचा
किल्ला
मनांतही तयार होतसे
एक किल्ला
या मनातल्या
किल्ल्यास तटबंदी असे
वाईट संस्कारांची,
अज्ञान अंधःकाराची
या मनातल्या
किल्ल्यात द्वारे खुली होवो
सुविचारांची, एकतेची, सहृदयतेची
देशप्रेमाची, मायेची, आपुलकीची
ध्यानी, मनी, स्वप्नी
दिसे
असाच मजसी
किल्ला
मातीचा किल्ला तसाच
बनवू
मनाचा किल्ला, हो,
मनाचाही किल्ला
असा किल्ला
बनता सुंदर, मनाजोगता
फडकवू तिरंगा झेंडा
नाचू, गाऊ, खेळू
आनंदाने
करु या
आता कल्ला, कल्ला,
कल्ला
या दोस्तांनो,
बनवू आपण
दिवाळीत किल्ला
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
२७ अॉक्टोबर
२०१६.
No comments:
Post a Comment