धामन्याच्या मोहरीरांच्या शेतावरचा 'सोमा' हा राखणदार व तेथील सर्व व्यवस्था पाहणारा एक कामगार! तो शेतीचा काही माल घेऊन घरी यायचा. काही पैशांची त्याला नेहमीच गरज असावयाची आणि ती असणारच! भारत हा कृषीप्रधान देश आहे असे आपण नेहमीच घोकत आलेलो आहोत, पण त्या शेतीतले 'अ म्हणता ढ' आपल्याला काहीच माहित नसते. आज शेतीसमस्या किती बिकट झालेली आहे हे आपण पाहतोच. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. श्रीनिवासच्या लग्नात वीणाला त्यांच्या शेतीसंबंधी मी विचारले असता ती म्हणाली होती; 'दुसरे काही उत्पन्नाचे साधन नसते तर आत्महत्येचीच वेळ आहे'. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे स्वतःची पुंजी प्रथम शेतकऱ्यांसाठी खर्च करुन मग आता 'नाम' फाउंडेशन स्थापन केली आहे. समाज प्रबोधन होऊन लहानमोठा मदतीचा हात पुढे येत आहे. 'शरद जोशी'- तर राहिले नाहीत पण त्यांनी त्यांच्या संपत्तीचा बराच हिस्सा शेतकऱ्यांसाठी 'मृत्यूपत्रात' लिहून ठेवला आहे; अशा बातम्या आपण ऐकतोच! स्वतःचा मुलगा शेतकरी व्हावा असे शेतकऱ्याच्या कुटुंबातील कुणालाही वाटत नाही. तो डॉक्टर, इंजिनियर, पैसेवाला व्हावा हीच सर्वांची इच्छा असते. अशा सगळ्या सामाजिक असुरक्षिततेच्या वातावरणात शेतावर काम करणारा मजूर जास्तीतजास्त काय सुधारणा करु शकणार? शिवाय शेती निसर्गावर अवलंबून. पीक होणे किंवा न होणे हे बरेचदा बेभरवशाचेच! पैशांशिवाय आणि मालकाच्या देखरेखीशिवाय तो नेहमीच असहाय! सोमा यायचा, 'माल झाला नाही जी' म्हणायचा. मालकाला ते अर्थातच खोटे वाटायचे. मजूराला थापड लगावली तरी चालते असा तो काळ! मजूरही हुं का चुं करणार नाही या वृत्तीचा! हे दृश्य पाहिल्यानंतर मला त्या काळातही खूप वाईट वाटले होते. करु काहीच शकत नव्हती. तितकी मोठीशी समजही नव्हती; पण मला 'सोमा' आवडायचा, कारण तो खूप कष्टाळू होता आणि सांगितलेले काम खूप मन लावून करायचा. प्रमोदच्या मौंजीत त्याने प्रमोदला खांद्यावर घेतले होते व तो नाचला होता. मालकाच्या मुलाला खांद्यावर घेऊन नाचविण्यात त्याला आनंद! पण प्रमोदला हे काहीच आवडले नव्हते. प्रमोद आंगणातून माडीवर जाण्याच्या दाराने माडीच्या मागच्या खोलीत गेला व त्याने दार लावून घेतले. बाबांनी खूप मिनतवा-या करुन प्रमोदला दार उघडायला लावले व मग पुढचे विधि पार पडले. या प्रसंगातून सोमा व प्रमोद या दोघांचीही स्वभाववैशिष्ट्ये चांगलीच लक्षात येतात. विश्राम, अरुण यांच्या मौंजीच्या आधी सोमाने आंगण धुम्मस करुन इतके शेणामातीने गिरगिटले व जशी सुंदर सारवलेली मऊशार खोलीच आहे असे बनविले. दिवसरात्र तो राबत होता. माझ्या हातचे तो बरेचदा जेवला आहे याचा मला आजही आनंद होतो. हे लोक परिस्थितीचे बळी असतात. शिक्षण नसते, पण कला ही शिक्षणावर अवलंबून नाही. त्याला जे येत होते, त्याचे कामाचे कसब आणि उलटून न बोलण्याचा व आनंदी राहण्याचा स्वभाव हे निश्चितच लक्षात राहिले. अमोलने विचारले, 'त्याचा फोटो आहे काय?' तो काळ एकतर इतका फोटो काढण्याचा नव्हताच आणि त्याचा फोटो कोण काढणार? हुरडा आणायचा- म्हणजे कणसे- शेकोटी पेटवायची. कणसे भाजायची. हुरडा- मडक्यातले दही- पिशीने खायचे, काकडी, मिरची. शेतीवाले लोकच ही लज्जत चाखू शकतात. कृपाला तर हुरडा म्हणजे काय? काहीच माहित नव्हते. आपल्या घरी येणाऱ्या व्यक्तींची, त्यातून कामकरी व्यक्तींची आपल्याला काहीच माहिती नसते. आपण त्यादृष्टीने कधी विचारपूसही करत नाही. त्यांच्याकडून त्यांनी, दिलेल्या मोबदल्यात, काम खूप चांगले करावे अशी आपली अपेक्षा असते. बाकी काही देणे ना घेणे! त्या तुलनेत राजूकडे काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना कविता खूप चांगल्या रीतीने वागणूक देते हे पाहून मला खूप आनंद झाला. 'जो तळे राखील तो पाणी चाखील'. पाणी पिऊन पिऊन पिणार किती? सर्वच जण अगस्ती की काय? इतका भ्रष्टाचाराचा जमाना, मोठमोठी धेंडे खुर्ची मिळाली की काय हडप करतील याचा नेम नाही. एक साधा गरीब बिचारा मजूर असे मला वाटते. बाबांची शेतीची देखरेख होत नव्हती, शेवटी शेती विकली. विश्राम सध्या शेती घेऊन त्याकडे लक्ष देतो आहे. कुठेतरी बीज रुजते. शेतीप्रधान देशात शेतीची विटंबना होऊ नये व आधी शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या गरजांकडे सर्वांनी लक्ष पुरविल्यासच कुठेतरी समस्या कमी होईल हा विचार सर्वांनी करावयास हवा. पुढे त्या सोमाचे काय झाले? आपण कधीतरी विचार केला काय? आपण आपल्याच व्यापात इतके व्यस्त असतो की असा काही विचारही त्या काळात मनात आला नाही; पण आज येतो आणि सोमा प्रकर्षाने आठवतो. कालचीच घटना- विशालने एका बकरीचा जीव कुत्र्यांच्या तावडीतून वाचविला. ४-५ कुत्र्यांनी मिळून बकरीला धरले. एका कुत्र्याने तिची मानगुटी पकडली. आमच्या घरासमोरचीच ही घटना! विशाल धावला, कुत्र्यांना पिटाळले व बकरीला उचलून आणले. मान रक्ताळली होती. बकरीने पाणी, चारा कशालाच तोंड लावले नाही. तिच्या जखमेवर हळद लावली. तिच्या मालकाचा शोध घेतला, पण मालक गवसला नाही. मग एका रिकाम्या घराच्या आंगणात तिला ठेवले. काही वेळाने ती बकरी उठून उभी राहिली तेंव्हा विशालच्या जीवात जीव आला. पुढे त्या बकरीचे काय होणार हे कुणालाच माहित नाही. खाटिकखान्यात जाते की मालक तिची काळजी घेतो? इतका पुढचा विचार करण्यात अर्थही नसतो. तेव्हाच्या तेव्हा काय करता येईल हेच महत्वाचे असते.
संगीता पाटखेडकर.
४/१/२०१६
No comments:
Post a Comment