कंटाळवाणे नीरस भाषण, निष्फळ प्रयत्न असा याचा अर्थ आहे. उसाचे गु-हाळ चालू झाले की तिथे उसाचा रस पिण्यासाठी झुंबड असते. उसाचा रस अत्यंत पाचक व तब्येतीला उष्णतेपासून वाचविणारा असतो. एरंडही तब्येतीला चांगले असते. एरंडाचे तेल पोट साफ करण्यासाठी, आतड्यांना मऊपणा आणण्यासाठी वापरले जाते. पण ते तेल काढण्याची प्रक्रिया कठीण असते. त्यामुळे, व ते तेल बुळबुळीत व बेचव असल्यामुळे लोकांना घ्यावेसे वाटत नाही. गोड पदार्थ जीभेला चांगला लागतो. म्हणून 'एरंडाचे गु-हाळ' या वाक्प्रयोगाला असा अर्थ प्राप्त झाला असावा. हे वाक्प्रयोग ज्यांनी शोधून काढले त्यांच्या बुद्धिमत्तेची व कौशल्याची वाहवा तर करायलाच हवी, पण मराठी भाषेला ताकदवर बनविण्यात या लोकांचा मोठाच हात म्हणावा लागेल! गु-हाळ साधारणपणे उसाचेच असते. उसाचा रस काढून त्यापासून गूळ आणि साखर बनविण्याचा कारखाना म्हणजे 'गु-हाळ'.
'एरंडाचे गु-हाळ' (कारखाना) टाकणारा अव्यवहारीच म्हणावा लागेल! सरस्वती व सफलता सर्वांनाच साध्य करावीशी वाटते; पण त्या आधीची प्रक्रिया कंटाळवाणी व नीरसच असते. काथ्याकूट करु नकोस. खटाटोप करु नकोस, व्यर्थ लांबण लावू नकोस, दगडावर डोके आपटून घेऊ नकोस, पालथ्या घड्यावर पाणी घालू नकोस. असेच उपदेश असणार! सर्व काही झटपट हवे असते, पण आपले भाषण श्रेष्ठ ठरावे यासाठी 'डेमॉस्थेनिस' जंगलात जाऊन ते मोठमोठयाने म्हणून पाहत असे. श्रेष्ठत्व, सरसता चुटकीसरशी मिळत नसते. आंब्याचा रस काढायला किंवा सिताफळाचे कालवण करायला - एकूणच काय कशाचेही 'सार' काढायला नेट हा लागतोच! एकच गोष्ट वारंवार सांगितली की ती कंटाळवाणी होते. यातून काहीच निष्पन्न होणार नाही असे वाटते. पण मी 'एरंडाचे गु-हाळ' लावणारच आहे. बघू या! प्रयत्नांती परमेश्वर मिळतो का ते? मराठी भाषा समृध्द आहे. १ लाखापेक्षा जास्त शब्द निश्चितच आहेत. पण मराठीच्या अभिमान्यांना तरी ते माहित असतात का? इंग्रजी भाषेत ५ लाखांहून जास्त शब्द आहेत. नुसत्या भाषाभिमानाने काही होणार नाही. निरनिराळ्या भाषांची जी समृद्धी आहे, शब्दांची, अभिव्यक्तीची, आशयाची, त्याचा भाषाभिमान्यांनी अभ्यास करुन त्याचा लाभ इतरांना करुन द्यावयास हवा. खूप भाषा येतात याचा नुसता अभिमान नको. त्यातील अर्थरस इतरांनाही का नाही पाजायचा! किती महान कार्य होईल नाही हे! प्रयत्न खूप अपुरे पडतात म्हणून भाषा मागे पडली वगैरे चिंता केल्या जातात! सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे आपल्या भाषेला वैभवसंपन्न करण्याची. ऋध्दी म्हणजे वैभव व सिध्दी म्हणजे सरस्वती. या दोन्हीही देवता प्रसन्न व्हाव्या म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार! 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' - तुकाराम. प्राचीन, अर्वाचीन सारस्वतांनी आपापल्या परीने भाषा समृद्धीचे महत्कार्य केलेले आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकरांना 'मराठी भाषेचा शिवाजी' म्हणत असत. तरी इंग्रजी भाषेचे 'वाघिणीचे दूध' पिऊन त्यांनी स्वतःचा स्वत्वाभिमान गमविला नाही. टिळक, आगरकर, विवेकानंद या सर्वच त्या काळातील नेत्यांना इंग्रजी अस्खलित येत असे. 'केसरी' हे मराठी वृत्तपत्र तर 'मराठा' हे इंग्रजी वृत्तपत्र टिळक व आगरकर यांनी काढून भाषेचे असे कडक प्रहार केले की त्यांना त्यांच्या अग्रलेखांसाठी कारावास स्वीकारावा लागत असे. पण परधार्जिणे होऊन त्यांनी त्या गळचेपीसमोर मान तुकविली नाही. आपल्याइकडील गोष्टी तर बहुतेकांना माहितच असतात. ज्ञानसंवर्धन करावे. 'आपणास जे जे ठावे l ते इतरास सांगावे l शहाणे करुन सोडावे l सकळ जन' l असे पुन्हा आमचे रामदासच म्हणतात. या सर्व पूर्वसूरींनी जी अपार कष्टप्रद परिस्थिती अनुभविली तरीही, मराठी भाषेला ललामभूत अशी ग्रंथसंपदा निर्माण केली त्याला आजही तोड नाही. आपल्यावर ती वेळ नाही! तशा परिस्थितीत टिकून राहण्याचे मनोधैर्य आजही आपल्यात नाही. आपण तसे सर्वार्थानेच परधार्जिणे, पळपुटे व व्यवहाराचा अवलंब करणारे लोक आहोत. स्वार्थत्याग वगैरे शब्द आपल्यापासून शेकडोपटीने दूरच असतात. आपण अतिसामान्य माणसे आहोत! कमीतकमी आपली परंपरा, आपली संस्कृती, आपली भाषा व आपला धर्म यांची तोंडओळख तरी आपण ठेवावयास नको काय? सगळ्यांची खिल्ली उडवावयास काहीच विद्या व मंत्रांची गरज नसते. मंत्रशक्तीची उपासना करायला नेट लागतो. इतर धर्माचे लोक खूप कट्टर असतात. आपण सहिष्णु म्हणून प्रसिध्दच आहोत! मतांवर बंधने नसावीत! व्यक्तिस्वातंत्र्य आहे! लोकशाही आहे!
संगीता पाटखेडकर.
७/२/२०१६.
No comments:
Post a Comment