इंद्राला नेहमी त्याचे इंद्रपद डळमळते की काय असा धाक असायचा. खुर्ची सोडायची त्याला कधीच इच्छा नसायची. वज्रासुर नावाचा राक्षस खूप उन्मत्त झाला. कोणत्याच शस्त्रा-अस्त्राचा त्याच्यावर परिणाम होईना. इंद्र घाबरला. शंकराकडे येऊन काहीतरी करा म्हणून धरणे धरुन बसला. शंकराने त्याला दधीचि ऋषींकडे जाऊन त्यांच्या हाडांची मागणी कर; त्यापासून बनविलेले शस्त्रच वज्रासुराचा नाश करु शकेल असे सांगितले. दधीचि हे अत्यंत तपस्वी, सिध्दी प्राप्त, दानी ऋषी होते. त्यांनी इंद्राला स्वतःच्या हाडांचे दान केले. त्यांची हाडे अत्यंत मजबूत होती. एकेका हाडाला तपाचरणामुळे सिध्दी प्राप्त झाली होती. देवांचा कारागीर 'विश्वकर्मा' याने त्या हाडांपासून अणकुचीदार शस्त्र तयार केले, व त्याने त्या वज्रासुराचा अंत झाला. अशी कथा आहे. दधीचिच्या त्यागाचे नवलच वाटणार ना! पण असे लोक होते. आपला विश्वास बसत नाही; पण कर्णाने नाही का इंद्राला कवच-कुंडले दान केली. हरिश्चंद्राने नाही का स्वप्नात मागितलेले राज्याचे दान प्रत्यक्षात दिले. कृष्णाचे सुदर्शन चक्र शिशुपालाच्या मस्तकाचा छेद घेऊन गेले. असे म्हणतात की, सूर्याच्या एका किरणाची उष्णता त्या चक्रात प्रक्षेपित करण्यात आली होती. शंकराचा जो त्रिशूळ, तो शंकराने फक्त एकदाच वापरला. अंधकासुराचा नाश करताना! अंधकासुराचे वैशिष्टय असे होते की, त्याच्या रक्ताच्या एका थेंबातून पुन्हा असुर निर्माण होत असे. त्रिशूळ असा वापरला की रक्ताचा थेंब खाली पडणार नाही. त्रिपुरासुराचा नाश करताना वेगळ्या पध्दतीने त्रिशूळ बनविण्यात आला होता म्हणतात. पूर्वी जी शस्त्रे बनविली जात त्यात मंत्रशक्तीने जास्त तेजस्वी अशी ऊर्जा निर्माण केली जात असे. पाशुपतास्त्र, अग्न्यास्त्र वगैरे तपश्चर्या करुन मिळविली जात असत. धनुष्य सुध्दा प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म असणारे असत. अर्जुनाचे 'गांडीव' धनुष्य त्याला इंद्राने दिले होते. अर्जुन हा इंद्रपुत्र! रामाच्या धनुष्याचा भाता कधी संपत नसे. एकबाणी म्हणून 'राम' प्रसिध्द. शिवधनुष्य तर इतके जड की सीतेच्या स्वयंवरप्रसंगी अनेकांची ते उचलता उचलता फरफट झाली. शस्त्र-अस्त्रांचा वापर समाजाचे संरक्षण करता यावे म्हणून आवश्यकच होता. त्यात जास्तीतजास्त पारंगतता जो मिळवेल तो वीर ठरत असे. भाला, तलवार, खडग् यांचा वापर देव-दानवांच्या युध्द काळापासून होत असे. असे शूरवीर असत की झालेल्या जखमांची फिकीर न करता केवळ वनस्पतींच्या लेपाने जखमा ब-या करण्याचे शास्त्रसुद्धा प्रगत होते. राम-लक्ष्मण मूर्च्छित पडले त्यावेळी हनुमानाने वेळेअभावी द्रोणागिरी उचलून आणला व मग राम-लक्ष्मणावर योग्य त्या वनस्पतींचे उपचार झाले या कथा सर्वज्ञातच आहेत. आज 'युध्दस्य कथा रम्या' बदलल्या आहेत. अण्वस्त्र आली. बंदुकांचा वापर सर्रास होत आहे. रथ-घोडे, हत्तीदळ, पायदळ गेले. आता विमानातून बॉम्बवर्षाव केला जातो; पण या सर्व तयारीला लागणारे ज्ञान तर मानवानेच निर्माण केले ना! मानवाच्या बुद्धीकुशलतेचे नवल वाटते. जखमा, रोग यावर औषधोपचार सिध्द असतानाही प्रायोपवेशन करणाऱ्या लोकांचेही नवल वाटते. अशी दोन उदाहरणे तर मलाच माहित आहेत. एक विनोबा भावे - दुसरे - मंदा पत्तरकिनेचे वडील - मा.ज.कानेटकर. दुःख सहन करण्याची ताकद ही फार मोठी सहनशक्ती आहे. रामकृष्ण परमहंसांना घशाचा कँसर होता. विवेकानंदांनी त्यांना अनेकदा गळ घातली की कालीमाता तुमच्यावर एवढी प्रसन्न आहे, तर तिला म्हणा की एवढे दुःख मला देऊ नकोस. ते काहीच खाऊ शकत नव्हते. त्यांनी काय उत्तर द्यावे? - 'तुम्ही सर्वजण खाता, मला त्यातून मिळतेच! जनक हा विदेही म्हणून प्रसिध्द आहे. यज्ञात पाय जळत असताना त्यांना दुःखाची जाणीव होत नव्हती. ही असामान्य ताकदीची मंडळी सामान्यांना विस्मयचकीत करतात. भारत नेहमीच निरनिराळ्या आक्रमणांचा बळी ठरला आहे. या आक्रमकांनी अनेक प्रकारांनी अनन्वित छळ आपल्या लोकांचा केला आहे. दडपशाही, हुकुमशाहीच्या भरवशावर त्यांनी माणुसकीला नेहमीच तिलांजली दिली आहे. गायींची हत्या, स्त्रियांवर अत्याचार यांची तर गणतीच नाही. या सर्व परिस्थितीला तोंड देणारी शूरवीर व्यक्तित्वेही खूप निर्माण झाली. स्वतःची पर्वा न करता देशधर्मासाठी सर्वस्वाचे बलिदान करणारी माणसे जागोजागी त्याकाळात दिसतील. हा शक्तीचा, त्यागाचा, निश्चयाचा, नीतिमत्तेचा किरणोत्सर्ग खूप काही शिकवून जातो.
संगीता पाटखेडकर.
५/२/२०१६.
No comments:
Post a Comment