Tuesday, 16 February 2016

चावून चोथा

फार फार पूर्वी एकत्र कुटुंबपध्दती असे. वाडे मोठे असत. शेतीचा व्यवसाय असे. नोकरीसाठी परगावी जावे लागणे वगैरे संकल्पना नव्हत्या. सर्वांनी शेती बघायची. 'दोनच मुले पुरेत' वगैरे-वगैरे तर स्वप्नातही नव्हते. त्यामुळे घर 'खटल्याचे' असायचे. मग त्या घरातल्या मुलांचे लग्न झाल्यानंतर येणाऱ्या सुनांना मोठ्ठा आवाका पेलावा लागे. सगळ्यांच्या तीक्ष्ण नजरा तिच्यावरच केंद्रित असत. तीही साधारणपणे तशाच वृत्तीच्या कुटुंबातून आली असल्यामुळे मान मोडून सर्वांचे तीक्ष्ण, कटू बोलणे सहन करीत असे. संसाराचा गाडा रेटत रेटत एक दिवस ती सासू होई, पण नंतर तीही येणाऱ्या सुनेला अशाच पद्धतीने वागवत असे. का बरे? सून असताना तिच्या ज्या अपेक्षा होत्या त्या सासू झाल्यानंतर सुनेलाही असू शकतात याचा विचार का बरे कोणी करत नव्हते? एकच कारण - स्वतःच्या वागण्यात कधीच साधारणपणे दोष दिसत नसतो. आमचे ते खरे दुसरा दोषी, 'माझा तो मुलगा दुसऱ्याचा तो पो-या' अशी वृत्ती! पण किती काळ चालणार असे? एकत्र कुटुंबातील अनेक धुसफुशी, बेबनाव, कट-कारस्थाने समोर यायला लागली. व्यक्तिस्वातंत्र्याची भावना फोफावली. शिक्षणाचे वारे आले. नोकऱ्यांचे युग आले. उत्तम ती नोकरी अशी धारणा बनली. स्त्रियाही शिकायला लागल्या. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. जो तो अहंमन्य! कोणी कोणाला हूं म्हणायचे नाही. का बरे आम्ही सहन करायचे? माझे-माझे-माझे चे वर्चस्व झाले; आणि समाजाचा एकत्रतेचा डोलारा कोलमडला. स्त्रीशिक्षणाचे जसे फायदे तसे तोटेही ध्यानात येतात. स्त्री पैसा मिळवायला लागल्यावर तिला काय कमी? तिने का स्वयंपाक करुन इतरांचे जेवणखाण व्यवस्थित करण्यात धन्यता मानायची? का बरे सर्वांचे करायचे?
सासू-सासरे, दीर, नणंदा, नवरा यांची गुलाम की काय ती? प्रत्येकाने स्वतःचे पाहावे. मी का म्हणून इतकी जबाबदारी स्विकारायची? - ही भावना एकदा प्रबळ झाली की बघा कुटुंब-व्यवस्था कशी टिकणार? अहं पलीकडे जर भावना नसेल तर समाज व्यवस्थित चालणार कसा? नात्यांची जोपासना ही आज काळाची फार मोठी जबाबदारी होऊन राहिली आहे. नवरा-बायको हे नाते तर अत्यंत नाजूक आहे. ते टिकविण्यासाठी परस्पर सामंजस्याची अत्यंत आवश्यकता असते. जबाबदारीने वागले तरच समाजाचा गाडा व्यवस्थित चालून 'कुटुंब' या शब्दाचा अर्थ कायम राहील. नाहीतर घराला घरघर लागेल. प्रत्येक नात्याने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. Live in Relationship च्या या जमान्यात कुणी कुणावर विश्वास ठेवायचा? नैतिकता कशाशी खातात? नैतिकता म्हणजे काय? मोठे प्रश्नचिन्ह! व्यक्तिस्वातंत्र्याचा असा जर अर्थ निघत असेल तर?
' स्त्री स्वातंत्र्यमर्हति' असे मनूने म्हंटले होते. स्त्रीला जर स्वातंत्र्य दिले तर खूप काही बदलेल असे थोड्याफार प्रमाणात त्याला वाटले असेल पण ते इतके बदलेल अशी त्याने कल्पनाही केली नसेल. मी पुरुषांची बाजू घेत आहे असा याचा अर्थ नाही.
'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी' l मुलगी शिकली तर ती दोन्ही घरांचे(सासर-माहेर) कल्याण करील. निश्चितच स्त्री आज सर्व आघाड्यांवर यश मिळविते आहे. याचा आनंदच आहे. स्त्रियांना अबला समजून तिचे हक्क नेहमीच डावलले गेले हेही खरे! ही परिस्थिती बदलण्याची तिने जिद्द दाखवून आज ती राजकारणातही अग्रेसर आहे. तिच्यावर अत्याचार, बलात्कार या समस्या आहेतच! स्त्री पुढे गेलेली आजही पुरुषप्रधान संस्कृतीला आवडत नाही. सामाजिक समस्या खूप आहेत. समाजशास्त्रज्ञांसमोरचे प्रश्न '' वासत आहेत. स्त्रीची नाळ घोटली जात आहे. स्त्रीने नेहमीच घराला प्राधान्य दिले आहे हे सर्व खरे, पण तरीही आजही स्त्रीनेच कुटुंबव्यवस्था सांभाळण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मला वाटते. याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतर समाजचित्र देखणे होणार नाही.   अत्यंत जबाबदारीने वागणे हे सर्वांसाठी अत्त्यावश्यक आहे. हा विचार प्रसृत होणे आवश्यक आहे. ज्या क्षणी भांडणे होतात, त्याचा भडका होऊ देता तो क्षण कसा टाळता येईल; असे सामंजस्य जर प्रत्येकाने दाखवले तर आणि तरच नात्यांची एक सुंदर गुंफण बघायला मिळेल! परक्यांचे आदर्श चांगल्या बाबतीत ठेवा; याबाबतीत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नसून कर्तव्य हा आहे हे नेहमीच लक्षात असू द्यावे असे मला आवर्जून वाटते.

         संगीता पाटखेडकर.
         १६//२०१६.

No comments:

Post a Comment