मला कॉलेजमध्ये असताना नारदाची भूमिका करते का? म्हणून विचारणा झाली होती. ती विचारणारी मुलगी म्हणाली होती, 'तुझा चेहरा व तुझे केस या भूमिकेला मला साजेसे वाटतात'. मी 'नाही' म्हंटले होते. एका स्त्रीने पुरुषाची भूमिका करण्याचे ते एक आमच्या घरात फारच मोठे धाष्टर्य ठरले असते. असो. नारद ही व्यक्तिरेखा मला फार आवडते. विशेषतः अरुणने 'वाडा' काव्यात नारदाची जी प्रतिमा उभी केली आहे तेव्हापासून विशेषच!
'जय मल्हार' या सध्या टी.व्ही. वर चालू असलेल्या मालिकेतील 'नारद' बाणाईचा गुरु दाखविला आहे. जेजुरी गडावर खंडोबा-म्हाळसा सोबत विष्णू व लक्ष्मी निवास करीत आहेत व खंडोबाच्या जन्माचे आख्यान नारद कथन करतो आहे. या मालिकेमुळे जेजुरी गड पाहण्याची इच्छा तर प्रबळ होतेच. (वृंदा व आमोदराव जाणार आहेत) पण नारदाची भूमिका सर्वोत्कृष्ट वाटते हे वेगळेच. आपण सर्व संसाराच्या सारीपाटावरील नरदा आहोत. नारद हा ब्रह्मपुत्र व सरस्वती ही त्याची बहीण - सर्वच असामान्य! 'गीते' चा दहावा अध्याय त्यात 'देवर्षींमध्ये मी नारद आहे' असे कृष्णाने सांगितले आहे. नारद हा विश्वगुरु आहे. वाल्याचा वाल्मिकी नारदामुळेच झाला व 'वाल्मिकी रामायणाचा' जन्म झाला. पार्वतीने शंकराला प्रश्न केला-रामावतार का झाला? शंकराने उत्तर दिले, नारदाला आपण अहंकार-कामवासना जिंकली आहे असा गर्व झाला! विष्णूच्या मोहिनीरुपावर नारद भाळला.नारदाचा अहंकार विष्णूने दाखवून दिला. विष्णूला नारदाने शाप दिला, ज्या कामरुपी बंदरी, भालूंच्या आकर्षणात तू मला ठेवलेस त्याच बंदर-भालूच्या सहवासात तुला राहावे लागेल- म्हणून रामावतार अशी एक कथा वाचण्यात आली होती. नारद हा विष्णूभक्त. नारायण-नारायण-सदैव नामघोष, वीणा हाती, पहिला कीर्तनकार-त्रिभुवनसंचाराचा वर विष्णूपासून प्राप्त झालेला!
'कळलाव्या नारद' ही त्याची 'प्रतिमा'. पण हे 'कळ लावणे' सा-या जगाच्या भल्यासाठी!
रावणाने सारे देव डांबून ठेवले. त्याला अमरत्वाचे वरदान मिळालेले. पण नारदाने त्या सर्व देवांची मुखे वर करुन ठेव असे सांगून शनिदेवाचे दर्शन त्याला घडवून त्याला 'साडेसाती' दिली. 'देवकीचा आठवा पुत्र तुला मारेल' अशी आकाशवाणी कंसाने ऐकताच त्याने वसुदेव-देवकीला तुरुंगात टाकले. कोणता आठवा? शेवटून की पहिल्यापासून? असे कंसाला सांगून त्याच्या मनात नारदाने विकल्प निर्माण केला व सर्वच मुलांचा नाश करण्याचा सपाटा कंसाने लावून पाप पर्वत उभारला. नारद ब्रह्मचारी, विष्णूचा परमभक्त,
भक्तीचा परमोत्कर्ष,देवर्षी, त्रिभुवनसंचारी, आध्यात्मिक ज्ञानगुरु, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा, 'नारायण-नारायण' या जपसंकीर्तनाने ओळखला जाणारा, 'आमच्या वाड्यात' नित्य वास करणारा व त्याचे गुणसंकीर्तन करणारा, विष्णूचे जगत्पालनाचे कार्य सुलभ करण्यासाठी तत्पर असणारा हे सर्वच सद्गुण मिळवायला आपल्याला जन्मानुजन्मही अपुरे पडणार! कुणाला नारदाविषयी लिहायचे असेल तर जरुर लिहावे. अरुणने तर त्याच्या रसाळ काव्यात नारदाला अजरामर केले आहेच.
विमूढा नानुपश्यन्ति l
पश्यन्ति ज्ञानचक्षुषः l
(गीताध्याय-१५, श्लोक-१०)
अज्ञानी माणूस कधीच 'खरे स्वरुप' जीवाचे, जगताचे, परमात्म्याचे ओळखू शकत नाही. ज्ञानचक्षु उघडले (ते विवेकानेच उघडले जातात) तरच या सर्वांचे स्वरुप व्यक्ती ओळखू शकते. ज्ञानचक्षु उघडण्यासाठी लागणारा विवेक म्हणजे 'नारद' आहे.
'प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्' हे गणपती स्तोत्र नारद लिखित आहे. मी, प्रमोद वणीला असताना एक 'रामदासी' मोठी आईकडे आले होते. त्यांनी प्रमोदला, 'हे स्तोत्र रोज म्हणत जा' असा गुरुमंत्र दिला होता. नारद हा चिरंजीव आहे. सर्व युगांचा साक्षी आहे. कृष्णाला १६१०८ स्त्रिया, कृष्ण सर्व ठिकाणी असणे शक्य कसे? असे नारदाला वाटून त्याने कृष्णाला म्हंटले, 'तू जिथे नसणार तिथे मी वास्तव्य करतो'. नारदाने शोध घेतला. सर्वत्र कृष्ण आढळला. नारद कुठेच स्थिर राहू शकला नाही. एका जागी स्थिर राहणे म्हणजे आसक्ती निर्माण होणे. आसक्ती निवृत्ती म्हणजे 'कृष्णमयता' म्हणून 'नारायण-नारायण'.
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment