मन कुठे गुंतेल आणि गुंतण्याचा आवाका किती व्यापक असेल याची काहीच परिमिती नाही. 'हे विश्वचि माझे घर' म्हणणारे ज्ञानेश्वर किती सहृदय होते! छोटयाशा आयुष्यात अनेक विपत्तींशी सामना करीत इतकी मोठी जीवनधारणा त्यांनी बनविली व जीवन जगण्याचा मूलमंत्र देऊन गेले. जीवनासक्त असतानाही त्यात गुंतून न पडणे हे जगणे किती कठीण? पण माणूस अखंड गुंतणारा प्राणी आहे हे म्हंटल्यास वावगे होणार नाही. आपल्या जवळच्या व्यक्ती, वस्तू, वास्तू यात तो अखंड गुंततोच! निर्जीव ज्याला आपण समजतो अशा वास्तूही तो स्वतःबरोबर अखंड वागवितच असतो. राहते घर सोडणे ही प्रक्रिया अजिबातच सोपी नाही. घराचा कोंटा नि कोंटा परिचयाचा असतो. तिथे जीव दडला असतो. अनेक आठवणींशी निगडीत ते घर असते. त्या घराने मनात घर केलेले असते. निरनिराळ्या निमित्ताने कितीतरी घरांमध्ये राहण्याचा प्रसंग व्यक्तीला येऊ शकतो. ती सगळी घरे त्याच्या स्मरणात नित्य का बरे असतात? कारण ती माणसाच्या व्यक्तित्वाशी निगडित झालेली असतात. जिथे सावरकरांना अंदमानचा तुरुंग सोडताना वाईट वाटले होते तिथे बाकीच्यांची काय कथा? प्रत्येक ठिकाणच्या घराचे काही ना काही वैशिष्टय असते. उमरी, अकोला येथे आम्ही १९ वर्षे वास्तव्य केले. मुलांची शिक्षणे तेथेच झाली. आमचा संसार,आपत्ती, विपत्ती, संपत्ती तिथेच फुलारली. आजूबाजूचा वेटाळ, त्यावेळची माणसे, तेथील पोळा, होळी, आमच्या घराचा गच्च, त्यावरून घेतलेला चंद्र-चांदण्यांचा, आभाळाचा मनमुराद आस्वाद विसरणे केवळ अशक्य आहे. पुढील आयुष्यात तसे आभाळ पुन्हा उपभोगायला मिळाले नाही. मुलांना गच्चाचे घर खूप आवडत असते. तिथे आम्हाला चोरी होण्याचीही कधी भीती वाटली नाही.आजूबाजूचे सगळेजण एकमेकांना समजून घेणारे वाटत होते. आज परिस्थिती खूपच बदलली आहे. कोण कोणाला केव्हा लुबाडेल याचा नेम राहिलेला नाही. आताच्याही घराला गच्च असला तरी त्याचा उपयोग व उपभोग घेऊ शकत नाही. लग्न होण्यापूर्वी महाल, पाताळेश्वर रोड, नागपूर येथील मोहरीरांच्या वाड्यात, आईवडिल, बहीण-भावंडे यांच्या सानिध्यात आयुष्याचा बराच मोठा पट सरकला. लहानपण तिथेच बागडले. शिक्षणाचा ओनामा तिथेच गिरविला. व्यक्तित्व विकासाच्या सर्व गोष्टींनी तो वाडा सतत समृध्द होत राहिला. आयुष्याचे अविभाज्य अंग बनला. लग्नानंतर गोंदिया, तेथील घर, नंतर हैद्राबाद, तेथील एक वर्षाचे वास्तव्य, तेथील क्वार्टर, तेथून अकोला, तेथेही तीन चार घरे बदलली; ती सर्व माझ्याबरोबरच आहेत. इतरांचेही असेच होत असावे. व्यक्ती तर काही विचारुच नका. निरनिराळ्या कारणांनी संबंधात आलेल्या व्यक्ती कायम स्मरणात राहतात. मग त्यात गुरुजन असतात, मित्रमैत्रिणी, नातलग, परिचित सर्वांचाच समावेश असतो. 'हृदयी प्रीत जागते l जाणता अजाणता' अशी अवस्था होते. 'बिकट वाट वहिवाट नसावी l धोपटमार्गा सोडू नको l संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरु नको' - अनंत फंदी. हीच साधारणपणे माणसाची प्रवृत्ती असते; कारण वेगळा मार्ग अंधारात, अपरिचयाचा असतो. जो रस्ता माहित आहे त्याने जाणे केव्हाही सोयीचे व भीती मनात निर्माण होत नाही. नेहमीच ज्या वाटेने गेले नाही, पण ती वाट आहे - त्याचेही आकर्षण माणसाच्या मनात असतेच. मन मोठे विचित्र असते. जे माहित नाही- ते माहित करुन घेण्याचीही उत्सुकता त्याला असतेच. सामान्य माणसांचा मार्ग प्रवृत्तीचा व असामान्यांचा मार्ग निवृत्तीचा! जो संतांनी अनुसरला! तिथे सर्व त्यागच त्याग असतो. आसक्तीचे नामोनिशाण नसेल तरच त्या मार्गाकडे बघता तरी येते. कशात गुंतू नये म्हणतात. पण तसे अनुसरणे अशक्य वाटते. जग चाललेच नसते. आपलेपणा हे गुंतण्याचे एक कारण आहे. मग ही आपुलकी विस्तारा. केवढा हा जीवनाचा पसारा आहे. नजर फाकवा! आयुष्य सर्वांचा आस्वाद घेता घेता कधी संपत आले कळणारसुध्दा नाही. संकुचित, मी-माझेचे कुंपण ओलांडून सगळ्याच जीवनाला कवेत घेऊ म्हंटले तर आयुष्याची वर्षे अपुरी पडावीत असा हा सर्व पसारा आहे. सर्वांचा विचार करणारा माणूसच 'मी' पणातून निघू शकतो. विवेकानंदांनी तर लोकांसाठी कार्य करण्याची इच्छा मनात ठेवून पुनर्जन्माची अपेक्षा ठेवली होती. जगाच्या कल्याणासाठी संतमंडळी अखंड झटतात. संन्यास घेणाऱ्या व्यक्तींनी- भविष्यात काय होऊ शकेल यादृष्टीने जर स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग लोकांना करुन दिला तर ते हितावहच ठरते. जुन्या वैदिक काळातील ऋषीमुनींची जगाच्या शोधाची जिज्ञासा बघितली तर थक्क व्हायला होते. आयुष्याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत माणसाने नेहमीच आसक्त असावे. ३३ कोटी देव व ८४ लक्ष योनी निर्माण करणारी जी शक्ती आहे तिच्या कल्पकतेची जितकी वाहवा करावी तितकी थोडीच! पण मला असे वाटते की कल्पकतेलाही हीच मर्यादा असावी. माणसाला, प्राण्यांना मरण आहे. आत्मा अमर आहे तर मग हेच आत्मे- वेगवेगळ्या रुपात पुनः निर्मित होत असावेत- ही परमेश्वराची कल्पकता आपण जाणू शकत नाही; कारण आपली दृष्टी तितकी विकसित नाही; पण असेच असावे असे मला वाटत राहते. हा शोध आपण कसा घेणार? माणसाला सतत गुंतवून ठेवण्याची ही परमेश्वराची कल्पकता खासच म्हणावी लागेल; त्याला तोड नाही; त्यामुळे ३३ कोटी देव व ८४ लक्ष योनी ही संख्या आजतागायत बदललेली नाही. परमेश्वराची कल्पकता इथे पूर्णविराम घेते असे मला वाटते.
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment