३३ कोटी देव, ८४ लक्ष योनी निर्माण करुन झाले नाही का तुझे समाधान!
किती हे निर्माणच निर्माण!
किती आहेस तू कल्पक, याचा अंदाज येत नाही मला
माणसापुढे किती निर्माण केलीस आव्हाने, कळते का तुला?
युगानुयुगे लोटली तरी तुझी निर्मिति संपतच नाही.
'एकोsहं बहुस्याम्' व्हायची तुला इच्छा, सर्व खरे!
पण किती आणि कां याचे उत्तर देशील का मला?
किती पसारा निर्माण केलास,
आवरणार कधी?
थकला रे माणूस आता त्याची तुला कीव येणार कधी?
धापा टाकतो रे बिचारा, ब्लडप्रेशर वाढते
हृदयाचे ठोके होतात अनावर,
दमछाक होते
एकाच व्यक्तीची धावपळ पाहून जीव होतो घाबराघुबरा
तू तर इतका निर्मितीत दंग, तुझे काय होत असेल?
या विचाराने मन होते कावरेबावरे, तुझी रे चिंता मला!
तुझ्या कल्पकतेला क्षितिज ठेंगणे आहे की आकाश?
एकच सूर्य निर्माण करुन तू थांबला नाहीस- पुरेसा वाटला नाही का प्रकाश?
एकासारखी सात असतात, म्हणतात माणसे
कुठे कुठे दडविलीस, एकाच खंडात नसतील दिसत, असे वाटते, कारण माणसाच्या शोधाची तुला परीक्षा बघायची असते! होय ना! पण एक मात्र खरे! तू निर्माण करतच गेलास! माणूस शोधतच गेला!
कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला की रे! मानव चंद्रावरही
गेला की रे! पशुपक्ष्यांचा, निसर्गाचा अभ्यास केला की रे!
मनाचा थांगपत्ता लावण्यात दंग झाला की रे!
तुझाही शोध तो घेतोच आहे.
एकदिवस तू ठाकणारच समोर!
विश्वास आहे मला
होऊ नको निरुत्तर
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment