Sunday, 14 February 2016

'कार्तिकी एकादशी' (प्रबोधिनी एकादशी)

बाबांचा जन्म श्रावणातल्या पुत्रदा एकादशीचा. आई अजूनही एकादशी व्रत करते.
या दोघांच्याही जीवनाचा वस्तुपाठ आपल्यासमोर आहे.
सत्शील, पुण्यमयी आयुष्य काय असते याचा तो आदर्शच म्हणावा लागेल. मोठी-आई, अण्णाजी, शांता मावशी, बाळशास्त्री सर्वच जण एकादशी 'व्रत' म्हणून पाळायचे. या सर्वांची जीवने आपल्या संस्कृतीची मार्गदर्शक ठरावीत अशीच आहेत. आपली हिंदू संस्कृती ही परमेश्वरसाक्षी आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरात मोठी भक्तांची मांदियाळी जमते. कित्येक घराण्यात पंढरपूर वारीचा वंशपरंपरागत नेम असतो. वारकरी संप्रदायाने तर विठ्ठल भक्तीचे अधिष्ठान सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला देऊन भक्तीचे बीजारोपण त्यांच्या मनात पेरुन भक्तीचा वटवृक्ष थेट आभाळाला टेकेल इतक्या उंचीपर्यंत नेला. कृष्ण हाच विठ्ठलस्वरुपात रुक्मिणीविरहित आला पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीने आनंदित होऊन त्याला दर्शन देता झाला पण पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत इतका मग्न की त्याने वीट फेकली त्यावर तो युगे अठ्ठावीस तिष्ठत उभा राहिला. किती भक्तीसुरस कथा
"युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रुक्माई नित्य करी शोभा
पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उध्दरी जगा"
ही पाच कडव्यांची रामदासांनी लिहिलेली आरती नित्य पूजापाठात भक्तगण आळवत असतात. भक्तीच्या निष्ठेचा प्रवाह माणसाला जीवनप्रवाहात कधीच पतित होऊ देत नाही. जन्मापासून मरणापर्यंतचा प्रवास करावयाचा तर पाथेय तर लागणारच! कोsहं हा विचार करण्याइतकी मानसिक क्षमता तर लहान बालकात नसतेच. पण कुठून आलो हा विचार प्रत्येकासमोर असला पाहिजे. अर्थातच कुठे जायचे आहे हाही प्रश्न समोर उभा ठाकायलाच हवा!  मग 'पाथेय' काय? तर 'ज्ञानार्जन'.
नंतर धनार्जन. ज्ञान मिळविले की धन मिळविता येते. पण हे धन 'त्येन त्यक्तेण भुंजीथा' या न्यायाने वापरावयाचे. त्यागपूर्वक धनाचे संपादन केले तरच पुण्यार्जन होते. शेवटी जीवन कसे घालवावयाचे? पुण्य म्हणजे आनंद - जीवनस्वरुप हेच
आनंद केव्हा मिळेल
जर नितिमत्तेच्या दिशेने नेहमीच अनुसरण केले तर आणि तरच! हा सर्व मार्ग परमेश्वरापर्यंत घेऊन जातो त्याच्या चरणी लीन होऊन जीवनमरणाच्या पाशातून मुक्त होण्याची प्रबळ इच्छा विचारी माणसाच्या मनात निर्माण होते. हेच कार्य ही व्रतवैकल्ये करीत असतात. चातुर्मासात झोपलेला देव आता आजपासून जागा होत आहे.
त्याला नव्हे तर आपण आपल्याला आपल्याबरोबर इतरांना -या अर्थाने जागृत करावयाचे आहे.
"नाममंत्र जप l कोटी जाईल पाप l रामकृष्णी संकल्प धरुनी राहे
निजवृत्ती काढी l सर्व माया तोडी l इंद्रियासवडी लपू नको" l
 हरिपाठ - ज्ञानेश्वर.
सावरकरांना अंदमानला पाठविले तेव्हा त्यांचा साळा त्यांना म्हणाला, एक गोष्ट करा- 'कृष्णाय वासुदेवाय   हरये परमात्मने l प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः' l  हा मंत्र तुम्हाला म्हणता येईल तितके वेळा म्हणत चला! दुःखनिरसन होईल. निष्ठा असते. त्याचे फळ दिसत नसते. पण 'पुण्याची गणना कोण करी?' हेच खरे


     संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment