मनाचे कवाड उघड ना नीट
समोर दिसतो ना सूर्य?
घे त्याचे तेज पिऊन
आपोआप स्वच्छ होईल सर्व
अंतरात्म्यात जळमटे किती?
काढून टाक ना आता!
किती दिवस साचून साचून ठेवतेस - फेक कच-याची कुंडी आता!
सूर्य प्रकाशाने उजळले मन की दिवस होतो ना तेजस्वी
'मुंगी उडाली आकाशी l
तिने गिळिले सूर्याशी' l
मुक्ताबाईची तुला येऊ दे ना प्रचिती !
काय झाली असेल या आध्यात्मिक अनुभवाने
मुक्ताबाईची अवस्था?
करत जा ना थोडा विचार!
किती ठेवतेस नेहमीचीच दूरवस्था!
अमृत घे ना पिऊन l दिसते ना तुला सर्वत्र
पाण्यानेच नको पोट भरुस l
घे सारे काही यत्र-तत्र, इतरत्र
दिले आहे कितीतरी दान l
भरुन घे ना झोळी
आतातरी खडबडून जागी हो
करु नकोस आयुष्याची होळी
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद l नुसतीच नावे नको घेऊस
कर त्यांचा अभ्यास- घे निदिध्यास, खोल ठसव मनात
'आत्म्याचे अनुसंधान' - याचा किती घेतला शोध ऋषीमुनींनी!
तुझा आत्मा का तडफडत नाही? येऊ दे ना आतातरी भान
नुसतीच पाहतेस.......विचारांचा ठावठिकाणा काहीच नाही
दृष्टी कर ना अलौकिक l
नुसताच पाहू नकोस सूर्य आणि त्याचा प्रकाश
लख्ख होऊ दे तुझे मन
आकाश उजळून टाक झकास
अति लख्ख चैतन्य......
उजळून टाक विश्व
एकच नाही ना सूर्य ! अनंत ग्रहगोल......फाकतच जाते दृष्टी
चैतन्याच्या ध्यासाने, उदार होऊन कधी करणार मनमोकळी वृष्टी
कर वर्षाव चैतन्याचा
हो चैतन्य
उजळून टाक सर्व सृष्टी
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment