उठे उठे 'नंदनगिरी' आठवले l पद्धत असायची, ब्राह्मणाच्या तर्फे घरातील स्त्रियांनी वडसावित्री, मंगळागौरी, काजळतीज वगैरे-वगैरे पूजा साग्रसंगीत करावयाच्या l आज या सर्व प्रथा-परंपरांना नास्तिकतेच्या सेन्सॉर बोर्डाची कात्री लागलेली आहे. घरच्या गृहिणीही मनोभावे त्या त्या पूजांची जी तयारी असेल ती करुन, चौरंग वगैरे सजवून, जी आरास करणे शक्य असेल ती करुन, पूजेसाठी वेळेवारी सिध्द असावयाच्या! कारण पूजा सांगणारा ब्राह्मण व्यस्त असावयाचा! अनेक घरची त्यांना आमंत्रणे असावयाची! 'नंदनगिरी' तर फार काटेकोर l थोडा जरी विलंब होतो आहे असे त्यांना आढळले तर निघून जायला तयार! जुना ऋषिच असावा असे वाटायचे! सहस्त्रचंडीचे देऊळ बडकस चौकाच्या रस्त्यावर होते तेथील ते पुजारी. सप्तधान्याच्या भरलेल्या वाट्या वडसावित्रीच्या तीन दिवसांच्या पूजेनंतर अरुण त्या देवळात जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. 'बी.ए.एल्.एल्.बी.' म्हणजे खूप शिकलेला, अशी त्यांची धारणा असावयाची.काय त्या पूजा, काय त्या निष्ठा, काय त्या धार्मिक गृहिणी! सारेच अजब रसायन होते. काळ किती बदलला! - असे म्हणता म्हणता मोठ्या दिमाखदार पध्दतीने ही सर्व दृश्ये आज टी.व्ही.वरुन दाखविण्यात येतात. पाहतांना मराठी संस्कृती कुठेतरी कायम आहे असा दिलासा मिळतो. 'पुण्याची गणना कोण करी?'- मावशीकडे मोठे वडाचे झाड होते. दक्षिणामूर्ति मंदिरात! कोण गर्दी- वडाच्या पूजेला! पूजेला आलेल्या बाया मावशीलाही भेटून जात. मावशी वडाची पूजा छान करायची. मावशी खूप कलाकुसरीची होती. सौंदर्यदृष्टी तिच्याजवळ असल्यामुळे तिचे कोणतेही काम अव्वल दर्जाचे असावयाचे. काजळतीजेची पूजा म्हणजे तर लवकर उठून, तयार होऊन, परड्या घेऊन, शुक्रवार तलावावर जाऊन गौर काढून आणायची, तिथे पूजा, घरी आल्यावर पूजा, सगळी धूम धूम असायची; त्याच दिवशी गणेश चतुर्थी असली तर काही विचारुच नका. नवीन लुगडे घाईने बदलून आई सोवळे नेसायची व स्वयंपाकाच्या तयारीला लागायची. कडक काजळतीजेचा उपवास. पाण्याचा घोटही पूजा होईस्तोवर घेतलेला नसायचा! ह्या सर्व निष्ठांनी त्यांना काय दिले माहित नाही; पण कुठेतरी नतमस्तक व्हावेसे वाटते हे निश्चित! सणवार करावे तर या गृहिणींनीच! काय ते फुलोरे, काय ते ताट, व्यवस्थित सजविण्यासाठीची त्यांची कार्यतत्परता, काय त्या रांगोळ्या, काय ते मागे पाट-पुढे पाट, लावलेली उदबत्ती आणि सुग्रास अन्नाचा थाट! बुफे नाही बरं का! अगदी पंगती बसवून वाकून वाढायचे. किती व्यायाम त्यांना घडत होता. आज कंबर वाकतच नाही- का असे? जीवनधारणा बदलल्या हे तर कारण नसेल? तेव्हाचे चांगले, वगैरे असा कोणताही निर्णय द्यावयाचा नाही; पण तो काळ आठवतो एवढेच! काय एकेका रस्त्याचे भाग्य तरी! पाताळेश्वर रोड- अगदी छोटासा रस्ता; पण शैक्षणिक वास्तू, दवाखाना, मंदीर, किराणा दुकान, राशन दुकान, इस्त्रीचे दुकान! सगळ्या जीवनावश्यक सुविधा अगदी आटोक्यात, त्यामुळे छोटासा रस्ता फुलून जायचा. किती 'पाऊलखुणा' या रस्त्याने स्वतःजवळ जपून ठेवल्या असतील! आज कोण कुठे, कोण कुठे? पण रस्त्याच्या आठवणीही मनात रेंगाळतातच! किती वाहते असावे हे त्या रस्त्याने शिकविले! 'थांबला तो संपला, चालत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे', असेच सर्वांचे झाले. चालत्या वाटेची उष्णता आयुष्याला आकार देऊन शक्ती देते. डोंगर कधी माणसापर्यंत येत नाही. नम्र निश्चयापुढे डोंगरमाथा लवतो. 'आज डोंगर, उद्या जग'! चालल्याने वाट संपते. अनेक वाटा गवसतात. 'अजूनि चालतेचि वाट'- त्या पाताळेश्वर रस्त्याने सर्व वाटा सुकर केल्यात. कुणाकुणाचे ऋण मानायचे? भरभरुन दिले आयुष्याने. प्रपंच आणि परमार्थाची वाट गवसली. 'आध्यात्मिक वृत्ती' निर्माण करणारी प्रभावी, सामर्थ्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाची माणसे याच वाटेवर गवसली. पंढरपूरात गेल्यानंतर देवळात आधी नामदेवाची पायरी आहे. तिथे नतमस्तक होऊन मगच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागते. अशी अनेक ठिकाणी- पदोपदी- नतमस्तक व्हावेसे वाटावे अशा व्यक्तिरेखा आयुष्याला घडवून गेल्या.....म्हणून त्या पूर्णच वाटेला साष्टांग प्रणिपात!
असे म्हणावेसे वाटते-
'जीव घुटमळतो'
"आभाळागत माया तुझी
सरसरणारी वर्षा तू,
झिमझिमणारी बरसात तू,
मायेचा ओलावा तू,
सायीचा हात तू,
लोण्यागत पिघळणारी तू,
सापडेना वाट ज्यांना तू तयांचा सारथी"
अशी ही वाट चोखाळणे भाग्याचे!
संगीता पाटखेडकर.
२/१/२०१६
No comments:
Post a Comment