विष्णूसहस्त्रनाम वाचण्याची प्रेरणा मला १९८८ साली गोकुळ अष्टमीला झाली. माझे पती, मुकुंदराव पाटखेडकर त्यावेळी चिखलद-याला कार्यरत होते. मृदुला, अमोल, विशाल सगळेच 'बच्चेकंपनी' होती. आम्ही त्यावेळी अकोल्याला 'उमरी' या भागात राहत होतो. कृष्णजन्म मी नेहमीच साजरा करीत असे. चिखलद-याच्या आय.टी.आय. शाखेतही 'कृष्णजन्म' करीत असत. धार्मिक प्रवृत्तीची माणसे आपल्या समाजात खूपच आढळतात! 'सुंठोडा' तर खासच असे! नुसती सुंठ-साखर नाही तर त्यात खोबरे, किसमिस, विलायची, जायफळ, काजू, बदाम एकूण सर्व सुकामेवा घालून जर तो तयार केला तर अवीट गोडीचा पदार्थ तयार होतो व तो पौष्टिक असून तब्येतीला चांगला असतो. कृष्ण हा रसिक, श्रीमंत देव! त्याला अर्पण करावे तितके थोडेच आहे. दही-दूध, लोणी यांचा तर तो भोक्ताच! मुकुंदराव चिखलद-याहून गोकुळअष्टमीच्या दिवशी रात्री अकोल्याला आल्याशिवाय कधी राहिले नाहीत. माझा उपवास असे, पण त्यांना नसल्यामुळे ते आल्यानंतर त्यांच्या जेवणाची तयारी करुन त्यांना सर्व प्रसाद मी देत असे. माझी पूजा वगैरे झाली असावयाची. धार्मिक प्रवृत्तीचा वारसा असल्यामुळे प्रेरणा झाली व त्यादिवशी प्रथम मी 'विष्णूसहस्त्रनाम' वाचले. मलाही वाचायला वेळ लागला. त्याचदिवशी नेम केला की रोज एकदा वाचायचे! आणि रोज वाचता वाचता काय आश्चर्य? - एकदिवस मला जाणवले की ते न पाहता मला घडघड म्हणता येत आहे. आनंद गगनात मावेना. मग त्यानंतर मी पाठांतराचा सपाटाच लावला. सर्व संसाराची जबाबदारी सांभाळून रात्री लवकर उठून, कधी-कधी रात्री अडीचलाही- मी भगवद्गीतेचे अध्याय पाठ करायला घेतले. मग 'पुरुषसूक्त', 'श्रीसूक्त', 'अथर्वशीर्ष', 'रामरक्षा', 'हरिपाठ' - करतो म्हंटले तर काय नाही होत? श्रध्दा व निष्ठा हवी. ती होतीच! आनंद संपता संपेनाच, पण जाणीव होत गेली की ज्ञान संपता संपणारे नाही - अहंमन्यता करु नकोस! हा प्रत्यय तर मला अमेरिकेतही आला! अमोल, मी व मुकुंदराव - अमेरिकेतील जितकी देवस्थाने पाहता येतील तितकी पाहण्याचे ठाणले. काय तिथली देवस्थाने! कुठून कुठून लोक यायचे! त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, देवस्थान, एकंदर परिसर खूप अवाढव्य व देखणा! बगीचा तर फुली फुलून आलेला! पूजा तर इतकी सुंदर व्हावयाची की बस्स्, पाहातच राहावे! तेथील मंत्र व आरत्या ऐकून अभिमान गळून पडत असे. त्यानंतर तेथील बुफे - सर्वच खूप वाखाणण्याजोगे! सांगायचा मतलब, माणसाने कधीच कोणत्याच बाबतीत अभिमान करु नये! एकापेक्षा एक वरचढ तुम्हाला भेटणारच! दुनिया रंगरंगिली हेच सत्य!
विदर्भातील थोर महात्मे प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज यांचा 'अदृश्यदीपिका' नावाचा एक ग्रंथ आहे. त्यांनी संकलित केलेला हा ग्रंथ आहे. अनेक जे अद्भुत अनुभव अनेकांना येत असतात, त्यांनी ते लिहायचे त्यांच्याजवळील वहीत व त्यावर स्वाक्षरीही करावयाची! गुलाबराव महाराज स्वतः जन्मांध होते; पण ज्ञानेश्वरीत कोणत्या पानावर कोणत्या ओव्या आहेत हे ते सांगू शकायचे. म्हणजे 'ज्ञानेश्वरी' त्यांना पाठ होती. हीच तर मुळात एक अद्भुत गोष्ट आहे.
विदर्भात अमरावतीला श्री. त्र्यंबक श्रीधर पिंपरकर म्हणून एक गृहस्थ. त्यांनी एक आश्चर्यकारक हकीकत नोंदवलेली आहे. इंग्रजांच्या काळामध्ये एलिचपूरला एक रिसालदार राहत होते. सरकारी नोकरी करणारा एक कारकून रोज पूजा झाल्यावर गीता व विष्णूसहस्त्रनाम पाठ करीत असे. शेजारी एक वृध्द शेतकरी! तोही याच्याघरी येऊन गीतापाठ व विष्णूसहस्त्रनाम श्रवण करत असे. तो पुढे आजारी झाला तेव्हा त्याने या पाठ करणाऱ्याला विनंती केली की, 'मला रोज यातले काहीतरी माझ्याकडे येऊन ऐकवा'! या गृहस्थांनी त्याला ऐकवले! पुढे तो वृध्द मरण पावला. हा गृहस्थ एकदा देवपूजा करत असताना त्याला जाणवले की कुणीतरी उभे आहे. त्याने पाहिले - तो हा वृध्द शेतकरी! 'तू तर मरण पावलास - इथे कसा?' त्याने विचारले. " मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे. तुम्ही ऐकविलेल्या गीता व विष्णूसहस्त्रनामाच्या श्रवणाचे पुण्य म्हणून मला विष्णूंनी विष्णूदूत बनविले आहे, हेही मला तुम्हाला सांगायचे होते." पण या गृहस्थाच्या मनात पाल चुकचुकली की, आपला मरणकाळ जवळ आला की काय? तो शेतकरी म्हणाला, मी त्या रिसालदारासाठी आलो आहे. पण तोही रोज तुळशीची पूजा करतो, भगवंताचे नामस्मरण करतो, पण पापही तेवढेच करतो. त्याला न्यायला यमदूतही निघाले आहेत. त्या रिसालदाराची एक घोड्याची पागा. त्यात एक नाठाळ घोडा. हा रिसालदार घराच्या ओसरीवर बसलेला असेल. घोडा नाठाळ असल्यामुळे त्याच्या पायांना दोर बांधलेला असेल. यमदूत तो दोर सोडतील. तो घोडा उधळेल. त्याला आवरण्यासाठी रिसालदार उठेल. घोडा लाथ मारेल, ती त्याच्या छातीत बसेल व तो तीन ताड उडेल. तो जर तुळशीवृंदावनावर पडला तर आमच्या सद्दीमध्ये येईल, मग त्याला मी नेईन! पण जर का तो बाजूला पडला तर त्याला यमदूत नेतील! या सरकारी कारकूनाला मोठी उत्सुकता! तो म्हणाला, 'काय होते हे पाहायला मी येऊ शकतो काय?' वृध्द म्हणाला, 'हो, पण मी जे तुम्हाला सांगितले ते त्या रिसालदाराला सांगू नका'. हा कारकून गेला रिसालदाराकडे. पुढे सर्व त्या वृध्दाने सांगितले तसेच घडले. ही सत्यकथा आहे म्हणतात!
श्रीमदाद्य शंकराचार्य यांची विष्णूसहस्त्रनामावर प्रथम भाष्यरचना आहे. प्रत्येक नामाचा मूलगामी उलगडा त्यांनी करुन दाखविला आहे. श्रीभीष्मांनी युधिष्ठिराला विष्णूसहस्त्रनामाचा उपदेश श्रीकृष्णाच्या समोर केला; त्यामुळे त्याचे प्रामाण्य व माहात्म्यही मोठे आहे. नाम हा शब्द मान या शब्दाच्या विपरीत आहे. ज्याच्या हृदयात नाम स्थिरावते त्याच्या हृदयातील अभिमान नाश पावतो. जे भगवंतांना आपली भगवत्ता विसरुन भक्ताकडे आकर्षित व्हायला लावते, भक्तांनाही नमित करते ते नाम. नामानेच साधकाला धर्म, भोग, मोक्ष आणि भगवत्प्रेम यांची प्राप्ती सुलभतेने होत असते. या स्तोत्रातील अनेक नामे समान अर्थाची वाटली किंवा पुनरुक्ती वाटली तरी त्यामध्ये सूक्ष्म असे अर्थाचे भेद आहेतच. काही वेळा विशिष्ट मंत्रसामर्थ्य प्रकट करविण्याकरिता भीष्मांनी नामक्रमात मुद्दामच एखादे पुनरुक्त नाम घेतलेले दिसते. जीवनदोष - स्वभावदोष दूर करणे, सद्गुणांची वृध्दी करणे व परमार्थाकरिता जी कमतरता असेल त्याची पूर्तता करणे असे तीन प्रकारचे संस्कार भगवन्नाम करीत असते.
क्रमशः
संगीता पाटखेडकर.
२०/२/२०१६.
No comments:
Post a Comment