वास्तू नेहमीच 'माझ्याकडे लक्ष द्या' असे म्हणत असते. दुर्लक्ष झाले की भगदाडं पडायला वेळ लागत नाही. त्यात मातीची वास्तू तर सर्वच जीवजंतूंना आमंत्रण करते. घुशी बिळं करतात. मुंगसांची बिळं असतात. मुंगसाच्या पाठीमागे साप असतात. छोटे मोठे जीवजंतू, हेच आपले घर मानायला लागतात. सडा-सारवणातच नेहमी मग्न राहावे लागते. मोठमोठे पक्क्या दगडी बांधणीचे गडकिल्ले 'आs' वासतात, तिथे माती तर तेव्हाच ढासळते. असेच मोहरीरांच्या वाड्याबाबत झाले. खूप दुरुस्तीची आवश्यकता होती. हे दुरुस्तीचे काम सुरु झाले तोपर्यंत १९६८-६९ साल उजाडले. घरात लाईटही नव्हते. तेही याच काळात आले. बाबांना त्याआधी एवढे मोठे काम काढण्यासाठी फुरसत मिळाली नसावी; आणि आम्ही म्हणजे, मी व प्रमोद याबाबतीत असमर्थ होतो. हे काम करणारे 'मंगलजी' होते. अरुण व वृंदानी चांगल्या आठवणी सांगितल्या आहेत. माझ्या आठवणी वेगळ्या आहेत. मंगलजींनी सुंदर कमळ मधल्या घरात काढले होते. देवघराला टाईल्सही त्याच काळात लागल्या. न्हाण्या(Bathrooms) बांधण्यात आल्या. न्हाणीत सिमेंटचा मोठा चौकोनाकार, डिझाईनचा, बसून आंघोळ करण्यासाठी, तयार करण्यात आला. न्हाणीत कॉर्नरही लागला. त्यांनी काम सफाईदारपणे केले. मधले घर पुष्कळसे चांगले झाले. मोठ्या लाकडी भिंतीतल्या आलमा-या झाल्या. अर्थातच या सर्व सुधारणांनी सर्वांचेच पुष्कळसे कार्य सुकर झाले. कोणतीही निर्मिती आनंद देत असते. या काळात मला ब्रम्हपुरीला नोकरी लागली होती. तेव्हापासून माझा नागपूरशी बराचसा संबंध तुटला होता. आयुष्याला वेगळे वळण मिळण्याची ती नांदी होती. बाळशास्त्रीही याच काळात गेले. मावशीचे आयुष्य खूपच बदलले. मोठी आई- अण्णाजी या सर्वांनाच या घटनेने आयुष्याचा प्रवाह वळवावा लागला. खूप सुख-दुःखपूर्ण घटनांचा हा काळ अनेकांच्या आयुष्याला वेगळेच वळण देणारा ठरला. बाळशास्त्रींच्या जाण्याची बातमी मला ब्रम्हपुरीच्या स्टाफ-रुममध्येच कळली. ८ दिवसही नोकरीला जॉईन होऊन झाले नव्हते. पगारी सुट्टी घेऊन मी नागपूरला आली. त्यादिवशी सकाळीच आई ब्रम्हपुरीहून आली होती. बाबांच्या पायाला फोड झाला होता. आईने तिच्याजवळची सामानाची पिशवी आंगणातच टाकून आई दक्षिणामूर्ति मंदिराकडे धावली होती. रस्त्याने खूप शुकशुकाट होता असे ती सांगते. मावशी-बाळशास्त्री, मोठीआई-अण्णाजी हे आमच्या आयुष्याचे अविभाज्य अंग होते. या घटनेने पुढे चार महिने ब्रम्हपुरीला कोणीच येऊ शकले नव्हते. मला माझे आयुष्य सिध्द करावयाचे होते. नवीन गाव, नवीन नोकरी, एकटे राहणे, आणि शिकविणे या सर्वच जबाबदाऱ्यांना एकसाथ तोंड द्यावयाचे होते. 'मंगलजी' म्हंटले की मला हा सर्व काळ आठवतो आणि घरात सुधारणा झाल्या याचा आनंद तर होतोच. नोकरी मिळाली याचा आनंद तर होतोच, पण बाळशास्त्री गेल्याचे दुःख वरचढ ठरते. सर्व अनित्य, मर्त्य आहे याचा प्रकर्षाने साक्षात्कार देणारा तो काळ ठरला. दुःख पचविण्याची ताकद गोळा करावी लागली. एक आयुष्य म्हणजे अनंत अनुभवांचे कडबोळे असते. तो वाडा कुणी बांधला? केव्हा? हे अर्थातच काही माहित नाही. बाबांनी कधी सांगितलेही नाही, पण वास्तू जुनीच. वास्तूला साधारण शंभर वर्षांचे आयुष्य असते म्हणतात. पडझड तर होतच राहणार! दुरुस्ती तात्पुरते काम भागवते, त्यामुळे त्यावेळी केलेली दुरुस्ती अनित्य ठरली. वाडाही अनित्य ठरला; पण सर्व दुरुस्तीच्या कामात आंगणातला रांगोळी काढण्याचा भाग पक्का सिमेंटकाँक्रीटचा होऊन गेला ही ठसठशीत घटना आजही मनात नित्य आहे. अकरा रुपयाला सिमेंटचे पोते मिळत होते हीही एक आठवण आहे.
संगीता पाटखेडकर.
५/१/२०१६
No comments:
Post a Comment