Sunday, 14 February 2016

यशाचे अनंत आभाळ

    "Success is a Journey, not a destination. The Secret of Success is Constancy to Purpose".
आयुष्य हा एक अखंड प्रवास आहे. पल्ला कुठवर गाठायचा काहीच माहित नाही. कुठे अंत आहे ज्ञात नाही. जन्माला आल्यानंतर, जन्म आपल्या हातात नाही, कुठे होणार माहित नसते. धर्म, कुळ, गोत्र सर्वच अज्ञात! नियतीच्या हातातील बाहुले असतो का आपण? वयाची कमीतकमी - वर्षेतरी साधारणपणे स्वतंत्र काही समजण्याची प्रवृत्ती नसते. हळूहळू सर्व वातावरणाशी ओळख व्हायला लागते. स्वतंत्र मत तर -याच कालावधीनंतर बनविण्याची ताकद येते असे वाटते, पण त्या मताला स्वातंत्र्य मिळते का? बहुतांशी गोष्टी आधीच कुटुंब, समाज यांनी ठरविल्या असतात. त्यातही ढुश्शी मारून पुढे जाऊ पाहणारा काही ना काही प्रवाहाच्या विरूध्द करायचे ठरवितो. आयुष्याचे ध्येय वगैरे विचार करु लागतो, पण प्रवाहपतितांची संख्या मोठी असते. शेवटी वय वाढतच असते. काही ना काही माणूस घडतोच. संसार, नोकरी, धंदा, आजारपण, जबाबदाऱ्या या चक्रात सापडतो. बाल्य तर बरेच अज्ञानात गेले, तरूणपण लहरी बेजबाबदार रीतीने घालविले, म्हातारपण आल्यावर तब्येतीचे रोने चालू झाले. काय करायला पाहिजे होते आपण? असा विचार करता करता लक्षात आले की काहीच का नाही करु शकलो आपण? कारण काहीच विचार करून कधीच वागलो नाही. असेच साधारणपणे ९९ टक्के लोकांचे होते. "Failures are divided into two classes - those who thought and never did, and those who did and never thought". यात आपण कुठे बसतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आद्य शंकराचार्य वयाच्या बाराव्या वर्षी सर्व वेदविद्या पारंगत झाले. वडील लहानपणीच वारले. ३६ वर्षांचेच आयुष्य त्यांना लाभले, पण प्रसिध्द वेदान्ती म्हणून ते यशोशिखरावर पोहोचले. ज्ञानेश्वर लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिते झाले. आजतागायत तो ग्रंथ अजरामर आहे. स्वामी विवेकानंदांना ३९ वर्षांचेच आयुष्य लाभले; पण शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करुन त्यांनी हिंदू धर्माची ध्वजा उंच उंच फडकाविली! बालकवी, आरती प्रभु यांची नावे साहित्याच्या क्षेत्रात अजरामर झाली. अल्पायुष्यात स्वतःच्या काव्यप्रतिभेने काव्याचे प्रांगण त्यांनी लखलखीत करून टाकले. अल्पायुष्यात कालखंडावर विजय मिळविणारे खूप आहेत. या लोकांना खूप आयुष्य मिळाले असते तर त्यांच्याहातून निश्चितच महान कार्य घडले असते. यश हे कालावधीवर अवलंबून नाही. तुम्ही किती निश्चयाने ध्येयाचा पाठपुरावा करता यावर ते अवलंबून आहे
' ग्रहांचे साह्य त्या शूरा l
  यशश्री पायीची दासी' l अशी 'यशवंत' कवींची एक सुंदर कविता आहे. एका मर्यादेत काही हासिल केले आणि संपले का सर्व? यशाला क्षितिज नाही. 'Nothing Succeeds like Success'. मला प्रमोदने त्याच्या दोन मित्रांची सांगितलेली गोष्ट आठवते. एका मित्राने स्वतःचा त्याच्या मित्राचाही P.H.D.चा थिसिस लिहिला. दोन्ही सबमिट केले. ज्याने लिहिला होता त्याला P.H.D. नाही मिळाली. ज्याच्या नावाने लिहिला त्याला मिळाली. लिहिणारा पागल झाला. काय म्हणायचे याला! यश की अपयश! लिहिणारा सांगूही शकत नव्हता की त्यानेच दुसरा थिसिस लिहिला म्हणून!  P.H.D. मिळविणाराही बोलू शकत नव्हता सत्य परिस्थिती
'To be or not to be' अशी परिस्थिती! पुढे काय झाले माहित नाही, पण असे करुन ज्याने यश मिळविले ते काय कामाचे! Fraud करुन मिळविलेल्या यशाला शून्य किंम्मत! यश हे निर्भेळ असावे. लखलखीत, चमकते, उज्वल आणि मंगल. यशाला परिसीमा नसावी. अनंत आभाळाखाली ठामपणे उभे राहण्याची हिम्मत देणारे यश हे दिगंत दुमदुमवून टाकते
'अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला' म्हणणारा कोलंबस आठवा
'कोलंबसाचे गर्वगीत'-कुसुमाग्रज.

         संगीता पाटखेडकर.

          //२०१६.

No comments:

Post a Comment