आर्थिक बाबतीत भरभराट सर्वांना प्रसन्न करणारी असते. पैशावाचून सर्वच व्यवहार अडतात. पैशामुळेच आयुष्य सुकर होते; म्हणून लहानमोठा त्याच्या पाठीमागे असतो. जेव्हा काही हाबड बसते तेव्हा काळजीने चेहरा लटकलेला राहतो. एका कुटुंबाचेच आपण करत नाही आहोत तर अनेकांना हातभार लावू शकतो ही भावना तर व्यक्तिमत्वाला उभारी आणते. Charity करु शकणारे असतात म्हणून पुष्कळ सामाजिक कार्ये होऊ शकतात. पण यात भ्रष्टाचार हाही एक मुद्दा अंतर्भूत होतोच. घरात भाडेकरु आहे म्हंटल्यानंतर महानगरपालिकेचा कर लागतो तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. तो डावलण्यासाठी पुष्कळ उपाय सुचविले जातात. एकतर सुगावा लागूच देऊ नका - भाडेकरु आहे म्हणून! दुसरा - महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संधान साधा, त्यांचा खिसा गरम करुन मोठ्या रकमेची करसंपदा टाळा! सर्वांनीच असे केले तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा खिसा चांगलाच फुगणार! शिवाय नगरविकास होणारच नाही. रस्ते तसेच खडबडीत, खड्ड्यांचे राहणार, वीजकपात होणारच, पाण्याचे नियोजन डामडौलच राहणार. रास्त मार्गाने पैसा भरला तरी हा जो खाणारा वर्ग आहे, तो तुमच्या मार्गात खोडे घालणार. 'प्रामाणिकपणा' हा आजच्या समाजव्यवस्थेत दुर्गुण ठरु पाहतो आहे. हे एका घराच्या कराच्या बाबतीतच नाही. समाजव्यवस्थेत हा भ्रष्टाचार सर्वदूर पसरलेला आहे. सामान्य माणसाला एकेका गोष्टीची जेव्हा माहिती होते तेव्हा त्याला धसका बसतो. काळा पैसा अशा पद्धतीने नीतिमत्तेचा बळी घेतो. काही थोडे लोक आवाज उठवितात. पण दडपशाही होऊन त्यांचा आवाज बंद करण्यात येतो. प्रसंगी त्यांचे खूनही होतात. भ्रष्टाचाराचा हा राक्षस खूप माजला आहे. आवाज उठविणा-यांचे प्रमाण नेहमीच कमी राहणार! आणि त्यांना, त्यांच्या कुटुंबाला त्यातून त्रासापलिकडे काहीच मिळणार नाही. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे. भ्रष्टाचाराचा राक्षस माणसाच्या नीतिमत्तेचा बळी घेतो. माणसाची विचारशक्ती खुंटवतो, त्याला भेकड बनवितो. पैशाचा मोह हा असा माणसाला कुविचारांच्या नरकाकडे नेतो! सर्वदूर याचा विचार होऊन ख-या व्यक्तिविकासाचा समाज व राष्ट्र कसे निर्माण होणार याचा आढावा प्रत्येकाने घेऊन निकोप राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात आवाज उठवायलाच हवा! 'अलक्ष्मी' घरात शिरु नये म्हणून लिंबू-मिरचीचे तोरण घराच्या प्रवेशद्वारावर लावणारे 'महाभाग' मी मुंबईत पाहिले आहेत! भीती माणसाला खाऊन टाकते. संपत्तीचा मोह माणसाला विनाशाच्या खाईकडे घेऊन जाणारा आहे; अशी जोपर्यंत मानसिकता होत नाही तोपर्यंत फायदा तर होणारच नाही. तोट्याचे गणित गुणाकाराने अगणित होणार हे कधी समजणार! प्रश्नाचा आवाका खूप मोठा आहे. उत्तर मिळणे दुरापास्तच वाटते! कुणाचेही नाव घेऊन मुद्दा पटविण्याची मला गरज वाटत नाही. उघड्या डोळ्यांनी प्रश्नाला सामोरे गेले तर भ्रष्टाचाराची खाई खूप मोठी आहे हे सर्वांच्याच लक्षात येणारे आहे. सज्जन, दुर्जन यांची यादी करायला गेले तर दुर्जनांची संख्या मोठी निघणार. सज्जन एखादाच. असे हे फायद्या-तोट्याचे, नफा-नुकसानीचे गणित आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी कुणी कधीच गैरमार्गाने गेले नाही अशी व्यक्ती शोधून तरी सापडेल का? उत्तर 'नाही' हेच असणार आहे. अॉफीसमधील पेन, पेन्सिल, कागद मुलांसाठी उचलणारा कारकून पकडला जातो व करोडोंचे घपले करणारा अॉफीसर नामानिराळा राहतो. हे दृश्य कितपत बरोबर आहे? छोटा घोटाळा, मोठा घोटाळा दोन्हीही गुन्हेच! पण कोण इतके विचार करुन वागते? म्हणूनच तर प्रश्न निर्माण होतात. म्हणतात ना तो 'चित्रगुप्त' बसलाच आहे तुमच्या कर्मांचा आढावा घ्यायला! चार बोटे भूमीपासून वर चालणारा युधिष्ठिराचा रथ 'नरो वा कुंजरो वा' झाल्यानंतर भूमीवरुन चालायला लागला! कृष्णानेच त्याला तसे करायला सांगितले होते. अनेकांच्या कल्याणासाठी - केंव्हा कसे धोरण स्वीकारायचे? - हे कुटिल चाणक्यापासून शिकावे. कृष्णकारस्थान ध्यानात घ्यावे! सामान्य लोकांना प्रश्नच प्रश्न पडतात. इतिहास धांडोळता खरे काय, खोटे काय कळतच नाही. सन्मार्गाने जाणाऱ्या माणसाला 'मनःशांती' मिळते एवढे मात्र निश्चित! युधिष्ठिर स्वर्गात पोहोचला. बाकीचे पांडव आधीच गतप्राण झाले. युधिष्ठिराला तिथे आधीच कौरवांची उपस्थिती दिसली म्हणतात. त्याने यमाला विचारले, हे कसे काय? त्याने सांगितले, त्या सर्वांनीच वीरमरण स्वीकारले आहे व त्यांना तुम्ही आधीच त्यांच्या कर्माची शिक्षा दिली आहे. तुम्ही पृथ्वीवर इतके वर्ष राज्य केले आहे. त्यांचे पाप संपले आहे. असा न्यायनिवाडा - बघा आता!
संगीता पाटखेडकर.
११/२/२०१६.
No comments:
Post a Comment