सत्ययुगात आत्मा होता खूपच उन्नत
त्रेतायुगात, द्वापारयुगात झाले तर महान अवतार!
नचिकेत जाऊ शकत होता यमाला जाब विचारायला,
मृत्यूनंतर काय? प्रश्नाचे उत्तर मागायला!
अवतारांनी दिला विश्वास
सत्यम्, शिवम्, सुंदराचा
वाढविली उत्कंठा त्यांची गळाभेट घेण्याचा
ऋषीमुनींना होते सामर्थ्य थेट
स्वर्गात जाण्याचे
त्यांची तपश्चर्या कठोर-देव समोर साक्षात करण्याचे
आपण किती कमकुवत!
झगड झगड झगडलो, रगड रगड रगडलो तरी मन राहणार नेहमीच दगड-येणार का कुवत देवत्व पावण्याचे?
कारण हे आहे कलियुग.........
आत्मा झाला आहे क्षीण
वस्त्र वापरून वापरून, धागा नि धागा विरला
ते झाले जीर्ण, शीर्ण, विदीर्ण
एकच आहे म्हणतात उपायl
"अखंड नामस्मरण"
त्याशिवाय नाही तरणोपायl
किती सोपा वाटतो ना उपाय?
पण मन टिकते का तुझे क्षणभर? राहते का अविचलीत? नाम सहज येते का ओठांवर?
'देवाचिये द्वारीl उभा क्षणभरीl
तेणे मुक्ती चारी साधियेल्या'l
हे तुला पाठ आहे; पण तो क्षण
साधता येतो का तुला?
नाही ना!
मन अखंड भिरभिरते, गरगरते, स्थिरावत नाहीच ना कुठे?
मग अखंड वाट पाहणेच तुझ्या नशिबी, घेऊ शकणार नाहीस काहीच आनंद
निराश नको होऊस.........
आनंद हेच त्याचे स्वरुप
ओळख नीट, पहा विश्वरुप आणि हो अरुप
निरामय, निराकार परमानंद झाला सगुण साकार!
अनेकानेक रुपात.........
सजीव- निर्जिवात.........
अमोघ अस्तित्व त्याचेl
कर दृष्टी विशाल, हो अमोल आणि मृदुल
तुझेच तर रुप तुझ्यापुढे
घेतले आकार!
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment