पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
पंचमहाभूतांमुळे सा-यांनाच मिळतो जीवनचैतन्याचा प्रकाश
तेज, धृति, क्षमा, दया आणि शांती
इथेच तर असते देवांची वसती
या सर्वांनीच केले आहे आजवर सृष्टीचे भरणपोषण
खंडित होऊ नये संस्कृती म्हणून करा प्रकृतीचे संवर्धन
आकृती मनात ठसावी म्हणून करा वृक्षारोपण
देणे ही मनोवृत्ती वृक्षांची म्हणून द्या त्यांना बीज व खतांचे मळण
फळांनी लगडलेला मळा
फुलांनी बहरलेला ताटवा
दृष्टीला व आरोग्याला किती पोषक हे जरा आठवा
अनेकानेक धान्ये, जीवनाचे करती तारण
मुलांच्या मनी ठसवा
करा सर्वांचे संरक्षण
यापैकी कुणीच ठेवत नाही
तुमच्यापासून अपेक्षा
कशाचेच बिल भरावे लागत नाही, कुठून आली ही निरपेक्षा?
शिका यातून काहीतरी
आपणही देणे लागतो कुणाचेतरी
कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर म्हणायचे नसते
दुसऱ्याचे ओझे वाहून वाहून
आपल्यावरील कर्ज चुकवायचे असते
निसर्गामुळे पोषण तर गुणांमुळे व्यक्तित्वाला श्रेष्ठपण
सर्वांनीच नीट विचार केला तर
संस्कृती किती होईल उच्चतम
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment