Sunday, 14 February 2016

अल्याड - पल्याड

 ll  ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सरसिजासन सन्निविष्टः केयूरवान मकरकुण्डलवान किरीटी हारी हिरण्मयवपुर्घृतशंखचक्रः ll
संक्रांत म्हणजे मकरसंक्रमण कालावधी! दक्षिणायन संपून, देवांची निद्रा संपून, विश्वात पुन्हा देवजागृती. विष्णू- सर्व विश्वाची परिपालक शक्ती. दक्षिणायनात निरनिराळे सणवार, पूजापाठ यांच्याद्वारे सतत मनात देवजागृती ठेवावी लागते; कारण देवांचा निद्राकाळ असल्यामुळे असुरप्रवृत्ती जास्त वाढू नये म्हणून सतत धर्म जागृतीचे कार्य करणारे देवांना आवाहन करीत असतात. समाजाचे धारण करतो तो धर्म.
'धारणाधर्मनित्याहुः इति धर्मः'
उत्तरायणात देवसाम्राज्य असल्यामुळे अत्यंत शुभकाळ समजला जातो. तिळगुळ हे स्नेह गोडव्याचे प्रतीक! त्याचे आदान-प्रदान करुन उत्सव साजरा केला जातो. सौभाग्याचा सण - हळदीकुंकू, सुगड्याचे वाण, त्या सुगड्यात तांदूळ, मुगाची डाळ, बिबे, बोरं, ओला हरभरा, वाटाण्याच्या शेंगा, हळदीकुंकवाच्या पुड्या, उसाची पेरखंडे, तिळगुळाचा लाडू, गाजर - निसर्गातील सर्व नवलाईची ही पूजा असते. सूर्य ही सर्व विश्वाला चैतन्यदायी ठेवणारी शक्ती, म्हणून उपासना केली जाते. पौष महिन्यातील रविवारी सूर्याचे बारा गोलाकार - सूर्यप्रतिमा काढून विधिवत पूजा करण्याचा प्रघात आहे. 'सत्यनारायण' केला जातो. 'नारायण-नारायण' म्हणणे सोपे नाही. सूर्याची बारा नावे घेतली जातात. सर्व प्रथा, परंपरा, प्रघात पाळायला नेट लागतो. आमचा विश्वास नाही म्हणून बरेच लोक यातून स्वतःची सुटका करुन घेतात.निष्ठेने सर्व साध्य करणारे जी 'कमाई' करतात ती यांना कधीच प्राप्त होण्याची सुतराम् शक्यता नसते. भौतिक कमाई उदंड असेल पण आध्यात्मिक कमाईच्या नावाने मोठा भोपळा असतो. असो. मला 'भीष्म' आठवतात. इच्छामरणी! त्यामुळे मी उत्तरायणातच मरण स्वीकारणार म्हणून त्यांनी अर्जुनाला शरशय्या तयार करायला लावली. भीष्म ही व्यक्ती किती त्यागी होती हे सांगायची गरज नसावी. इच्छामरणाचा वर होता म्हणून शुभकाळात मरण ते मागू शकले. या कथा खूप सुचवून जातात. मला प्रमोद आठवतो. संक्रांतीच्या दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतला. ज्ञानतेजाचा तो निधी होता. अनंत तेजात तो विलीन झाला. एक तप उलटले, पण अनेकांच्या स्मरणात राहून अमर झाला. मला मुलांचे वडील - मुकुंदराव पाटखेडकर आठवतात. माझे सौभाग्य! संक्रांत मी नेहमीच निष्ठेने केली. पौष रविवार सर्व यथासांग पार पाडण्याची माझी प्रवृत्ती! आज ते नाहीत. त्यांची आठवण येते स्वाभाविकच! ते अत्यंत धर्मप्रवृत्त होते. १५ जानेवारी २०१६ ला यावर्षीची संक्रांत आली. अमोल कृपा अकोल्याला आले. शेगावला १६ जानेवारीला जाऊन आलो. 'नटसम्राट' पाहिला. उत्कृष्ट वाङ्मयीन कलाकृती छान अभिनय. शब्दप्रभू विष्णू वामन शिरवाडकर - कवी कुसुमाग्रज. मराठी भाषेचा अभिमान वाटला. शेगावला संस्थानचा हत्ती आहे. जेंव्हा गजानन महाराजांची आरती होते तेंव्हा तो सोंड वर उचलून उभा राहतो. त्याचा माहूत तो हत्ती यांच्याभोवती खूप गर्दी असते. कोणी त्याला तिळाचा लाडू खाऊ घालतात, तेव्हा तो चटकन खातो, पण जेव्हा दहा-वीस रूपयाची नोट त्याच्या सोंडेवर ठेवली जाते तेव्हा सोंड वर करुन ती नोट तो माहूतापर्यंत पोहोचवितो. लिंबू कोणी दिले तर टाकून देतो. माहुताला बरीच कमाई होते. गणपती आणि लक्ष्मी या ऐश्वर्याच्या देवता. त्यांच्या चित्रात नेहमी हत्ती दारी झुलताना दाखवितात. महाराजांच्या संस्थानात सकाळी १० ते यावेळेत भाविकांसाठी  'प्रसाद' असतो. संस्थान अत्यंत साफ ठेवण्यासाठी सर्व सेवाभावी सतत कार्यरत असतात. प्रत्येकाला 'माऊली' म्हणून संबोधतात. या सर्व भरगच्च कार्यक्रमात यंदाची संक्रांत खूप आनंद देऊन गेली. आज अमोल रात्री हैद्राबादला पोचेल. कोणतीच गोष्ट कधी संपत नसते. अल्याडच्या पलीकडे पल्याड असतेच

        संगीता पाटखेडकर.

        १७//२०१६

No comments:

Post a Comment