काय आहे ह्या आनंदाचे स्वरुप? ओल्या मातीत जसा सहज सुंदर अंकुर फुटावा तसा आनंद सहजस्वरुपी असतो. पिसारा फुलवून नाचणारा मोर, फळांनी लगडलेले व फुलांनी बहरलेले, निसर्गरुप, मनाला आनंदाचे उधाण आणते. हिरवीगच्च झाडी, त्यातून जाणारी पायवाट, झुळझुळ वाहणारा झरा, आकाशाकडे ताठ मानेने पाहणारी टेकडी, नाचत-बागडत जाणारा हरणांचा कळप, आनंद देणारी कितीतरी दृश्ये निसर्गात पदोपदी दिसतात. सृष्टी निर्माणकर्ता किती विचक्षण रसिक चित्रकार असावा? एक झाड दुसऱ्या झाडासारखे नाही. एक पान दुसऱ्या झाडाच्या पानासारखे नाही. रंगांची बहार तर वर्णूच नका! अगदी मनसोक्त उधळण व लयलूट असते. म्हणून निसर्गरम्य ठिकाणांचे, सहलीसाठी माणसांना फार आकर्षण असते. नायगारा एका बाजूने पाहून समाधान होत नाही. canada च्या बाजुने पाहण्याची इच्छा असतेच असते. हे सर्व निर्माण करणाऱ्याचे प्रतिभासामर्थ्य माणसाने स्वतःत आणण्यासाठी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. पण नक्कल ते नक्कलच! अस्सलाची सर कशी येणार? जगात सर्वत्र बहारदार निसर्गरमणीय स्थळांची व अद्भुत वाटणाऱ्या दृश्यांची, वर्णन करताना लेखणी कमी पडेल अशा आनंददायी घटितांची मुळीच कमतरता नाही. प्रियकराला प्रेयसी भेटल्याचा आनंद, पत्नीस पती दिसल्याचा आनंद, मातेला मूल पाहून झालेला आनंद, कुठे बक्षीस मिळाल्याचा आनंद, वाचनातील आनंद, कलांद्वारे मिळणारा आनंद, दुसऱ्याची फजिती झालेली पाहून मिळणारा आनंद, आसुरी आनंद. सगळे आनंद सारखेच का? तर नाही. निर्भेळ आनंद- ज्यात कोणतेही किल्मीष नाही असा आनंद सर्वश्रेष्ठ. उदाहरणार्थ- त्यागातील आनंद! कर्म करा पण फळांची आसक्ती ठेवू नका. कमळाच्या पानावर जसे पाणी ठैहरुन राहत नाही; त्याप्रमाणे कोणत्याही आसक्तीने तुमचे जीवन लिंपित होऊ नये! वगैरे वगैरे- 'गीता' सांगतेच. तसे वागता येणे हा केवढा आनंद! तो प्राप्त करणारे महाभागही आहेतच- आपण घेऊ का कधी तो आनंद! किती कठीण परीक्षा!
आनंदाचे डोही l आनंद तरंग l
आनंदचि अंग l आनंदाचे l - म्हणणारे, ब्रम्हानंदाचा अनुभव घेणारे, संत तुकाराम असोत किंवा निसर्गाकडे पाहून
आनंदी आनंद गडे l जिकडे तिकडे चोहिकडे l - म्हणणारे बालकवी असोत; दोन्ही अवस्था साधणे सहज सोपी गोष्ट नव्हे! मनाने पूर्ण त्या त्या अवस्थेशी एकरुप होणे अत्यावश्यक असते.
संगीता पाटखेडकर
No comments:
Post a Comment