मनाचा दिंडी-दरवाजा कधीचाच आहे सताड उघडा
उघडा, वाघडा आणि बोडखा
कितीतरी अनुभवांचे त्यात झाले संक्रमण
आठवणींचे कधीच परतवून लावले नाही आक्रमण
म्हणून आयुष्य झाले वाटते का समृध्द; आणि आकाश विशाल!
अजून बरेच काही मिळवायचे आहे, प्रत्येकाचे आभाळ त्याच्यापुरतेच असते
पण त्यापलीकडेही असते महाकाय आभाळ, अति विशाल
त्या सर्वांचे आभाळ, आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकू का कधी?
घेऊ शकू का त्यांच्या त्यांच्या अनुभवांना कवेत!
का नाही? कारण परकाया प्रवेश करण्याची सिध्दी केलीच ना प्राप्त अनेकांनी आणि बसविली कलाकाराच्या व्याख्येत
कलाकाराची सिध्दी प्राप्त होणे यासारखे नाही भाग्य
मग काय अप्राप्य?
सा-यांचेच आभाळ होईल तुझे ध्येय
ध्येय फार मोठे, पण मन तर किती अमर्यादित, आणि बंधनापार
कुठेही जाऊ येऊ शकते ते, केव्हाच धावणार अटकेपार
या दिंडीदरवाजाच्या आत आहे भलामोठा वाडा
आठवणींच्या कल्लोळांनी जीव केला त्याने वेडा
रात्री दरवाजा लावून बघितले, पण डोळ्यांनी घेतलेल्या प्रतिमा; बंद डोळ्यांसमोरही दृश्ये साकारु लागल्या!
कसे दिसते स्वप्न- स्पष्ट चित्रे कशी अलगद उतरतात मनात
कधीच शोध लागला नाही मानसशास्त्रज्ञांना किंवा आत्मज्ञानी लोकांना!
मग कसे आवरायचे या प्रतिमांना? याचा शोध कोण घेणार?
कशाला आवरतेस? काहीच नको लावू अडसर, कडी आणि कोयंडा
आजही गर्दी वाढते आहे ना, पाहायला जातात ना लोक शनिवारवाडा
प्रत्येकाच्या मनातील, प्रत्येकाचा आठवणींचा वाडा, असाच राहो अखंड
मग पाडगावकर असोत, वसंत बापट असोत, की, विं.दा. करंदीकर. त्यांचे काव्यशिल्प आपली सोबत करत राहील, कारण त्यांचे शब्दसामर्थ्य प्रचंड
माझ्या मनातील वाडा माझेही सामर्थ्य करु दे दुर्दम्य
हीच आशा आहे, का म्हणू अगम्य!
संगीता पाटखेडकर.
१/१/२०१६
No comments:
Post a Comment