जे जे भेटे भूत l ते ते मानिजे भगवंत l हा भक्तियोग निश्चित जाण माझा - ज्ञानेश्वर.
मानवी जीवनात सैतान अज्ञान स्वरूपात वावरतो. अहंकार, अभिमान, अविचार, अविवेक, असूया व असमाधान अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी निर्माण होऊन विचार-प्रदूषण होत असते. देव, धर्म, संस्कृती, नियती, मन, सुख, पाप-पुण्य वगैरेसंबंधी कमालीचे अज्ञान असते. विचार हाच ख-या अर्थाने ईश्वर. विचार ही जीवनाची गंगोत्री. अल्लाउद्दीनकडे जादूचा दिवा. माणसाजवळ विचारशक्तीचा दिवा. उन्नती-उत्कर्ष की अधोगती-अपकर्ष हे माणसाने ठरवावयाचे! विचारांचे कारंजे त्याचा अभिषेक आत्मलिंगावर करावयाचा पण मग तो ताप, संताप, मनस्ताप, शारिरिक, मानसिक रोग व दुःख या दुर्विचारांचा करावयाचा की सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य या सुविचारांचा करावयाचा हे ठरविणे निश्चितच माणसाच्या हाती आहे. बहिर्मन (conscious mind) व अंतर्मन (sub-conscious mind) या दोन मनांचे भावनिक ऐक्य साधले जाते तेव्हा माणसाच्या जीवनात सुखाचा सुकाळ असतो. देवापासून बुद्धी दूर म्हणजे दुर्बुद्धी! ध्वनीतून निर्माण होणाऱ्या लहरींपेक्षा विचारातून निर्माण होणाऱ्या लहरी अत्यंत सूक्ष्म स्वरुपाच्या! विचार-प्रदूषण या मूळ समस्येवर उपाययोजना आवश्यक; तोपर्यंत मानवजातीला सुख,शांती,समाधान नाही. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा सर्वात महत्वाचा नियम. या नियमाला निष्फळ करण्याचे सामर्थ्य कोणाही माणसात नाही. खुद्द परमेश्वरालाही नाही. वृक्षबीजात वृक्षफळ तसे माणसाच्या कर्मात माणसाचे फळ! जर एखादा माणूस चांगले कर्म करील तर फळ चांगलेच असणार! वाईटाचे वाईट फळ हा कर्मसिद्धान्त! मग जितक्या मोठ्या प्रमाणात माणूस अनेकांच्या हिताचा विचार करेल तर अनेकानेक लोकांचे हित होणार व समाजाची अनेकानेक पटीने उन्नती होणार. भले वा बुरे कर्म बूमरँग होऊन मिळत राहणार! अनिष्ट मार्गांनी गडगंज संपत्ती मिळविणारी माणसे सात पिढ्यांची तरतूद करीत आहेत असे त्यांना वाटते. पण तसे नसते. सात पिढ्यांच्या मढ्यांची तरतूद ते करीत असतात. या सर्व विचारांचा परिपोष यासाठी की प्रत्येकात दैवी साक्षात्काराचे दर्शन घेण्याची क्षमता, मनात आली की, दैवी साक्षात्कारच तुमच्यापर्यंत नेहमी येणार व भक्तीचा मार्ग उदंड होऊन समाज किती उन्नत होणार! ठरवा तुम्हीच काय ते?
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment