'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ
क्षणिक तेवि आहे बाळा मेळ माणसांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा'
ग.दि.माडगूळकरांचे हे प्रसिध्द गीत सारखे ओठांवर का येते?
आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर भेटलेल्या व्यक्ती आपण कधीच विसरत नसतो. त्यातील काही रक्ताच्या नात्याच्या, काही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने झालेल्या परिचयाच्या असतात, त्या का बरे आपल्याला मधूनच आठवून जीव व्याकूळ करतात? कोणते हे अतूट ऋणानुबंध?
'ऐसी वस्तू नसे इथे न करुनी दे तुझी आठव
वस्तू स्मारक का हवी स्मृती जिथे चित्ती करी तांडव'
'विरहतरंग' - माधव ज्यूलियन.
प्रेयसीच फक्त प्रियकराला आठवते आवर्जून, हे तारुण्यकाळात ठीक आहे पण परमेश्वराला प्रेयसी किंवा प्रियकर मानणारे आहेतच की!
जिवंत व्यक्तीची आठवण आली की आपण निदान त्यांच्याशी संपर्क तरी साधू शकतो. पण ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यांच्या आठवणीने निव्वळ व्याकूळच व्हायचे की काय? का दूर दूर पर्यंत त्यांच्या आठवणी आपल्याला गहिवरुन टाकत असतात? बरे, संबंधात आलेल्या व्यक्तींच्या स्मृतींनी व्याकूळ होणे एकवेळ समजू तरी शकते, पण वाङमयातून, भेटीला आलेल्या व्यक्तींच्या आठवणीनेही का बरे व्याकूळ व्हायला होते? का आठवतात ज्ञानेश्वर? का त्यांचे साहित्य खिळवून ठेवते? का हरिपाठ जागृती, स्वप्नी, सुषुप्ती ओठांवर येतो?
'जाणीव नेणीव भगवंती नाही
हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा
नारायण हरी उच्चार नामाचा
तेथे कळिकाळाचा रीघ नाही
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
ते जीवजंतूंसी केवि कळे
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ
सर्वत्र वैकुंठ केले असे' - हे म्हणत असताना का नेहमी प्रमोद आठवतो? कारण त्याने माझ्याकडून हे दोन तीनदा म्हणवून घेतले होते. बाबा एकविरा हॉस्पिटलमध्ये admit होते. आम्ही भेटीला गेलो होतो. डॉक्टरने बाहेर बसायला सांगितले होते. त्यावेळी आमचे खूप बोलणे झाले होते. का सगळे संतसाहित्य मनाभोवती पिंगा घालते? का विष्णूसहस्त्रनाम झोपेतही ओठांवर असते? निश्चितच या सर्वांशी खूपच ऋणानुबंध आहे असे वाटून जाते. तसे असेल तर चांगलेच आहे की! ज्या साहित्यिक व्यक्ती कधी पाहिल्याही नाहीत, शतकानुशतकांपूर्वीच्या त्या व्यक्ती जर आज संवाद साधत असतील तर त्यापरीस भाग्य ते कोणते?
'चाहे जो तुम्हे पूरे दिलसे l
मिलता है वो मुश्किलसे l
ऐसा जो कहीं कोई है l
बस वो ही सबसे हसीन् है l
उस हाथ को तुम थाम लो l
वो मेहेरबान कल हो ना हो' l
कितीतरी व्यक्ती निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या आयुष्यात आल्या हे केवढे भाग्य?
'क्षण एक पुरे प्रेमाचा l
वर्षाव पडो मरणांचा' म्हणणारे गोविंदाग्रज. एक क्षणच काय, कितीतरी क्षण, कितीतरी वर्षे अखंड साथ देणाऱ्या व्यक्ती मिळाल्या हे परमभाग्य!
भूतकाळात रमू नये म्हणतात, पण मला तर कृष्णाच्या त्या १६१०८ स्त्रिया पाहाव्याशा वाटतात. त्यांची ती वेगवेगळी निवासस्थाने पाहण्याची प्रबळ उत्कंठा वाटते. शिवाजी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी सगळे-सगळे मला भेटतील का? अशी ओढ लागते. रामदास, विवेकानंद, महात्मा गांधी............अनेकानेक व्यक्तींना भेटावेसे वाटते. जे जे आवडले ते सतत आपल्याशी संबंधित राहावे ही ओढ म्हणजेच जीवनासक्ती का? तसे असेल तर या आसक्तीत मी आकंठ बुडून जायला तयार आहे!
'सदा सर्वदा देव सन्निध आहे
कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे' ही जाणीव मनाला किती धीर देते? महान कार्य करुन गेलेल्या व्यक्तींमध्ये दिव्यत्वाचा साक्षात्कार खूप मोठ्या प्रमाणात असतो म्हणतात. तो साक्षात्कार आपल्यालाही व्हावा हे स्वप्न पाहणे चुकीचे आहे काय? अशी दिव्यत्वाची प्रतीती देणारी खूप स्वप्ने मला पडावी हे माझे स्वप्न आहे.
'दिव्यत्वाची जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती'
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment