स्वार्थ - स्वतःपुरतेच, स्वतःसाठीच आणि केवळ स्वतःचाच विचार करुन केलेले कोणतेही कार्य म्हणजे स्वार्थ आणि स्वार्थच! भ्रष्टाचार आणि अनैतिकतेने मिळविलेली संपत्ती म्हणजे
'अलक्ष्मी'. ती कधीच स्थिर राहत नाही. अलक्ष्मी चंचल असते. पण जेंव्हा व्यक्ती स्वतःच्या उत्कर्षाचा विचार करतो तेंव्हा या मर्यादा तो कधी ओलांडतो याचे त्याचे त्याला भानच राहत नाही. जेंव्हा लक्षात येते तेंव्हा वेळ कधीचीच टळून गेलेली असते.
तसेही जगतांना व्यक्ती इतका
सगळा सारासार विचार करुन
कधीच जगत नसतो. जे पूर्ण विवेकाने जगतात तेच महापुरुष होतात. अशी महान व्यक्तित्वे काही कमी नाहीत. इतिहासात नुसते डोकावले तरी महापुरुषांची मांदियाळी आपले मन हरखून टाकते.
'हे विश्वचि माझे घर' म्हणणारे ज्ञानेश्वर- किती कमी वयात उत्तुंगतेचा महामेरु ठरले. वयाचे बंधन नसते समजशक्तीला, याचा हा आदर्शच म्हणावा लागेल.
'जगाच्या कल्याणा, संतांच्या
विभूती l देह कष्टविती उपकारे'l म्हणणारे तुकाराम किती निरासक्त आयुष्य जगाले! शिवाजी महाराजांनी पाठविलेला नजराणा त्यांना मातीमोल वाटला. 'आम्हा घरी धन l शब्दांचीच रत्ने' - म्हणून त्यांचे लिखाण 'अभंग' ठरले.
'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे l अकस्मात तोही पुढे जात आहे l पुरे ना जनी लोभ रे, क्षोभ त्याते l म्हणोनि जनी मागुता जन्म घेते' म्हणणारे रामदास आयुष्यात इतके महान कार्य करुन गेले की एक व्यक्ती इतके काही करु शकते,
याचे ते मूर्तिमंत उदाहरण ठरले. त्यांचे मनाचे विश्लेषण अजोड, अतुलनीय आहे. शिवाजीराजांनी झोळीत टाकलेले राज्याचे दान न स्वीकारणारा तो महान त्यागी. 'मरावे परी किर्तीरुपे उरावे' याचे साक्षात अवतरणच म्हणावे लागेल.
उदाहरणांची नामावली खूप मोठी आहे. इतिहास वाचल्यानंतर या महापुरुषांनी,
उदात्त, उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आदर्श परिपाठच आपल्यासमोर ठेवला आहे,
त्याचा आपण कितपत उपयोग करुन घ्यावयाचा हे
ज्याचे त्याने ठरवावयाचे आहे. राम-कृष्ण यासारखे अवतारी पुरुष उच्चतम संस्कृतीचा वारसा तर आपल्याला देऊन गेलेच आहेत; पण विवेकानंदांसारख्यांनी भौतिक संस्कृतीला आव्हानात्मक उत्तर दिले आहे. कुणाच्या मनाची पातळी कितपत काय गाठू शकते हे पुन्हा ज्याच्यात्याच्यावरच अवलंबून राहणार. हिटलर, नेपोलियन, कंस, दुर्योधन, रावण अशा लोकांची संख्या तर अगणितच !
खरी महालक्ष्मी जी अलक्ष्मी नाही तीच. तिच्या आवाहनाचे
सामर्थ्य सर्वांमध्ये निर्माण व्हावे अशी सदिच्छा तर आपण निश्चितच करु शकतो.
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment