भारतीय संस्कृतीच्या जाणकारांना या दोन नावांची नेहमीच भुरळ पडत आलेली आहे. ती संस्कृती प्रतीके आहेत. त्रेतायुगातील राम, एकबाणी, एकवचनी, एकपत्नी - मर्यादा पुरुषोत्तम, पित्यासाठी वनवास १४ वर्षे - सीता व लक्ष्मणाचे त्याच्याबरोबर वनात जाणे, रावणाने सीतेला पळविणे, राम - रावण युध्द, सीतेला करावे लागलेले अग्निदिव्य, अयोध्येत वापस आल्यावरही तेथील धोब्याची सीतेच्या चारित्र्यावरील शंका म्हणून सीतेचा परित्याग, लवकुशाचा जन्म, वाल्मिकीने केलेला सांभाळ.
'दैव जाणिले कुणी? लवांकुशाचा हलवी पाळणा l
वनी वाल्मिकी मुनी' - ग. दि. माडगुळकरांचे प्रसिध्द गीत. रामाने केलेला यज्ञ - सीतेची सोन्याची प्रतिमा केली पण तिला वापस आणले नाही, पतीला या कोणत्याही प्रसंगात एकाही शब्दाने दूषण न देणारी सीता - पातिव्रत्याचा परमोत्कर्ष, अत्यंत सहनशील भूमिकन्या, भूमीप्रमाणेच सहनशीलतेचा उच्चांक, शेवटी भूमी दुभंगते व तिला पोटात घेते. 'भूमिकन्या सीता' हे वरेरकरांचे नाटक. वाल्मिकी हा आधी वाल्या - दरोडेखोर - वाटसरूंना लुबाडणारा - नारदाने दिलेला 'राम' हा जीवनसार्थक करणारा मंत्र आचरुन 'वाल्मिकी ऋषी' झालेला व 'वाल्मिकी रामायण' निर्मिति करुन, शेवटी सीतेला बळकटी देऊन तिच्या मुलांचा प्रतिपाळ स्वतःच्या आश्रमात करुन त्यांना घडविणारा - अशा अनेकानेक अद्भुतरम्य कथांमध्ये आपण नेहमीच गुंतत आलेलो आहोत व या सर्व गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनल्या आपल्याला कळलेही नाही आणि राम-सीता या व्यक्ती-त्याबरोबरचे लक्ष्मण, भरत, हनुमानासारखे आदर्श यांचे गुणगान व भक्ती भारतीय संस्कृती शिरोधार्य मानते. पतीच्या असुर निर्दालनाच्या कार्यात त्याला कोणत्याही विपरीत परिस्थितीत एकनिष्ठपणे साथ देणारी, त्यासाठी कोणतेही दिव्य करण्याची तयारी असणारी स्त्री - हा आदर्श म्हणजे सीता! द्वापारयुगातील कृष्ण; त्याने कौरव पांडवांच्या युध्दात; अर्जुनाने माझ्याच गुरुजनांशी व नातलगांशी मी युद्ध कसे करु म्हणून शस्त्र खाली टाकलेल्या अर्जुनाला - कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर केलेला उपदेश म्हणजे 'गीता'- या उपदेशाने- अर्जुन तर युध्दाला प्रवृत्त झालाच पण जीवन जगण्याचा महान मंत्र त्याद्वारे भारतीय संस्कृतीला मिळाला. 'गीता' ही अनेकांची प्रेरणा ठरली. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'. कर्मसंन्यास नाही, कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. 'पद्मपत्रमिवाम्भसा' या न्यायाने जीवन जगा वगैरे उपदेशक मंत्र आयुष्याचे सार्थक करणारे मौलिक तत्व बनले. लोकमान्यांना 'गीतारहस्य' तुरुंगात लिहावेसे वाटले. विनोबांनी 'गीताई' लिहिली, तुलसीदासांनी 'तुलसी-रामायण लिहिले- वगैरे वगैरे अनेक गोष्टींशी आपण सर्वजण परिचित आहोतच! त्याचे चर्वितचर्वण करण्याची मला गरज वाटत नाही. ही श्रेष्ठ जीवनप्रणाली आचरणारी व्यक्तित्वे आजच्याही काळात दिसतात हे मला महत्वाचे वाटते. कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे बाबा आमटे व त्यांची पत्नी साधनाताई आमटे, त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व त्यांची पत्नी डॉ. मंदा आमटे ह्या जोड्या राम-सीतेचा आदर्श अनुसरतात. 'भामरागड' सारख्या आदिवासी मुलखात कार्य करीत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वंशासमोरच आदर्श नाही ठेवला तर अनेकांना प्रेरणा दिली - 'सेवाभावाची'.
लोकमान्य टिळक हे 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' होते. राष्ट्रप्रेमासाठी अनेक संकटांना त्यांनी तर तोंड दिलेच पण त्यांची पत्नी व कुटुंब-परिवार त्यांना साथ देणारा होता. राम-सीता, लक्ष्मण, हनुमान ही नुसती नावे नाहीत; त्या जीवन संजीवनी आहेत आणि ही 'संजीवनी' अनेकांनी स्वतःच्या जीवनात उगाळली. वि. दा. सावरकर व त्यांची पत्नी - यांच्या संकटांची आपण कल्पनाही करु शकत नाही. त्याग, त्याग म्हणजे काय? शिकण्यासारखे खूप!
महात्मा गांधी-कस्तुरबा - उदाहरणांची कमी नाही. खूप खूप पदोपदी सापडतात हे आपले केवढे भाग्य! 'भगत सिंग' फासावर गेला. हातात 'गीता' असावी ही त्याची शेवटची इच्छा. राम-सीता, कृष्ण-गीता या अनन्य जोड्या आहेत. हे जीवनादर्श आचरले तर आणि तरच जीवन सार्थक हे आपणही समजूया!
महानतेचा साक्षात्कार म्हणजे राम-कृष्ण. आदर्श आचरणाचा साक्षात्कार म्हणजे सीता-गीता. नाहीतर - ..........
'आला आला प्राणी जन्मासी आला
गेला गेला बापुडा व्यर्थ मेला'
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment