Sunday, 14 February 2016

पुरस्कारा - पलीकडे

जीवनात अनेक व्यक्ती, कलावंत, ऋतंभरा प्रज्ञा(knowledge by intuition) असणारे संत-महात्मे, अनेक वाङमयीन साहित्यकृती, शिल्पकृती, एकूण सर्व निरीक्षणाच्या टप्प्यात येणारे जग कल्पनेने आस्वादिलेले जग आपल्याला नेहमीच आकृष्ट करीत असते. महान, मोठ्या व्यक्तींना केलेला नमस्कार ही फक्त त्यांच्याबद्दलची कृतज्ञता असू शकते. त्यापलीकडे त्या व्यक्ती कितीतरी महान असतात. नमस्कार हा त्यांचा 'पुरस्कार' असतो का? आपण कोण या सर्वांना पुरस्कार देणारे?  त्या त्या कृती इतक्या व्यापक अनुभूती व्यक्त  करणाऱ्या असतात की शब्दांचे भारुड कितीही रचले तरी समर्पक प्रशंसा किंवा महात्म्य व्यक्त झाले असे वाटत नाही. नोबेल पारितोषिक मिळविणारे साहित्यिक त्या पुरस्कारा पलीकडे श्रेष्ठ असतात. 'गीतांजली' ला (रविंद्रनाथ टागोर) नोबेल पुरस्कार मिळाला. झाले का रविंद्रनाथांचे महात्म्य वर्णन
ज्ञानेश्वरीला कोणता पुरस्कार तरी मिळाला का? त्या लोकांना पुरस्काराची अपेक्षा तरी होती का
    मी आणि माझेपण l
  विसरले जयाचे अंतःकरण l
  पार्था तो संन्यासी जाण निरंतर l - ज्ञानेश्वर.  अशा उच्चतम पातळीवर पोचलेली व्यक्तिमत्वे वादातीत, श्रेष्ठ असतात एवढेच आपण म्हणू शकतो नतमस्तक होऊ शकतो. सुदैवाने अशी श्रेष्ठतम व्यक्तिमत्वे आपल्याला दिसतातच दिसतात हेच आपले भाग्य!  कल्पनाशक्ती ही विलक्षण शक्ती!  'मी अमुक' हा कल्पनास्वरुप सूक्ष्म अहंकार परमार्थाच्या क्षेत्रात प्रचंड धुडगूस घालीत असतो. सूक्ष्म अहंकाराची घोरपड ज्ञानाच्या अग्नीच्या झळा लागूनच सुटू शकते. महान व्यक्तिमत्त्वात हा अहंकार जवळजवळ नसतोच म्हणूनच ते महान! जिथे गर्व तिथे 'गर्वाचे घर खाली' समजाच!
कलावंत जेव्हा उच्चतम पातळीवर कार्य करतो, तेव्हा तो भावभावनांच्या 'परे' असतो. त्याचे लौकिक राग-लोभ, द्वेष-मत्सर तो विसरला असतो.  'शिक्षण' या शब्दाची फोड 'शिक-क्षण' अशी आहे. माणसाने क्षणाक्षणाला शिकत राहायचे असते. सारे जग माणसासमोर आव्हान आहे. या सर्व जीवनाचा अभ्यास करता करता आयुष्य अपुरेच ठरणार!  'उत्तिष्ठत जाग्रत; प्राप्य वरान् निबोधत'  
विवेकानंदांप्रमाणे आवाहन करण्याचीच वेळ आहे


    संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment