Sunday, 14 February 2016

ज्याची वाणी रंगली रामनामी

'ज्याची वाणी रंगली रामनामी
त्याचा माझा संवाद घडो स्वामी'

"ज्याचे वंशी कुळधर्म रामसेवा
त्याचे वंशी मज जन्म दे गा देवा
ज्याची वाणी रंगली रामनामी
त्याचा माझा संवाद घडो स्वामी 
वारंवार विनंती परिसावी
दयासिंधूची पूर्ण कृपा व्हावी 
म्हणे उध्दव चिद्घन महाराजा
रामदासाचा संग घडो माझा"
असे ते पूर्ण 'अवतरण' आहे. उध्दव हा रामदासांचा शिष्य. कल्याण हा त्यांचा पट्टशिष्य! समर्थ रामदासांची शिष्यपरंपरा खूप मोठी आहे, त्याच्यात स्त्रियाही आहेत. वेणाबाई त्यात प्रसिद्ध. 'श्रीराम जयराम जयजयराम' हा त्रयोदशाक्षरी मंत्र अनेक कुळात उपासना मंत्र आहे. मोहरीर कुळातच या मंत्राचे अनेकदा पुरश्चरण झालेले आहे. मोरेश्वर मोहरीर हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे. खूप आध्यात्मिक ग्रंथसंपदा घरात होती. देवीच्या नवरात्रात ललिता पंचमीच्या दिवशी बाबा सर्व धार्मिक ग्रंथांचे पूजन करीत असत. रामजन्म, कृष्णजन्म तर साजरे अनेक घरातून होतच असत पण एकूणच हिंदू समाज हा अत्यंत श्रध्दाळू वृत्तीचा असे. पूजापाठ, धार्मिक ग्रंथांचे पठन-पाठन, कीर्तन, प्रवचन असा भक्तिसत्संग नेहमीच चाले. या सर्व निष्ठांपायी माणसाच्या अनैतिक वर्तणुकीला थोडाफार तरी वचक राहतो. नाहीतर माणूस बेभान होऊन अनैतिकतेच्या गर्तेत कोसळला असता
राम-कृष्ण या आपल्या संस्कृतीच्या अधिष्ठात्री देवता आहेत. 'धर्मसंस्थापनार्थाय' त्यांचे अवतार झालेले आहेत
'सामर्थ्य आहे चळवळीचे l
जो जे करील तयाचे 
परंतु तेथे भगवंताचे l
अधिष्ठान पाहिजे' - असे रामदासांनीच म्हंटले आहे.
'मर्यादा पुरुषोत्तम राम' रामदासांचा जीव की प्राण.
'रामचरितमानस'-तुलसीदास,
'रामायण'-वाल्मिकी ऋषी, 'रामविजय'-श्रीधर कवी 'रामरक्षा'-बुधकौशिकविरचित.
या सर्व रचना अत्यंत प्रसिध्द आहेत. सर्व आदर्शांचा खजिना यात सापडतो. राम म्हणजे दैवी संपदा, रावण आसुरी संपदा. रामाचे दोन महान भक्त-हनुमान-शंकराचा अवतार रामदास- हे हनुमानाचेच अवतार समजले जातात. जिथे रामकथा चालू आहे तिथे हनुमान असतोच म्हणतात कारण तो चिरंजीव आहे रामाचा परमोच्च पातळीचा भक्तशिरोमणी आहे. रामाशिवाय त्याला जीवनात राम वाटत नाही. कर्माचा संन्यास संतांनी कधीच शिकविला नाही. उलट 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे'
रामदासांनी स्वतः सावध होऊन लग्नमंडपातून पळ काढला असला तरी त्यांनी जगाचा संसार केला. रामदासस्वामी शके १५३०ला 'जांब' गावी जन्मास आले. १५४२ मध्ये लग्न समारंभातून पळाले. 'नारायण सूर्याजीपंत ठोसर' असे त्यांचे पूर्ण नाव. तेथून टाकळीला जाऊन १२ वर्षे त्यांनी पुरश्चरण केले. त्यांना रामदर्शन झाले होते. पुढे १२ वर्षे  तीर्थयात्रेसाठी सर्व भारतभर त्यांनी पर्यटन केले. १५६६ मध्ये ते कृष्णाकाठी चाफळखो-यात आले. ठिकठिकाणी मारुती मंदिर मठांची स्थापना केली. शिष्यसंप्रदाय वाढविला. उत्सव सुरु केले. शिवाजीवर अनुग्रह केला. त्यांच्या आग्रहावरुन सज्जनगडी राहावयास गेले. १६०३ मध्ये अवतारसमाप्ति!
दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके ही त्यांची ग्रंथसंपदा. जो कोणी वाचेल तो विचाराने, आचाराने, कृतीने, आध्यात्मिकतेने, कितीतरी उंचीवरची गरुडभरारी घेईल देवत्वास पोचेल. शिवाजीने राज्याचे दान झोळीत टाकले असताना नाकारणारा शिवाजीला 'श्रीमंत योगी' म्हणून गौरविणारा हा महान संत आयुष्यात जिवापाड झिजला. 'मना चंदनाचे परि त्वा झिजावे
परि अंतरी सज्जना निववावे'.
त्यांचे एकेक वचन म्हणजे एकेक सुभाषितच झाले आहे. त्यांच्या कार्याने भारावून जाऊन त्यांच्या शिष्यांनी 'अवतरणा' तील प्रार्थना केली तर नवल कसले
'महाजनो येन गतः पन्थः'
महापुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचे अनुसरण केले तर निश्चितच योग्य मार्गाने निर्वहन होते. रामदास तुकाराम हे समकालीन! मुसलमानांचे साम्राज्य, अशा काळात जनजागृतीचे या संतांनी केलेले कार्य, त्यांची निरासक्त वृत्ती ही खूपच दुर्मिळ आहे


   संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment