वॉशिंग मशीनमध्ये कपडे घालणे व नंतर ते वाळत घालणे ही कामे करणेही जीवावर येते असा हा काळ आहे. नवीन पध्दतीची सुरेख भांडी घासायला, चांगले भांड्यांचे डिटर्जंटस् असताना, कुणालाच वेळ नाही, मग चुलीवरची काळीशार झालेली, तीही राखेने, तीही पितळेची भांडी घासणे किती कठीण असेल? कुटुंबात व्यक्तीही घरोघरी पुष्कळ असावयाच्या; कारण 'कुटुंब लहान, सुख महान', 'एक किंवा दोनच पुरे' वगैरे तेव्हा काही नव्हते. प्रत्येक घरी १०-१२ व्यक्ती तर कमीतकमी असावयाच्याच. त्याच्याही आधी एकत्र कुटुंबपध्दती - त्यात ४ काका -४ काकू, त्यांची ४-४ मुले, सासू-सासरे - आत्या किती? - मग संख्या वाढायला काय वेळ लागणार? मग इतके सगळ्यांचे कपडे कुणी धुवायचे? भांडे किती पडणार? कारण कमीतकमी खाणे हा प्रकार नव्हता. सुबत्ता असणारी घरे - तात्या, अण्णा, दादा, आप्पा, नाना, भाऊसाहेब झुल्यांवर झुलणारे ढेरपोटे असावयाचे. गृहिणी वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ बनवायच्या, मग तितकी भांडी निघणारच ना? मग इतके काम करायला 'मोलकरीण' नको? मोलकरीण हा अत्यंत आवश्यक, निकडीचा असा सामाजिक घटक आहे. "लैजा" वाचून अडणारच! अगदी कमी पैशात तिने तुमच्या घरचा हा सर्व धबडगा सांभाळायचा! तिचा खाडा म्हणजे कपाळावर आठ्या आणि आता कसे हा आ वासून प्रश्न? तितक्या नेटाने काम पूर्ण करणारी व्यक्ती घरात असावी लागायची! अगदी महत्वांच्या दिवशी ती खाडा करायची, मग तिचे अस्तित्व ती जाणवून द्यायची. 'गरज ही शोधाची जननी आहे' म्हणतात ना! मग या आवश्यक सामाजिक घटकाच्या बाजूने विचार करणारे निघाले. रुपा कुळकर्णी - संस्कृतची P.H.D. नागपूर विद्यापीठात Post Graduation च्या Department ला शिकविणारी - तिचे विचार तिला बौध्द धर्म स्वीकारायला भाग पाडणारे ठरले. तिने मोलकरणींसाठीही खूप कार्य केले. तिने लग्न केले नाही. ती माझी एम.ए. ला असताना मैत्रीण होती. ती 'संस्कृतसाठी', मी 'मराठीसाठी'. मोलकरणींनाही सुट्टी आवश्यक आहे, त्यांना मूल्यही चांगले द्यायला हवे, तिला काही आजार, दुखणे झाले तर तिची काळजी घेण्यात यावी वगैरे माणुसकीचे वारे वाहायला लागले. तीही हक्काने त्या घरची आर्थिक परिस्थिती पाहून, 'मला दहा हजाराची साडी हवी दिवाळीची', असे म्हणायला लागली. कृपाला तिच्या घरच्या कामवालीने ही मागणी केली हे आम्ही दिवाळीला हैद्राबादला गेलो असताना नुकतेच अनुभवले! काळ अत्यंत बदलला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लोकशाहीची तत्वे आता प्रत्येकात रुजत आहे. हक्कांसाठी आवाज उठवले जात आहेत. लैजाने इतके कधी बाबांच्या काळात मागितले नाही. ती परिस्थितीही नव्हती! मालकालाच २०-२५ रु. पगार तर मोलकरणीला किती मिळणार? लैजानंतर 'शांताबाई' लागली. तिला मी तिच्या मागण्यावरुन साड्या द्यायची! ती मला नंतर अकोल्याच्या राजेश्वर मंदिरात भेटली होती. नागपूर सोडले म्हणाली. नवरा अकोल्याला कामावर होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून हा समाज आयुष्याला तोंड देत असतो. झोपडपट्टीच्या समस्या खूप आव्हानात्मक असतात. पर्याय नसतो म्हणून अशा पध्दतीची कामे केली जातात. पगारदारांना पैसा पुरत नाही तर या वर्गाला अशा पध्दतीचे काम करावेच लागणार! झोपडपट्टीत अगदी लहानपणापासून प्रत्येक जण वाटेल ते काम करत असतो. कामाची लाज नसते. हा एक न संपणारा सामाजिक प्रश्न आहे. कुठे कुठे ठिगळ लावणार? हा समाजशास्त्रज्ञांपुढचा प्रश्न आहे. मग करा अमेरिकेसारखे घरीच काम! तिकडे कामवाली मिळतच नाही. हा पर्याय कसा वाटतो? पण इकडे मिळतात ना? मग कशाला हा विचार! मोलकरीण- कामवाली ताई हवीच! तिला सोबती समजून वागल्यास ती खूप आपुलकीने काम करेल. तिचीही अपत्ये आता शिकताहेत. काळ खूपच बदलणार, निश्चित, अशी आशा करु या!
संगीता पाटखेडकर.
६/१/२०१६
No comments:
Post a Comment