सण-समारंभ आस्थेने साजरे करणे ही आपली संस्कृती आहे. नास्तिक लोक कमी असून आस्तिक लोकांची मांदियाळी अगणित आहे. देव-देवतांची देवळे तुडुंब गर्दीने ओतप्रोत असतात. साधारणपणे घरोघरी तुलसी विवाह साजरा करण्याची प्रथा आहे. तुळस ही अत्यंत पवित्र, प्राणवायू वातावरणात फैलावणारी, औषधी गुणधर्म असणारी, जिची नित्य पूजा केली जाते अशी एक मंगलदायक नैसर्गिक वनस्पती. हिंदू धर्मात तिला अत्यंत मानाचे स्थान आहे. ती 'लक्ष्मी' आहे, 'वृंदा' आहे, वृंदावनात तिची प्रतिष्ठापना करतात. कृष्णाला ती अत्यंत प्रिय आहे. कृष्ण मंदिरात, विठ्ठल मंदिरात मोठमोठे तुळशींचे हार देवांना वाहिले जातात. त्याशिवाय पूजा संपन्न होत नाही. कृष्णाची तुला करावयाचे सत्यभामेने ठरविले. सर्व भांडार पारड्यात घातले पण कृष्ण तुळला जाईना. रुक्मिणीने एक तुळशीचे पान त्या पारड्यात घालताच कृष्ण तुळल्या गेला. इतके महत्व. कृष्ण हा आपल्या संस्कृतीचा कण नि कण आहे. सर्वत्र व्यापलेला. विष्णू-कृष्ण-विठ्ठल सर्व एकच. राम-कृष्ण हे अवतार 'धर्मसंस्थापनार्थाय' झालेले!
'कृष्ण' - रुक्मिणी, राधा, १६१०८ स्त्रिया असताना ब्रह्मचारी, त्यात तुळशीशी विवाह, तरीही कशातच व्याप्त नाही, लिंपित नाही, असे जीवन कसे जगावे, याचा आदर्श देणारा. तशी तर रोजच भारतीय नारी तुळशीची पूजा करत आलेली आहे. स्वतःची सुखदुःखे ती तुळशीजवळच सांगायची. तिला सखी समजायची. तुळस नसलेले घर ओकेबोके वाटते. कोजागिरी पौर्णिमेपासून तुळशीपाशी संध्याकाळी दिवा लावायची पध्दत आहे.
दिवा लावला देवापाशी l
उजेड पडला तुळशीपाशी l -
इतके तादात्म्य. दिवा हे अज्ञानांधःकारावर मात करण्याचे प्रतीक. तुळशीचे-कृष्णाशी लग्न हे नैसर्गिक पावित्र्याचे, मांगल्याचे, प्राणवायूचे संवर्धन करणाऱ्या, प्राणच असणाऱ्या लक्ष्मीचे - सर्व चराचराला व्यापून उरणा-या तत्वाशी झालेले तादात्म्य आहे. चिंच, बोर, आवळा - कृष्णदेव सावळा - असे लिहितात. गेरुने तुळशी-वृंदावन रंगवितात. रांगोळ्या-दिव्यांची आरास, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून, आरत्या, देवाशी संबंधित स्तुतिस्तोत्रे रुपी मंगलाष्टके म्हणून तुळशीला सजवून, कृष्णाला तिच्यापाशी प्रस्थापित करुन लग्न लावले जाते. त्यानंतरच लग्नकार्याच्या तिथी असतात. ही परंपरा आहे. ती कुणीतरी ऋषीमुनींनी प्रस्थापित केली असावी. नैवेद्याच्या ताटावर एक तुळशीचे पान ठेवले की नैवेद्य परिपूर्ण अशीही श्रध्दा आहे. जोपर्यंत जीवाला अॉक्सिजन मिळतो तोपर्यंतच जीव जिवंत! E Vitamin व अॉक्सिजनचा पुरवठा करणारी ही संजीवनी तुळस! प्राणरक्षण करण्यासाठी हिच्या औषधीगुणांचा भरपूर उपयोग वैद्यक शास्त्राने करुन घेतला आहे. मृत्यूनंतर तुळशीचे पान तोंडात ठेवतात.
प्राणरक्षक तत्व असणारी तुळस व विश्वाचा प्राणच असणारी देवता कृष्ण यांच्या एकत्वाचे, संयोगाचे, मीलनाचे प्रतीक म्हणजे हा तुलसीविवाह! कार्तिकी एकादशी-प्रबोधिनी एकादशी झाल्यानंतर हा विवाह त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत केव्हाही लावतात. हौसेला मोल नसते. मावशी-बाळशास्त्रींनी तुळशीचे लग्न खूप मोठ्या प्रमाणात केले होते. आजचा काळ तर जास्तीतजास्त चांगले, शोभायमान पध्दतीने दाखविण्याचा आहे!
कुणाला यापेक्षा वेगळे काही माहित असल्यास त्यांनीही लिहावे!
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment