Sunday, 14 February 2016

निर्भय

रामशास्त्री प्रभुणे पेशव्यांकडे न्यायाधीश! नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतर 'देहान्त प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित नाही' असे रघुनाथराव पेशव्यांना ठणकावून सुनावणारे एक असाधारण व्यक्तिमत्व! काय होईल याची तमा बाळगता, कोणत्याही आमिषाला बळी पडता निर्मम रीतीने न्याय देणारे! अशा व्यक्ती इतिहासात खूपच दुर्मिळ म्हणाव्या लागतील. न्यायावरचा विश्वास उडावा अशा घटना घडताना दिसतात. उल्लेख करायची गरज वाटू नये. कसे घडले हे रामशास्त्री? सातारच्या सावकाराकडे विसाव्या वर्षी हे शागीर्दाची नोकरी करत होते. सावकाराच्या हातावर पाणी घालताना त्याच्या कानातील भिकबाळीकडे लक्ष गेले. सावकाराने त्यांना हिणविले. असे मौल्यवान, तेजस्वी दागिने पराक्रमी, विद्वान, धनवंतांनाच शोभतात. शागिर्दी नाकारुन रामशास्त्री शिक्षणासाठी काशीक्षेत्री आले. धर्मशास्त्र पारंगत झाले. त्याकाळी काशीक्षेत्र विद्येच्या बाबतीत फारच नावाजलेले होते. तिथे शिकलेला विद्यार्थी अव्वल दर्जाचाच असणार अशी ख्याती. व्यक्तीने मनाशी पक्का निर्धार केला की तो कुठल्याही उच्चतेला पोचू शकतो याचे हे उदाहरण! '' चा 'मा' करुन आनंदीबाईने कारस्थान साधले. तिला असे वाटले असेल आपल्याविरोधात बोलण्याची हिम्मत कुणाची? पैशांच्या अधिकाराच्या जोरावर आपण कोणतीही दडपशाही करु शकतोच! पण शेराला सव्वाशेर रामशास्त्री प्रभुणे न्यायाची कसोटी दाखवून गेले. इतिहासात निर्भय रीतीने वागणाऱ्या व्यक्तित्वांची मुळीच कमतरता नाही. इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारे सर्व स्वातंत्र्यसैनिक निर्भयतेचे साक्षीदार आहेत. नाही चिरा नाही पणती - असेही अनेक आहेत. लाला लजपतराय, यशस्वी वकील, पण सर्व त्यागून स्वातंत्र्यलढ्यात छातीवर कितीतरी काठ्यांचे घाव झेलले
स्वातंत्र्यवीर सावरकर - 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' - म्हणत सागर पोहून आले. या व्यक्तींच्या निर्भयतेसमोर मान कितीही तुकविली तरी ती कमीच! असेंब्लीत बॉम्ब टाकणारे निर्भय क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु आणि चंद्रशेखर आझाद. निश्चितच अति निर्भय. हसत हसत फासावर जाणारे हे तरुण क्रांतिकारक. रँडचा खून करणारे चाफेकर बंधू सुद्धा त्यातच! सामान्य व्यक्तीलाही आयुष्यात अनेक समस्यांना नेहमीच सामोरे जावे लागते. प्रश्नमय आयुष्य असते. जगी सर्व सुखी असा कोण आहे? दुःख समोर वाढून ठेवलेलेच असते, पण मनाने जर माणूस निर्भय असेल तर या सर्व समस्यांसमोर तो ठाम उभा राहू शकतो. सतत निगेटिव्ह विचारांचा अवलंब करणारा माणूस भित्रा असतो. पॉझिटिव्ह विचारसरणी - सतत कार्य करुन जीवनाला तोंड देण्याची धमक व्यक्तीत निर्माण करते असे मला वाटते. 'सदासर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे' असे बाबा त्यांच्यावरील संकटांच्या काळात नेहमी म्हणत असत. माणसाचा विश्वास जेव्हा डळमळायला लागतो त्यावेळी भीतीला मनात थारा देता व्यक्ती धडाडीने तोंड देत राहिली तर त्याला मार्ग सापडतोच सापडतो. किती कठीण परिस्थितीत शिवाजीने मुसलमानांना तोंड दिले. हा 'डोंगर का चूहा' त्यांना भारी पडला. 'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल' या ओळी माणसाचा आत्मविश्वास वाढवितात. त्या ओळी राहत नाहीत. तो आशेचा किरण बनतो. निसर्गात रोज घडणारी ही घटना पण ती निश्चयाने जाणवून घ्यावी लागते. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख असा चक्रनेमिक्रम चालूच राहणार आहे. 'सुखदुःखे समे कृत्वा l लाभालाभौ जयाजयौ'l सुखदुःख, लाभ, हानी, जय, पराजय यात विचलित होता जो स्थिर राहतो तो स्थितप्रज्ञ. असा वरील ओळींचा अर्थ ऐकायला आणि वाचायला किती छान वाटतो नाही! पण अशीच व्यक्ती निर्भय होऊ शकणार! अमर होऊ शकणार. उदाहरणांची वानवा नाही. इतिहास घडवून जाणाऱ्या व्यक्ती नेहमीच समाजाचे आदर्श असतात. विवेकानंदांनी तरूण युवा पिढीला 'निर्भय व्हा' असाच संदेश दिलेला आहे. साने गुरुजी किती सुंदर विचारांची  पखरण करणारे साहित्य निर्माण करुन गेले, पण त्यांनी आत्महत्या केली. का? याचे उत्तर मिळत नाही. मग त्यांच्यात निर्भयता नव्हती का? त्यांच्या कृत्याने त्यांनी मरणावर विजय मिळविला असे म्हणायचे का? आत्महत्या करायला हिम्मत लागतेच की! काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात. अशाच अनुत्तरीततेवर मात करायची असते

      संगीता पाटखेडकर.

       //२०१६.

No comments:

Post a Comment